Nashik News : पाथर्डी फाटा भागात असलेल्या नरहरीनगर येथे विजेच्या तारेला अडकलेला पतंग काढताना बसलेल्या विजेच्या धक्क्याने भाग्येश विजय वाघ (१५) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.
संक्रांतीच्या आदल्या दिवशीच अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ()
पोलिस खात्यात नोकरीला असलेले श्री. वाघ आपल्या कुटुंबीयांसोबत रविवारी (ता.१४) दुपारी अडीच वाजता गावावरून आले. त्यांच्यासोबत भाग्येशदेखील होता. यमुना रो हाऊसच्या टेरेस जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग भाग्येशला दिसला. घरातदेखील न जाता तो पतंग घेण्यासाठी टेरेसवर धावला.
तेथे पडलेल्या पडद्याच्या रॉडने पतंग काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जोरदार विजेचा झटका बसला. त्याच्या ओरडण्याने अभ्यास करत असलेली अनुष्का भोसले टेरेसवर धावत गेली. त्याच्या अंगातून अक्षरशः वाफा येत असल्याचे बघून तिने भीतीने जोरजोरात आरडाओरड केला. म्हाडाच्या इमारतीमधून हे दृश्य बघणाऱ्यांनी देखील जोरजोरात ओरडायला सुरवात केली.
तेथील राहणारा लोकेश ठोके आणि त्याचा भाऊ शिवम ठोके हे वरती पोचले. लोकेशने लाकडी पट्टीच्या साह्याने भाग्येशला बाजूला केले. हे दोघे भाऊ आणि अनुष्का यांनी त्याला ओढण्यास सुरवात केली. जयश्री ठोके आणि सविता झाल्टे यादेखील पोचल्या. जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले घनश्याम कोळी यांनी रुग्णवाहिकेला फोन केला.
सर्वांनी मिळून त्याला खाली आणले. तोपर्यंत भाग्येश ची हालचाल सुरू होती. तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भाग्येश स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत होता. दीड महिन्यावर परीक्षा आल्याने परीक्षेची आणि पूर्व परीक्षेची तयारी सध्या तो करत होता.
संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही घटना झाल्याने या भागातील सर्व रहिवासी सुन्न झाले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत येथील घरात दिवेदेखील लागलेले नव्हते. या भागात असलेल्या विजेच्या तारा या रो- हाऊसच्या दुसऱ्या मजल्याच्या अगदी जवळून गेल्या आहेत. यापूर्वीदेखील २०१४ मध्ये आणि अवघ्या दोन महिन्यांपूर्वी एक कपडा तारांवर पडल्याने मोठा स्फोट झाल्याची माहिती रहिवाशांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.