नाशिक : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेतच्या डान्सपार्टीप्रकरणी शिवसेनेच्या उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर यांची शहर गुन्हेशाखेकडून चौकशी सुरू आहे.
या चौकशीदरम्यान बडगुजर हे आता वकिलामार्फत लेखी उत्तर देणार असल्याने पोलिसांनाही लेखी उत्तरांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
तर, दुसरीकडे अपहारप्रकरणातही बडगुजर यांना दहा दिवसांची मुदत दिलेली असली तरी ‘लाचलुचपत‘ त्यांना कधीही चौकशीची टांगती तलवार कायम आहे. असे असले तरी, या चौकशांमध्ये त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. (Salim Kutta Dance Case Police waiting for written answers from badgujar waiting investigation from ACB nashik)
सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून पोलीस चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकलेले आहेत. शहर गुन्हेशाखेकडून डान्सपार्टीची चौकशी सुरू असतानाच, अपहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या संकटात वाढ झाली होती.
पोलीस चौकशीत वकिलांच्या उपस्थितीला परवानगी दिल्यानंतर आता वकील पोलिसांना लेखी उत्तर देणार आहेत.
त्यामुळे त्यात आता पोलिसांना प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र आहे. तरीही दुसर्या बाजुने पोलीस या पार्टीला उपस्थित असलेल्यांचे जाबजबाब नोंदवून घेत आहेत. आत्तापर्यंत २२ जणांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत.
तर, अपहार प्रकरणामध्ये बडगुजर यांनी काही कागदपत्रांची माहिती मागविली असून, ती मिळेपर्यंत त्यांनी चौकशीला मुदतवाढ मागितली होती.
त्यानुसार त्यांना १० जानेवारीपर्यंतची मुदत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली असली तरीही, बडगुजर यांना चौकशीसाठी कधीही बोलाविण्यात येईल त्यावेळी त्यांनी उपस्थित राहण्याची ताकीदही देण्यात आलेली आहे.
दोन्ही पातळीवरील चौकशीला सामोरे जाणारे बडगुजर यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला असला तरी अद्याप त्यांच्यामागील चौकशीचा फेरा संपला असे मात्र म्हणता येणार नाही.
‘व्हिडिओ’ काढणाऱ्याचीही चौकशी
सलिम कुत्ता व सुधाकर बडगुजर डान्स करतानाचा व्हिडिओचे मोबाईलमध्ये चित्रण ज्याने केले त्याचे गोपनीयरित्या पोलिसांनी चौकशी करून जाबजबाब घेतले. मात्र, याप्रकरणी त्याचे नाव प्रसार माध्यमांसमोर येताच, त्यावरूनही आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
सराईत गुन्हेगार असलेल्या व्यंकटेश मोरे यानेच तो व्हिडिओ काढण्याचे समोर आले असून त्यानेच ती पार्टीही आयोजित केल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला तर, त्यास भाजपानेही प्रत्युत्तर देत टीका केली आहे.
"अपहार प्रकरणाच्या चौकशीत सुधाकर बडगुजर यांना १० जानेवारीपर्यंत मुदत दिलेली असली तरीही तपासाच्या दृष्टिकोनातून चौकशीसाठी केव्हाही बोलाविले जाऊ शकते. तसे त्यांना सांगण्यात आलेले आहे."- विश्वजित जाधव, उपअधीक्षक व तपासी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.