Somvati Amavasya 2023 : 'हर हर महादेव...,'बम बम भोलेचा गजर... मार्कंडेय ऋषींकी जय, सप्तशृंगी माते की जयचा जयघोष करीत हजारो पावले मार्कंडेय पर्वत चढून जात होती.
तीन ते चार तासांच्या पर्वत चढाईनंतर श्री मार्कंडेय ऋंषीची तेजस्वी आश्वासक मूर्तीपुढे नतमस्तक होताच पर्वत चढल्याचा थकवा क्षणार्धात दूर होण्याची अनुभूती घेत सुमारे दोन लाखावर भाविक श्री मार्केडेय ऋषींच्या मूर्तीपुढे नतमस्तक झाले.
समुद्र सपाटीपासून ४३८४ फूट उंचीवर असलेल्या मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त यात्रा भरते. (Somvati Amavasya 2023 2 lakh devotees throng Markandeya mountain nashik news)
'सौ बार काशी... एक बार मार्कडेय ऋषी..' असे धार्मिकदृष्ट्या म्हटल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर सोमवारी (ता.१७) आषाढ अमावस्या, दीप अमावस्यानिमित्त भाविकांची ऐतिहासिक गर्दी झाली होती.
रविवारी रात्री १०.७ मिनिटांनी अमावस्येस प्रारंभ झाल्याने रविवार सायंकाळपासूनच गुजरात, अयोध्या तसेच राज्यभरातील शेकडो साधू व भाविक पर्वंतावर दाखल झाले होते.
पर्वतावरील रंगनाथ बाबा आश्रमातर्फे सेवेकरी, स्वयंसेवकांनी भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला होता. पहाटेपासूनच रिमझिम असल्याने सरी झेलत हजारो भाविक मार्कडेय पर्वतावरील मुळाणेबारी, सप्तश्रृंगगड व मार्कंड पिंप्रीच्या बाजूने अवघड कडे चढून जात होती.
पर्वताच्या पायथ्याशी मुळाणेबारीच्या दोन्ही बाजूने भाविकांच्या खासगी वाहनांची रिघ लागली होती. मुळाणे बारी येथे वाहतुकीसाठी कळवण व वणी बसस्थानकातून जादा बसची व्यवस्था केलेली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळी पर्वतावरील मार्कंडेय मंदिरात अभिषेक महापूजा विधी ट्रस्टतर्फे करण्यात आला. सातपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात अरूंद व धोकेदायक जागा असल्यामुळे मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी भाविकांना चार ते पाच तास लागत होते.
सकाळी बारापर्यंत मोठी गर्दी झाल्याने व दर्शनाचे नियोजन नाही अन पोलिस यंत्रणाही नसल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान काही भाविक स्वयंसेवकांनीच गर्दी हाताळीत भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने प्रयत्न करीत होती.
पर्वताच्या शिखरावरील दक्षिणमुखी असलेल्या मार्केडेय मंदिरात उत्तरदिशेस मुख करून पद्मासन घालून बसलेल्या आश्वासक तेजोमय मार्केडेय ऋषींच्या मूर्तीच्या दर्शनाने पर्वत चढून आल्याचा थकवा क्षणात दूर होऊन भक्तिभावाने दर्शन घेऊन भाविक पर्वत उतरत होते.
पर्वताच्या पठारी व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाद, पूजेच्या साहित्याची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली होती. मुळाणेबारीच्या दोन्ही बाजुच्या रस्त्यांवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत भाविक अन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सोमवती यात्रा यशस्वी व भाविकांच्या सुविधा पोहचविण्यासाठी मार्कंडेय न्यासाचे पदाधिकारी, रंगनाथबाबा आश्रमाचे सदस्य, मुळाणे, बाबापूर, मार्कंडपिंप्री येथील सेवेकऱ्यांनी प्रयत्न केले.
"मार्कंडेय पर्वत पूर्णपणे वनविभागाच्या अखत्यारीत असून पर्वतावर जाण्यासाठी पायवाट आहे. येणारे भाविक दुचाकी, खासगी वाहनांनी येत असल्याने पार्किंग सुविधेअभावी पाच ते सहा किलोमीटर गाड्यांची लांब रांगा लागल्या होत्या.
त्यामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. डोंगराच्या पायथ्याशी जाण्यास लोकांना चार ते पाच किलोमीटर पायी चालावे लागले. शासनाने तीर्थक्षेत्र घोषित करुन,अपघात टाळण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता, पार्किंगची व्यवस्था, पाणी, विद्युत व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे." - केशव भोये, सदस्य, मुळाणे ग्रामपंचायत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.