नाशिक : सातपूर परिसरात अनधिकृत सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरूडे कुटुंबीयांतील तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खडबडून जाग आलेल्या उपनिबंधक कार्यालयाच्या विशेष पथकाने पोलिसांच्या मदतीने धाडसत्र मोहीम राबविली. (special team Deputy Registrar office with help of police Raiding house of unauthorized money lenders nashik news)
या मोहिमेत संयुक्त पथकाने सिडको, सातपूर परिसरातील चार ठिकाणी धाडसत्र मोहीम राबविली. यावेळी पथकांनी संशयितांच्या घरातून काही संशयास्पद कागदपत्र जप्त केली असून, सदरील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
नाशिक शहर परिसरात गेल्या महिना-दीड महिन्यात अनधिकृत सावकारीसंदर्भातील चार गुन्हे दाखल झाले आहेत. तर यातील दोन गुन्ह्यांमध्ये पाच जणांनी आत्महत्या केली आहे. इंदिरानगर हद्दीतील पाथर्डी परिसरात तरुण दांपत्याने तर, सातपूरमध्ये गेल्या रविवारी एकाच घरात तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली.
या घटनांमुळे शहरातील अवैधरीत्या होणाऱ्या सावकारी व्यवसाय व त्यांच्या जाचाचा प्रश्न ऐरणीवर आला. सातपूर प्रकरणात पोलिसांनी २१ अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला तर, १० जणांना अटकही केली होती. न्यायालयाने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. तर अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
दरम्यान, शहर गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकासह उपनिबंधक कार्यालयाच्या चार पथकांनी सिडको आणि सातपूर परिसरात अवैधरीत्या सावकारी धंदा थाटलेल्यांच्या घरांवर धाडी टाकल्या.
यात, सिडकोतील कामटवाडा रोडवरील अभियंता नगरमधील भक्तिसागर अपार्टमेंटमध्ये, तर सातपूरमधील कामगारनगरमधील गणेश अपार्टमेंट येथे या पथकांनी संयुक्तरित्या कारवाई केली.
उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार सदरची कारवाई राबविली. यामध्ये या पथकाने संशयितांच्या घरातून आर्थिक व्यवहाराशी संबंधित संशयास्पद दस्तऐवज जप्त केला आहे.
ज्यांच्यावर धाडसत्र राबविण्यात आले ते अनधिकृत सावकारी करीत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र, त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
ते अनधिकृत सावकार
शिरूडे बापलेकांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले २१ संशयितांपैकी एकाकडेही सावकारीचा अधिकृत परवाना नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर, मध्यवर्ती कारागृहात रवानगी झालेल्या दहापैकी एकाची प्रकृती बिघडली आहे.
त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईचे लाडशाखीय वाणी समाजाने स्वागत केले असून, संशयितांवर कठोर कारवाईसह खासगी सावकारीचा बीमोड करण्याची मागणी आयुक्तालयाकडे केली आहे.
गेल्या महिन्यांपासून उपनिबंधक कार्यालयाकडे अनधिकृत सावकारीसंदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार पोलिस बंदोबस्तामध्ये शहरातील सिडको, सातपूरमधील चार ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये काही ठिकाणी संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. - राजेंद्र सानप, सहकार अधिकारी (श्रेणी-२), उपनिबंधक कार्यालय, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.