नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) शुक्रवारी (ता. २९) काढण्यात आलेल्या आरक्षणातून अनेक दिग्गजांची दांडी उडाली आहे. जुने नाशिकमध्ये मातब्बर आजी- माजी नगरसेवक आमनेसामने येणार असून, या भागात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) उमेदवारीवाटप करताना कसोटी लागणार आहे.
सिडकोचा अपवाद वगळता शिवसेना व भाजपसाठी ‘सेफ झोन’ तयार झाला आहे. सातपूर विभागातही मनसेला मोठा धक्का बसला आहे. (Shock to MNS in Satpur BJP Shiv Sena in safe zone NMC Election Reservation Draw Latest Marathi News)
सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम ठेवल्याने त्यानुसार महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी १०४ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
प्रथम ओबीसींच्या ३५ जागांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर ३५ जागांमध्ये महिलांच्या १८ जागांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या ३४ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
आरक्षणातून दिग्गजांना धक्का बसल्याचे समोर आले. जुने नाशिक अर्थात, मध्य विधानसभा मतदारसंघात दिवे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग २७ मध्ये अनुसूचित जमाती वगळता दोन्ही आरक्षणे महिलांसाठी राखीव, तर प्रभाग २२ मध्येदेखील हीच परिस्थिती असल्याने अनुक्रमे राहुल दिवे व प्रशांत दिवे यांना एक तर थांबावे लागेल किंवा अन्य प्रभाग शोधावा लागेल किंवा कुटुंबातील महिलांना उमेदवारी द्यावी लागेल.
याच प्रभागात भाजपचे नगरसेवक अनिल ताजनपुरे यांनादेखील अन्य प्रभागाकडे सरकावे लागणार आहे. माजी सभागृहनेते सतीश सोनवणे प्रभाग ३९ मधून इच्छुक होते. परंतु, तेथे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागेल.
प्रभाग सातमध्ये माजी सभागृहनेते कमलेश बोडके यांचीही अडचण झाली आहे. प्रभाग ४४ मध्ये विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे सुदाम डेमसे यांना प्रभाग शिल्लक राहिला नाही, तर भाजपचे भगवान दोंदे यांना कुटुंबातील महिला सदस्यांना उभे करावे लागेल.
रंजन ठाकरे यांना धक्का
सिडको विभागात प्रभाग ३७ मध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या रत्नमाला राणे व अनिता भामरे या दोघांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होईल. त्याव्यतिरिक्त अन्य नगरसेवकांसाठी ‘सेफ झोन’ झाला आहे.
या उलट सर्वसाधारण प्रभाग झाल्याने शिवसेनेचे दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी भाजपचे मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे यांचे प्रतिस्पर्धी कमी झाले आहेत. सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, किरण गामणे, प्रवीण तिदमे, राजेंद्र महाले, सुवर्णा मटाले ‘सेफ झोन’मध्ये आहेत. नाशिक रोडमध्ये भाजपमधून शिवसेनेत गेलेले विशाल संगमनेरे यांच्या प्रभाग २३ मध्ये दोन्ही महिलांचे आरक्षण पडल्याने अडचण झाली आहे.
प्रभाग नऊमध्ये दोन महिला व एक सर्वसाधारण गटासाठी जागा सुटल्याने माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासोबत लढणाऱ्यांना इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. भोसले कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का आहे.
प्रभाग १६ मध्ये भाजपमध्ये यापूर्वी रस्सीखेच होती. परंतु आता दोन पुरुष व एक महिला असे आरक्षण पडल्याने भाजपमध्ये हर्षोल्लोष आहे. मनसेचे सलीम शेख प्रभाग १५ किंवा १४ मधून इच्छुक होते. परंतु दोन्ही ठिकाणी आरक्षण पडल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना आरक्षणामुळे मोठा फटका बसल्याने त्यांना प्रभाग १५ कडे सरकावे लागेल.
राजकारण ढवळून निघणार
आरक्षणामुळे जुने नाशिकमधील राजकारण ढवळून निघणार आहे. प्रभाग क्रमांक १८, १९ व २० मधील आरक्षणाने येथील सूत्रे बदलणार आहेत. प्रभाग १८ मध्ये दोन महिला व एक सर्वसाधारण आरक्षणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांची अडचण झाली आहे.
त्याशिवाय खुल्या जागेवर माजी महापौर विनायक पांडे, ॲड. यतीन वाघ, गजानन शेलार, राजेंद्र बागूल समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे, तर उमेदवारी देताना महाविकास आघाडीची कस लागणार आहे. प्रभाग १९ मध्ये दोन महिला व एक जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांच्यासह भाजपचे गणेश मोरे तसेच शेलार, पांडे यांना आमनेसामने यावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.