sugar factory esakal
नाशिक

Nashik News: साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त; राज्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 20 टक्क्याने घट

गोकुळ खैरनार

Nashik News : राज्यातील साखर कारखान्यांच्या चिमणीचा धूर एप्रिलच्या मध्यातच बंद झाला. २१० पैकी २०९ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १६ एप्रिलपर्यंत संपला. राज्यात गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, वादळ, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे या वर्षी उसाचे उत्पन्नही घटले.

परिणामी, साखर कारखान्यांचा हंगाम १५ ते २० दिवस आधीच संपला. गेल्या वर्षाच्या तुलनेने साखर उत्पादनात २० टक्के घट झाली आहे. (Sugar mills fall season ends 20 percent decrease in production compared to last year in state Nashik News)

गेल्या वर्षी १०० सहकारी व ९९ खासगी अशा एकूण १९९ कारखान्यांमधून १२२३.४२ लाख टन ऊस गाळप होऊन १२७५.३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. या वर्षी १०६ सहकारी व १०४ खासगी अशा एकूण २१० साखर कारखान्यांमधून १०५४.७५ लाख टन उसाचा गाळप होऊन १०५२.७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

गेल्या वर्षी राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४२ होता. या वर्षी तो ९.९८ एवढाच राहिला आहे. यामुळे साखरेच्या उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. साखर कारखाने अपेक्षेपेक्षा लवकर बंद झाल्याने त्याचा परिणाम ऊसतोडणी कामगार, मुकादम, ट्रकचालक, साखर कारखान्यातील कामगार आदींसह विविध घटकांवर झाला आहे.

बहुतांशी कारखान्यांचा हंगाम चार ते पाच महिन्यांचा राहिला. निम्म्याहून अधिक कारखाने फेब्रुवारी-मार्चमध्येच बंद झाले. राज्यात सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्‍वर सहकारी कारखाना कुमथे हा एकमेव साखर कारखाना सध्या सुरू आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. गेल्या तीन वर्षांपासून सर्वदूर होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे उसाचे क्षेत्रही वाढले. गेल्या वर्षासारखा या वर्षीदेखील अतिरिक्त उसाची परिस्थिती निर्माण होईल, असे सुरवातीला वाटत होते.

मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहेत. अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, गारपीट यामुळे उसाला फटका बसला. परिणामी, उत्पादन घटले. तसेच साखर उताराही याच कारणामुळे कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

राज्यातील कोल्हापूर व पुणे हे दोन विभाग साखर उत्पादनात आघाडीवर राहिले. कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांमधून २३१.९२ लाख टन उसाचे गाळप होऊन २६२.४५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले.

साखर उतारा ११.४५ राहिला. पुणे विभागातील ३२ कारखान्यांमधून २२६.०२ लाख टन उसाचे गाळप होऊन २२९.०२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. साखर उतारा १०.१३ एवढा राहिला आहे. सर्वांत कमी साखर उतारा ७.२० नागपूर विभागाचा आहे.

उत्तर महाराष्ट्रात एकरी ऊस उत्पादनात मोठी घट झाली. पर्यायाने साखर उताराही घटला. काही कारखान्यांनी थेट उसाच्या रसापासून व बी हेवी मोलायशपासून इथेनॉलनिर्मिती सुरू केल्याने त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर होऊन साखरेचे उत्पादन घटण्यावर झाला.

"साखर उतारा कमी आल्याने त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीवर होतो. शासनाने ऊस उत्पादक, कामगार, ऊसतोडणी कामगार व साखर उद्योगाबाबत ठोस धोरण आखले पाहिजे."

- कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागात उसाचे एकरी ४० टनापर्यंत उत्पादन घेतले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात काही शेतकरी ४५ टनापर्यंत उत्पन्न घेतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी झाली.

यानंतर बेमोसमी पाऊस व गारपिटीने उसाचे नुकसान झाले. इथेनॉल निर्मिती, गुळाचे कारखाने, रसवंतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस वापरला गेला. काही ठिकाणी हानी पोचलेल्या उसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी देखील झाला. एकूणच नैसर्गिक आपत्तीचा फटका साखर उद्योगातील विविध घटकांना बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT