सुरगाणा (जि. नाशिक) : द्राक्ष पंढरी, कांदा उत्पादनाची जागतिक बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. आता त्या सोबतीला सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसर हा स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका ठरला आहे.
लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीच्या स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला आहे. लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वळत आहेत. (Surgana becoming famous for Strawberry production Better also stopped migration of tribals Nashik News)
गुजरात राज्यातील पर्यटक सप्तश्रृंगी गड, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, वणी, सापुतारा येथे पर्यटनासाठी येत असतात. सापुतारा ते वणी या रस्त्यालगत ठिकठिकाणी पाल बांधून रस्त्याच्या बाजूला विक्रेते विक्री करत आहे.
तालुक्यातील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगांव, घागबारी आदी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, बोरदैवत, वडपाडा सुकापुर या गावांतील शेतकरी स्ट्रॉबेरी या नगदी पिकाकडे वळले आहेत.
या घाटमाथ्यावर गेली पंचवीस वर्षांपूर्वी भात, नागली, वरई, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, खुरशनी, ज्वारी, गहू ही पारंपरिक पिके घेतली जात होती. या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून उत्पादनात वाढ झाली आहे.
स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक पोषक वातावरण, हवामान, जमिनीची पोत असल्यामुळे या भागात शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले.
१७५ हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड
बोरगाव येथील रमेश महाले, पुंडलिक भोये, साजोळे येथील मधुकर गायकवाड या शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी उत्पादन वाढीकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यात १७५ पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.
स्ट्रॉबेरी या नगदी पिकांपासून एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न होत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वळला आहे. स्ट्रॉबेरीचे वाण विंटर डाऊन, सेल्व्हा, राणी, इंटर डाऊन, नाभीया, स्वीट चार्ली, एसए, कामारोजा, इंटरप्लस, चांडलर, स्वीट गोल्ड, यासह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.
या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्वर येथून ८ ते १० रुपये प्रति रोप या दराने आणतात. घाटमाथा परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या हाताला आपल्याच शेतीत काम मिळाल्याने स्थलांतर थांबले आहे.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
शेतकरी हे एक ते दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, अहमदाबाद, पुणे, औरंगाबाद, वघई, भरूच, वाझदा, बडोदा, वलसाड, धरमपूर, नानापोंडा, येथे पाठवतात. प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये भाव मिळत आहे.
धोडांबे येथील माजी सरपंच अशोक भोये यांनी गावातीलच सात ते आठ शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. बोरगावची स्ट्रॉबेरी महाबळेश्वर येथून बंगलोर, पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, गोवा या ठिकाणी पाठवली जात आहे.
"बोरगाव परिसरात खरीप हंगामात पावसावर अवलंबून शेती करत होतो. स्ट्रॉबेरी या नगदी पिकांपासून एकरी उत्पादन चांगले मिळत असल्याने या भागातील शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. शासनाने या पिकाची खरेदी करून यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून विविध प्रकारचे उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे."
- अशोक भोये, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, घोडांबे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.