नाशिक : वडाळा गावातील पतीच्या निर्घृणपणे करण्यात आलेल्या खुनाचा अखेर उलगडा झाला असून, संशयित पत्नीला शहर गुन्हेच्या युनिट दोनच्या पथकाने येवल्यातून अटक केली आहे. नंदाबाई दिलीप कदम (वय ४०) असे संशयितेचे नाव असून, पतीच्या सततच्या छळाला कंटाळून तिने गुरुवारी (ता. २२) अत्यंत थंड डोक्याने मात्र निर्घृणपणे पती दिलीप कदम यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. (Suspect wife arrested in Wadala murder case from yeola Nashik Crime News)
वडाळागावातील माळी गल्ली-कोळवाडा रस्त्यालगत असलेल्या बंद खोलीत शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेतील दिलीप कदम यांचा मृतदेह आढळला होता. त्याची संशयित पत्नी नंदाबाई कदम बेपत्ता होती. याप्रकरणी कदम यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा रोशन कदम याच्या फिर्यादीवरून सावत्र आई नंदाबाईविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दिवसांपासून इंदिरानगर पोलिसांसह गुन्हेशाखेचे पथके संशयित महिलेचा शोध घेत होते. नाशिकसह येवला, औरंगाबाद, वैजापूर परिसरात पथके शोध घेत होते. संशयित महिलेकडे संपर्काचे कोणतेही साधन नसल्याने पारंपरिक पद्धतीने पोलिस शोध घेत होते. दरम्यान, संशयित नंदाबाई येवल्यात असल्याची माहिती मिळताच गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक येवल्यात पोचले आणि सोमवारी (ता. २६) पहाटे शिताफीने अटक केली.
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, राजेंद्र जाधव, गुलाब सोनार, संजय सानप, अतुल पाटील, वैशाली घरटे यांनी ही कारवाई केली. अधिक तपासासाठी संशयित नंदाबाई हिला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सततचा छळ
मृत दिलीप कदम यांची संशयित नंदाबाई ही दुसरी पत्नी आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री जेवण झाल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे नंदाबाईला पाय दाबण्यास सांगितले. नेहमीप्रमाणेच दिलीप नंदाबाईला पाय दाबताना लाथाडत होता. तसेच शिवीगाळ करून मारहाणही केली. या सततच्या छळाला कंटाळून नंदाबाईने त्याच्या डोक्यात जोरात फळी मारली.
यात तो बेशुद्ध झाला. मात्र, शुद्धीवर आल्यानंतर तो पुन्हा मारहाण करील, म्हणून त्याचे हातपाय बांधले आणि दिलीपचा दोरीने गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने पोटात, छातीत भोकसले आणि मानेवरही वार केले. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने त्यास पलंगाखाली दडविले. पहाटेपर्यंत तिने घराची साफसफाई केली. शुक्रवारी (ता. २३) दिवसभर ती घरातच होती. त्यानंतर ती पतीच्याच बहिणीकडे मुक्कामी गेली आणि शनिवारी येवल्याला निघून गेली.
"संशयित महिलेला येवल्यातून गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली असून, पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा खून तिने एकटीनेच केल्याचे तिच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे." - संजय बारकुंड, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.