नाशिक : बचतीचे धोरण हे भारतीय संस्कृतीचे सौंदर्य असल्याचे काही वर्षांपूर्वीपर्यंत बोलले जायचे. परंतु आता वाढत्या चंगळवादासोबत भौतिक सुख-सुविधांची वाढती महत्त्वाकांक्षा तरुणाईला कर्जाच्या दरीत ढकलत आहे. २३ ते ४० वर्षे वयोगटातील सुमारे तीस टक्के नोकरदार, व्यावसायिक वर्ग आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करताहेत. हा वर्ग ‘ईएमआय'च्या (मासिक हप्ता) चक्रव्यूहामध्ये अडकत चालल्याचे चित्र आहे, त्यामुळे कौटुंबिकसह आर्थिक ताळमेळ कोलमडत आहे. (SAKAL Special Youth shopping on EMI increasing nashik news)
बँकांच्या जोडीला एमबीएफसी (नॉन बँकींग फायनान्शियल कंपनी), खासगी ॲप आदींच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो आहे. वेगवेगळ्या पर्यायातील कर्जवाटप केले जात असून, त्यासाठी रोज कॉल सेंटरच्या माध्यमातून कॉल व मॅसेजचा अक्षरशः मारा केला जातो आहे. ई-कॉमर्सवरील वस्तू खरेदीसह खासगी आयुष्यात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ही कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाते आहे.
नंतर ईएमआय (मासिक हप्ता) सुरू केला जातो. या माध्यमातून कर्जाची रक्कम वसूल केली जाते आहे. सुमारे तीस टक्के युवा वर्ग या कर्जाच्या जाळ्यात अडकत आहे. दिवसागणिक हे प्रमाण वाढत चालल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गरज आहे त्याच वस्तूंची खरेदी करावी व गरजेइतकेच कर्ज घ्यावे असे साधेसरळ सूत्र अवलंबल्यास आर्थिक आणीबाणी उद्भवणार नाही, असेही जाणकार सांगतात.
सीबिल होतो प्रभावित
क्रयशक्ती, क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतल्याने सुरुवातीचा काही काळ हप्त्यासाठीच्या पैशांची व्यवस्था होते, परंतु काही महिन्यांनी हप्ते भरणे जड जात असल्याने, कर्जाची रक्कम थकते. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअर अन् सीबिल स्कोअरवर होत आहे. यामुळे भविष्यात मोठे व आवश्यक कर्ज मिळविण्यासाठी गतिरोधक निर्माण होत असतो. त्यामुळे हप्ते नियमितपणे भरणे अत्यंत आवश्यक असते.
पेपरलेस कारभारामुळे सोपे
कर्ज पुरवठादार संस्था, कंपन्या हे संपूर्ण प्रक्रिया फोनद्वारे पूर्ण करत असतात. केवळ ग्राहकाकडून ओटीपी प्राप्त करून घेताना, कर्जाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ व पेपरलेस असल्याने ग्राहकांना दमछाक करावी लागत नाही. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी त्यांना गळ घालणे सोपे होते.
क्रेडिट कार्डासाठी भरमसाठ फोन
कर्जाप्रमाणे बँकांकडून क्रेडिट कार्ड वितरणासाठी दिवसभर प्रत्येकाला अनेक दूरध्वनी येत असतात. वार्षिक शुल्क शून्य असण्यासह अन्य विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात. भरमसाठ फोन येत असल्याने ग्राहकही ठरावीक कालावधीनंतर कार्ड घेण्यासाठी प्रवृत्त होत असल्याची सध्याची स्थिती आहे, मात्र नंतर वार्षिक शुल्क लागून येत असल्याने ग्राहक नाहक भरडला जातो.
असे आहेत कर्जाचे प्रकार
गृहकर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज हे कर्जाचे प्रचलित प्रकार आहेत. याशिवाय आधारकार्ड लोन, प्रॉपर्टी लोन, बिझनेस लोन, मार्कशिट लोन असे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करुन दिले जातात. ई-कॉमर्स साईट्सवर 'पे-लॅटर' अर्थात ‘आत्ता खरेदी करा व नंतर पैसे अदा करा’ असा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. विविध प्रकारच्या वॉलेट्सकडून रक्कम अदा करण्यासाठी एक महिन्याच्या कालावधी देतांना विविध बिले भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
आर्थिकदृष्या सक्षम राहण्यासाठीची काळजी
- गरजेपुरते कर्ज घ्यावे व नियमित हप्ते फेडावे
- ईएमआय तारखेच्या दोन दिवसांआधी बँक खात्यात पुरेशी शिल्लक ठेवावी
- क्रेडिट कार्डची 'मिनिमम ड्यू' न भरता पूर्ण रक्कम अदा करावी.
- एकावेळी दोन ते तीनपेक्षा अधिक ईएमआय वाढवू नये.
- कर्ज घेताना अटी व शर्ती बारकाईने वाचून मगच निवड करावी
- एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याचे शक्यतो टाळावे.
- नियमितपणे आपला सीबिल स्कोर तपासून योग्य असल्याची खात्री करावी.
- कर्जपुरवठा करणारी अनावश्यक ॲप मोबाईलमध्ये ठेऊ नये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.