झोडगे (जि. नाशिक) : माळमाथा परीसर अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. शेती सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने पावसाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय केला जातो. मात्र, आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर माळमाथा परिसरात द्राक्षबाग फुलवून निर्यातक्षम दर्जाचे द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या युवा शेतकरी नितीन शिंदे व अमोल शिंदे या बंधूंनी आदर्श निर्माण केला आहे.
वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा सध्या हातबट्ट्याचा व्यवसाय बनला आहे. तरीसुद्धा अनेक शिक्षित तरुण या पारंपारिक व्यवसायात उतरून त्यात नवीन प्रयोग करत आहेत. जळकू येथील दिवंगत दशरथ दगडू शिंदे व नलिनी दशरथ शिंदे यांच्या निधनाने कुटुंबातील आधारवड कोसळले. मात्र, समाजकारणासह राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नितीन शिंदे यांच्या पत्नी तथा जळकूच्या सरपंच आसावरी शिंदे व मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अमोल शिंदे यांनी वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. शेतीतून आर्थिक समृद्धी व राजकारणातून समाजसेवा करण्याचा ध्यास घेऊन मालेगाव तालुक्यात आपली ओळख निर्माण केली आहे.
तंत्रज्ञानाच्या पुरेपूर वापरातून भरघोस उत्पादन
कापूस, मका, कांदा या पारंपारिक पिकांऐवजी त्यांनी आपल्या शेतात शरद सिडलेस द्राक्षाची लागवड केली. सध्या द्राक्ष काढणीचे काम सुरू आहे. तर, उच्च गुणवत्ता असलेल्या डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकर क्षेत्रावर शेततळे तयार करून संपूर्ण क्षेत्राला सुक्ष्म सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने कमी पाण्यात अधिक सिंचन केले जाते. शेतीमध्ये विविध फळ झाडांची लागवड करून तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून भरघोस उत्पादन मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.
द्राक्ष हंगामाची सुरवात होण्यापूर्वी चव चाखण्यासाठी आतूर असलेल्या ग्राहकांकडून द्राक्षाला मोठी मागणी असल्याने बाजारभाव सुद्धा चांगला मिळत आहे. तयार झालेले द्राक्ष बॉक्समध्ये पॅकींग करुन मार्केटला विविध राज्यांतील व्यापारी खरेदी करून नेत आहेत.
''शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असल्याने द्राक्ष लागवड केली. तीन वर्षांपासून उत्पादन सुरू असून, त्यात यश मिळत आहे. मार्केटला द्राक्ष विक्रीसाठी जात असून, चांगला भावदेखील मिळत आहे. अवर्षणग्रस्त भागात अधिक पाणी लागणारे द्राक्षपीक घेणे मोठे जिकरीचे असले तरी नियोजन व परिश्रमाने गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेण्यात यशस्वी ठरलो. परिसरातील शेतकऱ्यांना हा प्रयोग निश्चितच मार्गदर्शक ठरेल.'' - नितीन शिंदे, प्रयोगशील शेतकरी, जळकू
''डाळिंब उत्पादक तालुका म्हणून मालेगाव तालुक्याची ओळख होती. मात्र, मागील काळात डाळिंबावर तेल्या व मर रोगामुळे डाळिंब शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, जिद्दीने शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करून शेती फुलवली. आता पुन्हा डाळिंब लागवड करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. डाळिंबासोबत द्राक्ष लागवड करून दर्जेदार द्राक्ष उत्पादन काढत आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, असे प्रयोग करत असतो.'' - अमोल शिंदे, प्रयोगशील शेतकरी, जळकू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.