नाशिक : जगदगुरू शंकराचार्यांच्या मान्यता किष्किंधाला हनुमान जन्मस्थळासाठी वाल्मीकी रामायणाच्या आधारे मान्यता मिळाल्याचा दावा पुढे येऊन वादाची ठिणगी पडली. अशा परिस्थितीत नाशिकमधील धर्मशास्त्र अभ्यासकांनी टिपू सुलतान कालखंडातील श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य यांनी हनुमान स्थळ अंजनेरी असल्यास मान्यता दिल्याची बाब अधोरेखित केली आहे.
श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य नाशिकमध्ये मुक्कामी थांबून मठाचा कारभार पाहत होते, असा दाखला धर्मशास्त्र अभ्यासकांनी दिला आहे. तसेच ब्रह्मपुराणात द्वीज म्हणून अंजनेरीमधील हनुमान जन्माचा उल्लेख आहे. शिवाय अष्टतीर्थमध्ये अंजनेरीचा उल्लेख आहे, हे सांगत असतानाच धर्मशास्त्र अभ्यासकांनी रामायणातील एका कथाचे उदाहरण दिले आहे. एका रामकथेत राम-लक्ष्मण यांच्या युद्धावेळी रावणाचे बंधू अहिरावण आणि महिरावण यांचा पराभव हनुमान यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. त्यातील महिरावणी हे गाव नाशिकजवळ आहे. मात्र वाल्मीकी रामायणमध्ये त्या रामकथेचा उल्लेख आढळत नाही. त्याचबरोबर वेदग्रंथांमध्ये देशात ९ ठिकाणी हनुमान जन्म झाल्याचे सांगितले आहे. ही जरी सारी स्थिती असली, तरीही केवळ एका ग्रंथावर अवलंबून राहण्याऐवजी सांगोपांग विचार विद्वानांना करावा लागणार आहे, असेही धर्मशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.
‘डबल इंजिन’ मुळे चर्चा झडणार
केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचे असल्याने धर्माबद्दल खुले चर्चा करायला कुणालाही आवडते. मग भले धर्मशास्त्राबद्दल ज्ञान असो अथवा नसो, असे आता धर्मशास्त्राचे अभ्यासक म्हणू लागले आहेत. कर्नाटक आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने ‘डबल इंजिन’ मुळे किष्किंधा हे हनुमान जन्मस्थळ अशी चर्चा घडवण्यात येत असून दोन्ही सरकारकडून निधी मिळावा, अशी त्यामागील अलिखित बाब असल्याची शंका नाशिककरांना वाटत आहे.
नाशिकमधील धर्मशास्त्राचे अभ्यासक १९८७-८८ मध्ये वृंदावनला गेले होते. तेव्हा तेथील एका स्वामींच्या आश्रमात या अभ्यासकांना हनुमान जयंतीची काही माहिती मिळाली. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. मात्र काही जण आश्विन चतुदर्शीला हनुमान जयंती साजरी करतात, ही मिळालेली माहिती होती. त्याचप्रमाणे हरिद्वारवरुन प्रसिद्ध होणाऱ्या एका हिंदी भाषिक मासिकाने हनुमान विशेषांक गेल्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला असून त्यात जन्म, अवतार, तिथी, उपासना अशी सारी माहिती त्यात आहे. त्याचबरोबर ‘सकाळ’ तर्फे मागील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष भागामध्ये वेदशास्त्र संपन्न शांतारामशास्त्री भानोसे यांनी अंजनेरीच्या हनुमान जन्मस्थळाचा उल्लेख केलेला आहे.
किष्किंधा हनुमान जन्मस्थळाच्या अनुषंगाने स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ३१) सकाळी नाशिक रोड भागात शास्त्रार्थ सभा होत आहे. त्यासाठी सनातन वैदिक धर्माचे अध्यक्ष भालचंद्रशास्त्री शौचे, गीता आणि भागवत कथा प्रवचनकार स्वामी रमाकांत व्यास यांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्वामी व्यास हे पुढील कार्यक्रम नियोजित असल्याने उपस्थित राहणार नाहीत. मात्र त्यांनी श्रद्धा, निष्ठा, भाव असलेले सामान्य लोक अशा वादाच्या घटनांमुळे गोंधळात पडतात आणि धार्मिक लोकांवरील विश्वास कमी व्हायला लागतो, असे स्पष्ट केले. श्री. भालचंद्रशास्त्री शौचे म्हणाले, की भगवंत सर्वत्र आहे. त्यामुळे चांगला भाव टिकून राहिला पाहिजे. कुठल्याही गोष्टीत दावे-पुरावे पाहिल्याखेरीज निर्णयाप्रत पोचणे शक्य होत नाही. एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय होऊ शकत नाही. श्रद्धा आहे ती टिकली पाहिजे. त्यामुळे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचा काय आग्रह आहे, हे शास्त्रार्थ सभेत समजून घेतला जाईल. निर्णयाप्रत जायला काही काळ द्यावा लागेल.
वेदांपासून ते संत वाड्मय महत्त्वाचे
वाल्मीकी रामायण अशा एका ग्रंथावर धर्मशास्त्र अभ्यासक कधीही निर्णय घेत नाहीत. त्यासाठी वेदांपासून ते संत वाड्मयांचा आधार घेतला जातो. त्यामुळे अमुक एका ठिकाणी उल्लेख नाही म्हणून चालत नाही. या सगळ्या बाबींचा आणि धर्मशास्त्राच्या आधारे होणाऱ्या निर्णयांचा विचार करायचा झाल्यास अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान आहे, असे सांगून वेदशास्त्रसंपन्न शांतारामशास्त्री भानोसे म्हणाले, की शास्त्र-पोथी-पुराणांचे देणे-घेणे नाही अशी भावना करून कुणीही धर्माचा वापर करणे योग्य नाही. वेद, पुराणांचा अभ्यास असलेले ज्ञानी, अभ्यासक वाद घालत नाहीत. शास्त्रीय वाद घालत आव्हान-प्रतिआव्हान देणे योग्य नाही.
पृथ्वीतलावर सृष्टीची रचना करणारे ब्रह्मदेवांनी पद्मासन घालून तपश्चर्या केली, ती नाशिकमध्ये. त्यामुळे नाशिक हे पहिले प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. शिवाय नाशिकच्या परिसरातील सर्व स्थाने प्राचीन आहेत. त्यात ब्रह्मगिरी, अंजनेरी पर्वताचा समावेश होतो. अंजनी मातेने तपश्चर्या केली म्हणून पर्वताला अंजनेरी नाव देण्यात आले. शिवाय या भागात नवीन वस्ती झाली असते आणि त्यांनी दावा केला असता, तर ते समजण्यासारखे आहे. मात्र या भागात आदिवासी बांधवांची वस्ती असून त्यांना काय मिळवायचे आहे? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी किष्किंधा हे हनुमान जन्मस्थळ असल्याचा केलेला दावा चुकीचा आहे.
- सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ, नाशिक
देश आणि कायदा हा नियम, संविधानावर चालतो. तो पोथ्या-पुराणावर चालत नाही. त्यामुळे संविधानाप्रमाणे असलेल्या बाबी हनुमान जन्मस्थळ वादाच्या अनुषंगाने स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी मान्य करायला हव्यात. पुरातत्त्व विभाग आणि केंद्र सरकारची १९७८ मधील अधिसूचना अशा सगळ्या सरकारी कागदपत्रांमध्ये अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. शास्त्रार्थ सभेत हे सारे पुरावे आपण सादर करणार आहोत. त्याचबरोबर आगामी २०२६-२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यात हनुमान जन्मस्थळाबद्दल नक्की चर्चा होऊ शकेल.
- देवांग जानी, इतिहासाचे अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.