राऊतसाहेबांचा बाईट अन् पत्रकारांचा गोंधळ
शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत कोर्ट खटल्यानिमित्ताने मालेगावात आले होते. आता संजय राऊत म्हटल्यानंतर त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्यांच्या मागे मीडियाचा जथ्था असतोच. मात्र त्यांची प्रतिक्रिया घेण्याची लगबग मीडिया प्रतिनिधींच्या अंगाशी आली. प्रत्येकालाच आपल्या फ्रेममध्ये राऊतसाहेब सेंटरला हवे होते.
त्यामुळे ‘थोडं सरक, थोडं सरक’ करता करता पत्रकारांचीच एकमेकाला धक्काबुक्की झाली. यात एका मीडिया प्रतिनिधीचा शर्टदेखील फाटला. राऊतसाहेबांचा बाईट झाला अन् सर्वजण तिथून निघाले. मात्र ज्याचा शर्ट फाटला तो कालच नवीन घेतला होता, असे सहकाऱ्यांना सांगत शर्ट फाटल्याच अतीव दुःख सोसत डोक्याला हात मारत बसला. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire drama nashik)
आमचाच ‘मोये मोये’ झाला..!
सध्या सोशल मीडियावर रिल्सची भाषा चालते. त्यात एखादा विनोद करताना त्याला बॅकग्राउंडला ‘मोये मोये...’ गाणं वाजविलं जातं अन् उपस्थित चार-पाच जण वेडेवाकडे नाचतात. सध्या या संकल्पनेचा ट्रेंड जोरात सुरू असून, शहरातील तरुणाईवरही त्याचा प्रभाव बघायला मिळाला. पण हा प्रभाव काहीसा विनोदी प्रसंग घडवून गेला.
युवकांच्या ग्रुपमध्ये या किस्स्याविषयीच्या गप्पा रंगल्या होत्या. एक मित्र दुसऱ्याला म्हणाला, सिग्नलवर ‘मोये मोये...’चा ट्राय केला ना भाऊ मी. त्यावर मित्र उत्तरला, काय किस्सा केला भाऊ. त्यावर पुन्हा संबंधित म्हणाला, सिग्लनवर उभा होतो. सिग्नल सुटायला एक मिनीट बाकी होता. पुढं एक बाई गाडीवर बसलेल्या होत्या.
आपली गाडी स्टॅण्डवर लावली. त्यांच्या गाडीसमोर जाऊन ‘मोये मोये...’ म्हणत नाचायला सुरू केलं. इतक्यात उपस्थित युवकांमध्ये हश्या पिकला. सर्वांनी एका सुरात विचारले, पुढं कायं झालं मग? त्यावर भावनाशून्य चेहरा करत युवक म्हणाला, बाई खूप भडकल्या, मग गाडी स्टार्ट केली अन् सुसाट निघालो. हे ऐकताच पुन्हा एकदा सर्व लोटपोट हसले.
युवकांची अशीही भुरळ!
कोरोना काळात भुरळ येऊन पडण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, त्या वेळी शारीरिक क्षमता कमी असल्याने भुरळ येत असल्याचे कारण होते; परंतु हल्ली भुरळ येण्याचे प्रमाण वेगळे व गमतीशीर आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये ही भुरळ चांगलीच गाजत आहे. सायंकाळी पार्टीचे आयोजन करायचे झाल्यास एखाद्याला बकरा बनविले जाते. बकरा बनविताना ‘अरे, कुठे आहेस?’ असे विचारले जाते.
समोरून आपसुकच ‘का?’ असा प्रश्न येतो. त्या वेळी ‘अमुक-तमुकला भुरळ येऊन तो पडला आहे. त्याला (बारचे नाव) रुग्णालयात घेऊन जाण्याची आवश्यकता असून, तू लवकर ये. येताना रुग्णासाठी खर्चाला काही पैसेही घेऊन ये,’ असा निरोप दिला जातो. रुग्णाला चिकन, मटणाची आवश्यकता असल्याने ते खाल्ल्यावर त्याला ताकद येईल, असा त्या चर्चेचा अर्थ. असेच एकाला फोन केल्यावर रुग्ण दाखल असल्याचे असेच चित्र रंगविले गेले. मात्र, ज्याच्याकडून पार्टी घ्यायची, त्याला सांगितल्यावर तोच भुरळ येऊन पडला!
अन पैसे आले
स्मार्ट फोनमुळे आर्थिक व्यवहारही स्मार्ट झाले आहेत. असे असले तरी ऑनलाइन ट्रान्झक्शन करताना अनेकांची अजूनही फसगत होते. ऑनलाइन पैसे पाठविताना एका खात्यातून ते जातात; पण दुसऱ्या खात्यावर जमाच होत नाहीत. बरं पैशांचा व्यवहार म्हटल्यावर प्रत्येक जण जरा जपून हाताळणी करतो. कारण सायबर भामटेही अशा परिस्थितीत ‘हाथ की सफाई’ करून घेत असतात. अनेक घटना दररोज घडतही असतात. अशाप्रकारे एकाने बँकेच्या ॲपवरून दुसऱ्या बँकेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले.
पहिल्या बँकेच्या खात्यातून पैसे गेल्याचा मेसेज आला; पण दुसऱ्या बँक खात्यात ते जमाच झाले नाहीत. कारण त्या खात्यावरून त्याला दुसरे व्यवहार करायचे होते. तो वारंवार तपासून पाहत होता; पण पैसे जमा झालेले नव्हते. रात्रीची वेळ असल्याने दुसऱ्या दिवशी बँक उघडेपर्यंत पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यावर चौकशी केली तर त्याठिकाणी ऑनलाइन व्यवहाराबाबत स्वतंत्र माहिती देणारे कोणीच नव्हते.
‘कस्टमर केअरला संपर्क साधा’ हे ठरलेले उत्तर अनेकांनी दिले. त्याने कस्टमर केअरला संपर्क साधला; परंतु त्यात जी तक्रार होती, त्याबाबतचे ऑप्शनच नव्हते. एकाने २४ तासांत पैसे जमा न झाल्यास ऑनलाइन तक्रार करण्याचा सल्ला दिला आणि तेवढ्यात मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज पडला, अन त्या बिचाऱ्याच्या जीवात जीव आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.