SAKAL Exclusive : एकाच वेळी दोन्ही हातांनी लिखाण करणारे विद्यार्थी अन् एक हजारांपर्यंत पाढे तोंडपाठ असलेल्या विद्यार्थ्यांमुळे हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) पाड्यावरील शाळा राज्यभर चर्चेत आली होती.
जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा आता गुरुकुल संकुलात भरणार आहे. इमारत उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून, सुसज्ज शैक्षणिक प्रांगण साकारले जाणार आहे. हा प्रकल्प पथदर्शी ठरणार असून, अन्य शाळांचे संकुलदेखील या स्वरूपात उभारले जाणार आहेत. (SAKAL Exclusive Winter school will held in Gurukul complex pilot project in state nashik news)
गुजरात सीमेपासून नजीक असलेल्या हिवाळी या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कल्पकतेमुळे लक्षवेधी ठरलेली आहे. येथील शिक्षक केशव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व विद्यार्थी एकाचवेळी दोन्ही हातांनी लिखाण करतात.
सामान्य ज्ञान, गणितासह अन्य विविध विषयांमध्ये नैपूण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे ही शाळा राज्यभरात आदर्शवत उदाहरण ठरलेली आहे.
आता या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षणासाठी पोषक असे वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. संकुल उभारणीसाठी गिव्ह फाउंडेशनतर्फे निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सोबत आर्मस्ट्राँग या संस्थेतर्फेदेखील भरीव मदत केली जाणार आहे.
असे असेल शैक्षणिक संकुल
आर्किटेक्ट पूजा खैरनार यांनी शैक्षणिक संकुलाकरिता विशेष अशी रचना विकसित केलेली आहे. या संकल्पनेनुसार संकुल हा गावाचाच भाग राहील, अशी रचना असेल.
निसर्गसंपन्न वातावरण, गुरुकुल पद्धतीप्रमाणे झाडाखाली वर्ग भरण्याची सुविधा, तसेच खिडक्या आणि दार नसलेल्या वर्गखोल्या, जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी पावसाचे पाणी साठेल असे शेततळे व जलतरण तलाव, शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशाच्या ठिकाणी ॲम्फी थिएटर उभारले जाणार आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
नजर पडेल तिथे ज्ञानभांडार
हिवाळी पाड्यावरील सध्याच्या शाळेच्या प्रांगणात नजर पडेल तिथे ज्ञानाचा भांडार बघायला मिळतो.
देशाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आदींबाबत महत्त्वाच्या नोंदी, गणित सोडविण्याच्या पद्धती, विज्ञानाचे महत्त्वाचे आविष्कार आदींची माहिती भिंती, फळ्यापासून तर फर्चीवरदेखील बघायला मिळते. अशात आता नवीन संकुलात किती भन्नाट रुप बघायला मिळेल, याबाबत उत्सुकता असणार आहे.
"विद्यार्थ्यांमधील असामान्य कौशल्यांमुळे नावलौकिक मिळालेल्या हिवाळी पाड्यावरील शाळेच्या विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. गुरुकुल शिक्षण पद्धतीवर आधारित शैक्षणिक संकुल उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झालेले आहे. सुसज्ज शैक्षणिक संकुल उभारले जाणार असून, या संकल्पनेवर भविष्यात अन्य जिल्हा परिषद शाळांचे प्रांगण विकसित करण्याचा मानस आहे." - रमेश अय्यर, संस्थापक अध्यक्ष, गीव्ह फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.