सिन्नर : शेताच्या मध्यातून गेलेल्या वीजवाहक तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने अडीच एकर क्षेत्रातील तोडणीला आलेला सुमारे सव्वाशे टन ऊस जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 15 दुपारी दोन वाजेच्या सुमारास वावी जवळील वल्लेवाडी येथे घडली.
निवृत्ती राधाकिसन यादव यांची वल्लेवाडी गावात गट नंबर 178 मध्ये शेती आहे. सुमारे अडीच एकर क्षेत्रात त्यांनी ऊस लागवड केली असून संगमनेर कारखान्याकडे नोंदणी केलेली आहे. पुढील आठवड्यात ऊस तोड होईल असे त्यांना कारखान्याकडून कळविण्यात आले होते. त्यापूर्वीच आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या विजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन संपूर्ण ऊस आगीत खाक झाला. जुनाट झालेली वीजवाहिनी तारांमध्ये झोळ पडल्याने जमिनीकडे झुकलेली आहे. या तारा थोड्याशा हवेने संपर्क येऊन घर्षण निर्माण होते. व ठिणग्या पडतात. याबाबत महावितरणकडे वारंवार मागणी करूनही दुरुस्तीची कामे केली जात नाही असा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास उसाच्या शेतातून आगीचे लोळ दिसू लागल्यावर निवृत्ती यादव यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. सुदैवाने वीजपुरवठा सुरू असल्याने लागलीच मोटारी सुरू करून जमेल तसा पाण्याचा मारा शेतकऱ्यांनी सुरू केला. सुमारे तासभर प्रयत्न करून आग आटोक्यात आली. मात्र, तेवढ्या वेळात संपूर्ण ऊस जळून खाक झाला. संगमनेर कारखान्याला कळवल्यानंतर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत अपेक्षित सव्वाशे टन उत्पादन शेतातच आडवे झाले होते. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घोटेवाडीचे तलाठी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.