वणी (जि. नाशिक) : रखरखत्या उन्हात घामाच्या धारांनी आदिमायेच्या भक्तीत चिंब होत, आई भगवतीच्या भेटीसाठी माहेरहून (खानदेश) आलेले पदयात्रेकरूंसह सुमारे दोन लाखांवर भक्त वणी गडावर आदिमाया सप्तशृंगीच्या तेजोमय मूर्तीचे दर्शन घेत भक्तिसागरात दंग झाले.
खानदेशातून आलेल्या भाविकांनी रात्री बाराच्या सुमारास गडावर फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन घेतल्यानंतर गड सोडायला सुरवात केली. दरम्यान, आज दुपारी आदिमायेच्या कीर्तिध्वजाची ट्रस्टच्या कार्यालयात विधिवत पूजन होऊन डफ, ढोलाच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. रात्री बाराला गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकला. (Saptashrungi Devi devotee satisfied with sight of Adimaya Flood of devotees at Saptshringagad nashik news)
श्री सप्तशृंगीमाता चैत्रोत्सवादरम्यान आजच्या सहाव्या माळेस अनवाणी आलेल्या लाखांवर पदयात्रेकरूंची लाखो पावले कुठल्याही प्रकारचा थकवा न जाणवता उत्साहाने सप्तशृंगगड चढून जात होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यात्रेकरूंची गर्दी उत्तरोत्तर वाढत जाऊन भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या.
सकाळी साडेसातला देवीचे अलंकारांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. आजची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनीदेवी ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत देवरे आणि ग्रामपंचायत सदस्या गायकवाड या दोन्ही जोडप्यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
ध्वजाचे मानकरी दरेगाव येथील गवळी परिवार यासमवेत जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त भूषणराज तळेकर, डॉ. प्रशांत देवरे, मनज्योत पाटील, अॅड. ललित निकम आदींच्या हस्ते दुपारी साडेतीनला पूजा झाली.
ध्वजपूजनानंतर मानकरी गवळी पाटील यांच्याकडे न्यासातर्फे ध्वज सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर सप्तशृंगीमातेचा जयघोष, ढोल-डफाच्या निनादात ध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत ध्वजाचे दर्शन घेतले.
दरम्यान, आज मध्यरात्री बाराला समुद्रसपाटीपासून चार हजार ५६९ फूट उंचीवर असलेल्या सप्तशृंगगडाच्या शिखरावर मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने कीर्तिध्वज फडकविला.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
रात्री उशिरापर्यंत बाऱ्या कायम
रात्री उशिरा पहिल्या पायरीपर्यंत दर्शनासाठी बाऱ्या कायम होत्या. पदयात्रेकरूंबरोबरच खासगी वाहनांद्वारे नांदुरीपर्यंत भाविक आल्याने नांदुरी येथील १५ एकरचा परिसर वाहनांच्या पार्किंगने भरून गेला होता. नांदुरी ते सप्तशृंगगड दरम्यान दर पाच मिनिटांच्या अंतराने बस सोडण्यात येत होत्या.
तर नाशिक विभागातून दीडशे, नंदुरबार, धुळे, जळगाव विभागातूनही दोनशेवर बस सप्तशृंगगडावर भाविकांच्या फेऱ्या मारत होत्या. मंदिरातही भाविकांची गर्दी लक्षात घेता न्यासाने नियोजन केल्याने एका मिनिटाला ५५ ते ६० भाविक बाहेर पडत होते. न्यासाच्या धर्मशाळेत पदयात्रेकरूंची मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
ट्रस्ट प्रसादालयात आज सुमारे ३० हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती प्रसादालयप्रमुख मुरलीधर गायकवाड यांनी दिली. उद्या (ता. ५) पौर्णिमा असल्याने गडावर भाविकांचा गर्दी कायम राहणार असून, रात्री उशिरापर्यंत पदयात्रेने हाजारो भाविक गड चढत होती, तर काही गडाकडे येणाऱ्या रस्त्यावरून गडाकडे मार्गक्रमण करीत होती.
पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सरपंच रमेश पवार, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, भिकन वाबळे, प्रकाश जोशी, नानाजी काकळीज, गोविंद निकम, प्रकाश पगार, प्रशांत निकम, सुनील कासार यांसह ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, गिरिधर गवळी, बाळकृष्ण व्हरगळ, गणेश बर्डे, श्याम पवार, भरत शेलार, किरण राजपूत, विश्वस्त संस्थेचे सर्व विभागप्रमुख, ग्रामस्थ, भाविक-भक्त व शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्थेतील सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.