Sinnar Traffic Problem : सिन्नर शहरात जाण्यासाठी प्रमुख मार्ग असलेला खासदार पूल परिसरातील नाशिक वेस, लाल चौक, बाजार वेस, गणेश पेठ परिसरात वेळोवेळी सकाळ, दुपार, सायंकाळी वाहतूक कोंडी होऊन कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने सायंकाळनंतर वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे.
वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या कोंडीत तासनतास अडकून पडावे लागत आहे. अनेक दुचाकी, चारचाकीचालक मनाला वाटेल त्या ठिकाणी कार उभी करुन निघून जात असल्याने येथून मार्ग काढताना इतर वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
शालेय विद्यार्थ्यांना सकाळी व दुपारी शाळेत जाताना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. (Traffic congestion in Sinnar khasdar bridge area nashik news)
त्यांना सायकलवर शाळेत जावे लागत असल्याने वाहतूक कोंडीत अडकल्याने शाळेत व घरी जाण्यासाठी वेळ लागत असल्याने पालकही चिंता करतात. त्यामुळे नगरपरिषद व पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नाशिकवेस परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झालेला असताना आत येथून जवळ असलेल्या खासदार पूल परिसरातही वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत आहे. खासदार पुलापासून नाशिकवेस, गंगावेस, भाजीबाजार तसेच गणेश पेठकडे सहज जाता येते.
सध्या आडवा फाट्यापासून सरदवाडी रोडलगत अनेक उपनगरे वसली आहेत. त्यांना गावात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे देवी रोड हाच आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस नाशिकवेस, गंगावेस परिसरात मोठा भाजीबाजार भरतो. शनिवारी माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतील कारखान्यांना सुट्टी असल्याने सर्व कामगार यादिवशी बाजाराला गर्दी करत असतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रविवारी सिन्नरचा आठवडे बाजार असल्याने यादिवशीही परिसरात मोठी गर्दी होत असते. बाजारात खरेदीसाठी अनेक कारचालक, दुचाकीधारक खासदार पूल परिसरात मनाला वाटेल त्याठिकाणी आपली वाहने पार्क करून तासनतास खरेदीसाठी जात असल्याने इतर वाहनधारकांना तेथून मार्ग काढण्यास मोठी अडचण निर्माण होते.
त्यामुळे इतर वाहनधारकांना तासनतास या वाहतूक कोंडीतच अडकून पडावे लागत असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने अनेक कारचालकांनी आपल्या कार वाटेल तिथे लावून गेल्याने मोठी वाहतुक कोंडी होते.
दोन तास झाली वाहतूक कोंडी
शनिवारीही सुटी असल्याने अशीच कोंडी खासदार पुलावर झाली. या कोंडीत अडकून पडलेल्या वाहनधारकांना धड मागेही जाता येत नव्हते आणि पुढेही जाता येत नसल्याने बाचाबाचीही होत होती. अनेक पादचारीही यात अडकून पडल्याने त्यांच्याकडून संताप करण्यात येत होता. जवळपास दोन तास ही वाहतूक कोंडी झाल्याने हतबल झालेल्या काही वाहनधारकांनी खाली उतरून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.
या कोंडीबाबत परिसरातील व्यावसायिकांनी पोलिसांना माहिती देऊनही पोलिस उशिरा पोचले, नंतर त्यांनी हळहळू वाहतूक कोंडी दूर केली. मात्र, यामुळे अनेक वाहनधारकांकडून संताप व्यक्त होता. त्यामुळे नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने शहरातील सर्वच भागात बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
"वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही कारवाई होत नाही. वाहतुकीचे नियोजन होत नसून नाशिकवेस व गणेशपेठ या दोन्ही भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. आता शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
बेशिस्त वाहनधारकांसह रस्त्यावर भाजी, फळे व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांमुळेही यात अधिकच भर पडत आहे. वाहतूक कोंडीची समस्या कशी दूर करता येईल यावर आता प्रशासनाने दीर्घकालिन नियोजन करण्याची गरज आहे." - मनोज कृष्णाजी भगत, माजी नगरसेवक, सिन्नर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.