नामपूर : अत्यंत टोकाच्या राजकारणातून ग्रामविकासाची स्वप्न दाखविणाऱ्या लोकशाहीचा उत्सव म्हणून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ओळखल्या जातात.
यंदा ५ नोव्हेंबरला तालुक्यातील अत्यंत्य संवेदनशील व मातब्बर ४५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिकसह पोटनिवडणुका होणार आहेत. ऐन हिवाळ्यात निवडणुकीचा फड तापणार आहे.
तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पॅनलचे नेते, गावपुढारी यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
यंदा गावागावांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने निवडणुका चुरशीच्या होतील, यात शंका नाही. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक तरुणाईभोवती केंद्रित होणार आहे. (Thrill of Gram Panchayat Election in Baglan As number of aspirants more square will increase Nashik News)
ग्रामपंचायत निवडणुकींच्या इतिहासावर नजर टाकली असता, तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत. यंदाही चुरशीची परंपरा कायम राहील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. काही गावांमध्ये फेररचना करण्यात आल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. वॉर्ड फेररचनेत झालेला बदल, महिलांचे आरक्षण यामुळे इच्छुक उमेदवारांना अन्य वॉर्डमध्ये आपले नशीब अजमावे लागणार आहे.
इच्छुक तरुणांच्या स्पर्धेमुळे निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. गावनिहाय विजयी होणाऱ्या उमेदवारांचा पॅनलप्रमुखांकडून शोध सुरू आहे.
इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे बागलाणमध्ये आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणूक होणारी गावे
चिराई, भवाडे, केळझर, भाक्षी, मुळाणे, केरसाणे, जामोटी, तताणी.
पोटनिवडणूक होणारी गावे
आखतवाडे, कपालेश्वर, खामलोण, जोरण, तुंगणदिगर, भिलवाड, मोरकुरे, विसापूर, पिंगळवाडे, नांदीन, पारनेर, किकवारी खुर्द, सुराणे, अलियाबाद, बिजोरसे, इजमाने, मोराणे-सांडस, शेवरे, नळकस, जुनी शेमळी, सारदे, ठेंगोडे, करंजखेड, चाफापाडा, निकवेल, मळगाव-खुर्द, कोतरवेल, वाघळे, जाखोड, महड, गोराणे, माळीवाडे, गोळवाड, देवठाण-दिगर, तळवाडे-दिगर, श्रीपुरवडे, अजमेर सौंदाणे.
निवडणूक कार्यक्रम असा :
- निवडणूक सूचना प्रसिद्धी : ६ ऑक्टोबर
- अर्ज सादर करणे ः १६ ते २० ऑक्टोबर
- अर्जांची छाननी : २३ ऑक्टोबर
- उमेदवारी अर्ज माघारी : २५ ऑक्टोबर.
- निवडणूक चिन्ह वाटप : २५ ऑक्टोबर
- मतदान ः ५ नोव्हेंबर.
- मतमोजणी व निकाल : ६ नोव्हेंबर.
"जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १४९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या, २०२२ मध्ये चुकीच्या प्रभाग रचनेमुळे निवडणुकाच होऊ न शकलेल्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे." - बबनराव काकडे, उपविभागीय अधिकारी, बागलाण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.