tribal community esakal
नाशिक

‘नो बेड...’ ‘नो रेमडेसिव्हिर...’ ‘नो व्हेंटिलेटर...’

महेंद्र महाजन

गैरसमजुतीने सरकारी दवाखान्याची पायरी न चढणाऱ्या आणि उपचाराविषयी भीती बळावल्याने घर न सोडणाऱ्या रुग्णांच्या दारी नाशिक जिल्हा परिषदेचे डॉक्टर गेले. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी रुग्णांचा नाशिकचे आयुर्वेदतज्ज्ञ विक्रांत जाधव यांच्याशी ऑनलाइन संवाद घडवून आणला.

नाशिक : ‘नो बेड...’ ‘नो रेमडेसिव्हिर...’ ‘नो व्हेंटिलेटर...’ कोरोनामुक्तीमध्ये ही त्रिसूत्री राहिलीय ‘सुरगाणा पॅटर्न’ची. आश्‍चर्य वाटले ना तुम्हाला? पण हो, हे खरे आहे. कारण आदिवासींची स्वीकारार्हता असलेल्या आयुर्वेदच्या माध्यमातून हे सहज शक्य झाले आहे. (Tribal-community-free-from-corona-Surgana-pattern-nashik-marathi-news)

आयुर्वेदाच्या स्वीकारार्हतेतून डॉ. विक्रांत जाधवांनी आदिवासींना केले कोरोनामुक्त

गैरसमजुतीने सरकारी दवाखान्याची पायरी न चढणाऱ्या आणि उपचाराविषयी भीती बळावल्याने घर न सोडणाऱ्या रुग्णांच्या दारी नाशिक जिल्हा परिषदेचे डॉक्टर गेले. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी रुग्णांचा नाशिकचे आयुर्वेदतज्ज्ञ विक्रांत जाधव यांच्याशी ऑनलाइन संवाद घडवून आणला. शारीरिक चिकित्सा आणि लक्षणांच्या आधारे ‘आयुष’मान्य डॉ. जाधव यांची आयुर्वेदिक औषधे सरकारी डॉक्टरांप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरपोच दिली. तीही मोफत...

कोरोनामुक्ततेचे यश ‘सुरगाणा पॅटर्न’मध्ये मिळाले

ऑक्सिजनची पातळी ८० पर्यंत घसरलेल्या रुग्णांना आयुर्वेदिक औषधांनी कोरोनामुक्त करण्यापर्यंतचे यश ‘सुरगाणा पॅटर्न’मध्ये मिळाले. शिवाय सुरगाणा कोरोना केअर सेंटर, डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमधील रुग्णांची ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत झाली व कोरोनामुक्त होऊन रुग्ण घरी गेले. कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या दिवस, चार दिवस, दहा दिवस आणि पंधरा दिवस झालेल्यांचा समावेश आयुर्वेदिक उपचारांमध्ये आहे. त्याचवेळी ‘पोस्ट कोविड’चे ५ ते ३५ दिवस झालेल्यांमधील आजाराची लक्षणे निश्‍चित व नेमक्या औषधांमुळे संपुष्टात आली. चौदा महिन्यांत कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार झालेल्या आयुर्वेदिक औषधांच्या ‘कॉम्बिनेशन’ पद्धतीचा उपयोग डॉ. जाधव यांनी ‘टेलिमेडिसिन’ उपचार प्रणालीत केला. दोन आठवड्यांहून अधिक कालावधीत गंभीर स्वरूपाचे दहा, तर कोरोनाग्रस्त आणि ‘पोस्ट कोविड’चे तीनशे जण शारीरिक समस्यांमधून बरे झालेत. याची आणखी एक फलश्रुती म्हणजे गैरसमज आणि भीतीपोटी सरकारी दवाखान्यात न येणाऱ्या आदिवासींचा जिल्हा परिषदेच्या सरकारी डॉक्टरांशी पुन्हा ऋणानुबंध प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. लायन्स क्लब ऑफ पंचवटी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील रक्तांचे नमुने तपासण्या सुरगाण्यातील प्रयोगशाळेतील मनुष्यबळाचे योगदान उपक्रमात मिळाले.

उपक्रमाची पूर्वतयारी

आदिवासींचा उपचाराविना घरी राहण्याकडे कल वाढतोय म्हटल्यावर सुरगाणा-कळवणचे आमदार नितीन पवार यांनी आयुर्वेदिक उपचार मिळावेत म्हणून डॉ. जाधव यांच्याशी संपर्क साधला. सुरगाणा तालुक्यातील विविध भागांतील स्थानिकांशी संवाद साधल्यावर श्री. पवार आणि डॉ. जाधव यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा आराखडा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्यापुढे ठेवला. जिल्हा परिषदेने आयुर्वेदिक उपचारासाठीची तयारी दर्शवताच, श्री. क्षीरसागर, श्री. पवार, श्रीमती बनसोड, डॉ. जाधव, डॉ. आहेर यांनी सुरगाणा तालुक्याची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे, मोहपाडा, काठीपाडा, उंबरठाणच्या आदिवासींशी थेट गावात जाऊन संवाद साधला. त्यात आदिवासींमध्ये नैसर्गिक चिकित्सापद्धती आणि आयुर्वेदाची स्वीकारार्हता असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सुरगाणा- कळवणचे माजी आमदार जे. पी. गावित आणि भारतीय जनता पक्षाचे एन. डी. गावित यांची डॉ. जाधव यांच्याशी भेट झाली. या दोघांनीही आयुर्वेदिक उपचारांकडे आदिवासींच्या असलेल्या कलाची माहिती देत मोफत उपचार उपक्रमाचे स्वागत केले. पुढे डॉ. आहेरांनी डॉ. जाधव यांच्यासमवेत ऑनलाइन पद्धतीने सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद घडवून आणला. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांनी व्यक्ती-प्रकृतीप्रमाणे चिकित्सा करायची आणि रुग्णांना नेमकी आयुर्वेदिक औषधे दिल्यास झटकन गुण येईल व त्यातून डॉक्टरांवरील विश्‍वास वाढेल, यावर एकमत झाले. ‘आयुष’चा प्रोटोकॉल सांभाळून दुसऱ्या दिवशी म्हणजेच, १७ मेपासून चिकित्सा व उपचाराला सुरवात झाली. ती पुढे सुरू आहे. त्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३८ उपकेंद्रे, दोन फिरती पथके, तीन बैठी पथके, सुरगाण्यातील कोरोना केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर या सेवेतील डॉक्टर, मानसेवी डॉक्टर, समूह आरोग्याधिकारी यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

पहिल्या दोन रुग्णांचा ऑक्सिजन चार दिवसांत पोचला ९५ पर्यंत

काठीपाड्यामधील स्थानिक कार्यकर्ते चिंतामण गावित यांच्या पुढाकारातून झालेल्या आदिवासी लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर परतत असताना ऑक्सिजनची पातळी घसरल्याने गुजरातमधून सुरगाण्याला घेऊन निघालेल्या स्थानिक रुग्णाची चिकित्सा सरकारी डॉक्टरांनी केली. डॉ. जाधव यांनी सोबतची आयुर्वेदिक औषधे दिली. तत्पूर्वी शिंदेमध्ये घरीच असलेल्या रुग्णाला डॉ. जाधवांनी आयुर्वेदिक औषधे सरकारी डॉक्टरांकडे दिली होती. चार दिवसांनंतर या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पर्यंत पोचल्याची माहिती सोशल मीडियासोबत ‘माउथ पब्लिसिटी’च्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यात पोचली. त्यातून सरकारी डॉक्टरांमधील उत्साह दुणावत असताना आदिवासींची पावले या डॉक्टरांकडे उपचारासाठी येण्यासाठी वळू लागल्याने पहिल्या दोन दिवसांत ‘ओपीडी’ वाढली. आयुर्वेदिक चिकित्सा, औषधांच्या जोडीला सरकारी डॉक्टरांनी डॉ. जाधव यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार-विहाराची माहिती आदिवासींपर्यंत पोचवली. या उपक्रमावरचा आदिवासींचा एवढा विश्‍वास उंचावला, की आता आदिवासी बांधव सरकारी दवाखान्यात मणके, गुडघे, पोटाचे विकार आणि बालकांच्या कुपोषणावर इलाज करून घेऊ लागलेत. जिल्हास्तरावरून डॉ. आहेर रोज एकूण दिवसभरातील कामकाजाची माहिती सुरगाणा तालुक्यातील डॉक्टरांकडून जाणून घेतात.

कोरोना महामारीत आदिवासी बांधवांमध्ये आजाराबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे आदिवासी बांधव उपचारासाठी टाळाटाळ करू लागले. अशावेळी नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांनी ‘माझा डॉक्टर’ ही मोहीम हाती घेऊन सुरगाणा आदिवासीबहुल तालुक्यात आयुर्वेदिक उपचार सुरू केले. त्याचा चांगला फायदा आदिवासी बांधवांना झाला. सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी चांगले योगदान दिले. उपक्रमाला चांगले यश मिळाल्याने जिल्ह्यातील इतर आदिवासी भागात असा उपक्रम राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. हा ‘सुरगाणा पॅटर्न’ राज्यासह देशातील कोरोनायोद्ध्यांना प्रोत्साहित करणारा आहे. - छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

सुरगाणा तालुक्यातील आमचे बांधव कोरोनावर उपचार घेत नाहीत. त्यावर गृहविलगीकरणातून आयुर्वेदिक उपचार हा चांगला मार्ग ठरू शकतो हे जाणवल्याने वैद्य विक्रांत जाधव यांची भेट घेतली. त्यांनी सामाजिक सामिलकीतून आदिवासींसाठी मोफत उपचाराची तयारी दर्शवली. त्यांच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद आमचे बांधव देताहेत आणि कोरोनामुक्त तालुक्याच्या दिशेने आम्ही निघालो आहोत. जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य मोठे आहे. सुरगाण्यातील यशानंतर आम्ही कळवणमध्ये या उपक्रमाचा विस्तार करण्याची तयारी करत आहोत. - नितीन पवार, आमदार, सुरगाणा-कळवण

नाशिक जिल्ह्यातील पन्नास टक्के क्षेत्र आदिवासीबहुल आहे. सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला. आदिवासींचा आयुर्वेदाकडे असलेला कल लक्षात घेऊन वैद्य विक्रांत जाधव यांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. श्री. जाधव यांच्या ‘आयुष’मान्य उपचार पद्धतीचा आदिवासींना दिलासा मिळाला आहे. आमच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य उपक्रमात लाभले. - बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा परिषद

नाशिकमधील वैद्य विक्रांत जाधव यांच्या अनुभवाचा फायदा जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांना आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचारासाठी झाला. त्यांच्या क्षमतांचा विकास झाला. ‘कम्युनिटी हेल्थ केअर’ अंतर्गत घरात राहून आयुर्वेदिक औषधांनी बरे होता येत असल्याचा आत्मविश्‍वास आदिवासींमध्ये दुणावल्याने त्यांच्यातील सरकारी दवाखान्यातील जाण्याची भीती दूर होण्यास मदत झाली. कोरोना होऊ नये, कोरोनाग्रस्त आणि ‘पोस्ट कोविड’ असे त्रिस्तरीय शाश्‍वत मॉडेल ‘सुरगाणा पॅटर्न’मधून साकारले गेले. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जोड देण्यात आली आहे.

- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

जिल्हा परिषदेचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास सुरवात केली होती. मात्र गैरसमजुतीमुळे रुग्ण उपचारासाठी टाळाटाळ करत होते. अशा काळात आदिवासींना आवडणाऱ्या नैसर्गिक जीवनपद्धतीची माहिती देत आयुर्वेदिक औषधांच्या उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आदिवासी तयार झाले आणि त्याचे चांगले परिणाम सुरगाणा तालुक्यात पाहावयास मिळताहेत.

- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT