Koshinpana esakal
नाशिक

मोबाईलला रेंज, पण रस्ता नाही; कोशिनपाना येथील आदिवासींच्या व्यथा

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोशिनपाना... वाघेरा (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीचा पाचशे आदिवासी लोकवस्तीचा पाडा. इथे मोबाईलची रेंज मिळते; पण इथल्या आदिवासींना सात किलोमीटरवरील वाघेरा, हरसूल अन्‌ चिंचवडला जाण्या-येण्यासाठी रस्ता नाहीये. त्यामुळे रोजच्या संपर्कासाठी इथल्या मुलांपासून ज्येष्ठांना दरी-डोंगरातील पायवाटेने जावे लागते. पावसाळ्यात इथल्या आदिवासींचा चार महिने संपर्क तुटलेला असतो. भारतीय संस्कृतीत दिवाळी साजरी करण्यासाठी एकीकडे घराघरांमध्ये तयारी झाली असली, तरीही कोशिनपाना पाड्यावरील आदिवासींपुढे दैनंदिन प्रश्‍नांची वानवा कायम आहे.

जन्म-मृत्यूच्या नोंदीअभावी नागरिकत्वाचा प्रश्‍न

पाड्यावरील विहिरीतून रोजच्या जगण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागतो. पण उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य वाट्याला येते. पाणीपुरवठ्यासाठीच्या व्यवस्थेचा निराळा प्रकार इथे पाहायला मिळतो. वाघेरा गावातून पाइपलाइनद्वारे इथल्या विहिरीत टँकरचे पाणी पोचावे म्हणून पाइलपलाइन करण्यात आली खरे. मात्र, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून विहीर खोदण्याची दक्षता यंत्रणेने घेतलेली नाही. हे कमी की काय, म्हणून गेल्या तीस वर्षांपूर्वीपर्यंत जन्म-मृत्यूच्या नोंदी नसल्याने आदिवासींपुढे नागरिकत्वाचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी जातीचा आणि जातपडताळणीचा दाखला मिळणे कठीण झाले.

दिवाळीसाठी कष्टकरी परतले

जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा पाड्यावर आहे. सोळा मुले आणि बारा मुलींच्या अध्यापनाची व्यवस्था इथे असून, दोन शिक्षक जिल्हा परिषदेने दिले आहेत. त्यातील अंबादास बेंडकोळी हे शिक्षक सुटीच्या दिवशीही शाळेत होते. पोषण आहार डोक्यावरून शाळेत आणावा लागतो, असे आदिवासी सांगत होते. चिंचवड पाझर तलाव पाड्याच्या उशाला आहे. त्यामुळे आताच पावसाळा संपल्याने हा परिसर आपण जणू जम्मू-काश्मीरमध्ये आहोत की काय, असे वाटावे इतका निसर्गराजीने नटलेला आहे. पाड्यावर दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालेले पाऊणशे तरुण आहेत. आपल्या घरातील कर्त्या आई-वडिलांसह जगण्यासाठी गिरणारे, नाशिक, सिन्नरमध्ये शिधा बांधून पंधरा ते वीस दिवसांसाठी मजुरीला जातात. शिधा संपला, की पुन्हा शिधा नेण्यासाठी पाड्यावर येतात. सद्यःस्थितीत मजुरीसाठी गेलेले आदिवासी दिवाळीसाठी पाड्यावर परतले आहेत.

रूग्णांना उपचारासाठी न्यायला डोलीचा आधार

पाड्यावर आजारी पडलेल्यांना वाघेरा, हरसूलच्या दवाखान्यात नेण्यासाठी डोली करावी लागते. रस्त्यात मध्येच रुग्ण दगावल्यास तशी डोली परत फिरवावी लागते, अशी व्यथा सणासुदीच्या उत्साहात मांडताना आदिवासी बांधवांचे डोळे पाणावलेले होते. रेशनचे काय असते, या प्रश्‍नाला उत्तर देताना आदिवासी बांधवांनी रेशन डोक्यावर घेऊन आणावे लागत असल्याचे सांगितले. इथल्या ग्रामपंचायतीच्या सदस्या यशोदा लहानू भोये म्हणाल्या, की आमच्या आदिवासी बांधवांना पंधरा ते वीस हजार रुपये सालाने शेतांमध्ये कामाला जावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी सालाच्या रकमेत भागत नसल्याने अंगावर लाखो रुपयांची उचल झाली असल्याने दुसरीकडे जादा मजुरी मिळत असतानाही साल सोडता येत नाही. पाड्यावर भात, नागली, वरई ही पिके पावसाच्या भरवशावर घेतली जातात.

कोशिन वृक्षाचे वरदान

कोशिनपाना हे पाड्याचे नाव कशावरून मिळाले असावे, याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला. त्या वेळी इथले लहानू त्र्यंबक भोये म्हणाले, की पाड्याच्या भोवती मोठ्या प्रमाणात जंगल होते. वाघ, बिबट्यांचे दर्शन पाड्यावर घडायचे. आता जंगल राहिले नसल्याने हे वन्यजीव पाहायला मिळत नाहीत. पाड्यावर आताच्या विहिरीच्या भागात कोशिन वृक्ष होता. त्याच्या पानांपासून कुडाच्या घरांवर छत अंथरले जायचे, तसेच वृक्षाजवळ झरा होता. त्याच्या पाण्याचा वापर केला जायचा. त्यामुळे कोशिनपाना हे पाड्याचे नाव झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT