Nashik News : नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मराठा आरक्षणामुळे आधीच वातावरण तापलेले असताना त्यात पाणी सोडल्यास मराठवाडा विरुद्ध नाशिक, नगर असा तीव्र संघर्ष निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून तूर्त पाणी न सोडण्याच्या तोंडी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्याचे समजते. प्रशासनाला मात्र लेखी आदेशाची प्रतीक्षा असून, जिल्हाधिकारी जलज शर्मा बुधवारी (ता. १) नाशिकमध्ये आल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. (Temporary suspension of water release to Jayakwadi dam nashik news)
मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातून तीन टीएमसी, तर अहमदनगर जिल्ह्यातून साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचे आदेश सोमवारी (ता. ३०) प्राप्त झाले आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याची संपूर्ण तयारी केली आहे.
कुठल्या धरणातून किती पाणी सोडायचे, यादृष्टीने जलसंपदा विभागाला आदेश देण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश असले तरी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे नाशिकमध्ये नसल्यामुळे ते आल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गावागावांत अगोदरच मराठा आरक्षणाने वातावरण पेटलेले असताना त्यात पाण्याची ठिणगी पडल्यास या आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा धसका घेत लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेतला आहे.
पुढे काय होईल?
पाणी सोडले नाही तर न्यायालयाचा अवमान केल्यासारखे होईल आणि पाणी सोडले तर जिल्ह्यातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी नाशिकमध्ये आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे कारण सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी नाशिकमध्ये आल्यानंतर पाणी सोडावे लागेल. त्याला स्थगिती द्यायची झाल्यास, तसेच लेखी आदेश द्यावे लागतील.
आज मंत्रालयात बैठक
जायवाडीला पाणी सोडण्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला असून, यासंदर्भात मंत्रालयात बुधवारी (ता.१) बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत पाणी सोडण्यास स्थगितीचा निर्णय झाला तरच नाशिकचे पाणी वाचू शकते. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आमदार सरसावले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळते, हे येत्या काही दिवसांत कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.