Nashik News : कोकणातील बारसूच्या रिफायनरी प्रकल्पासंबंधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी मंगळवारी (ता. २५) येथे केला. (uday samant statement about uddhav thackeray and Barsu Refinery Project nashik news)
तसेच उद्योग बाहेर गेले, असे म्हणणाऱ्यांनी आता उद्योग येत असताना त्याला विरोध का, याचे उत्तर द्यावे, असेही त्यांनी सांगितले. उद्योग विभागाच्या आढावा बैठकीच्या समारोपासाठी श्री. सामंत नाशिकमध्ये आले असताना त्यांनी रिफायनरीच्या विरोधकांना उत्तर दिले. आठ दिवसांमध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हे प्रकल्प समर्थक आणि विरोधकांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आंदोलन कमी झाले.
प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतलेल्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी आणि सरकार तयार असून, सकारात्मक चर्चा व्हावी, असे सांगत असताना श्री. सामंत यांनी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोध चालला आहे, असा आरोप करत त्यांनी खोके-गद्दर म्हणून दिशाभूल करून चालणार नाही, अशा शब्दांमध्ये ठणकावले. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू असल्याचेही सांगायला त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही.
श्री. सामंत म्हणाले, की रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी बोअर घेण्याचे काम सुरू आहे. शंभर पैकी १८ बोअर झाले आहेत. ४६ जणांनी संमत्ती दिली आहे. शिवाय पाच हजार एकर जागेसाठी दोन हजार ९०० एकरची परवानगी मिळाली आहे, असे असतानाही जालियनवाला बागची तुलना केली जात आहे. कोण सांगतं आहे, की उद्धव ठाकरे हे भेट देणार आहेत. पण श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधानांना पत्र लिहिले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्यात बारसूमध्ये तेराशे एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे नमूद केले आहे. हा प्रकल्प आल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. त्यामुळे आता कोण ‘मॅनेज' झाले, हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी ते मुख्यमंत्री असते, तर हा प्रकल्प पुढे गेला असता. समृद्धी महामार्गाच्या कामात तेच झाले. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विट केले, तो गैरसमज होता. सर्व पक्षांच्या नेत्यांनी कोकणाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे.
उदय सामंत म्हणाले...
० ‘समृद्धी’प्रमाणे चांगले पॅकेज दिले जाईल
० शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांना भेटायला जाणार नाही
० भास्कर जाधव जे बोलले आहेत, तो यंदाचा सर्वांत मोठा विनोद आहे
० येत्या सात दिवसांमध्ये वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्पांबाबतची श्वेतपत्रिका काढणार
इंडियाबुल्सने उद्योग उभे करावेत अन्यथा जमीन शेतकऱ्यांना द्यावी
सिन्नर (जि. नाशिक) औद्योगिक क्षेत्रातील सुमारे चार हजारांपेक्षा अधिक हेक्टर जमीन इंडियाबुल्स कंपनीने घेतली खरी. पण आजपर्यंत कुठलाही उद्योग उभा करू शकले नाहीत. म्हणून जमीन ही शेतकऱ्यांना परत करावी, असे सांगून श्री. सामंत यांनी इंडियाबुल्स जमीनविषयक अभ्यास सुरू असून, आवश्यकता भासल्यास कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले. पुण्यात सात हजार एकर जमीन शेतकऱ्यांना परत केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये असा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पंधरा वर्षांपासून मुसळगाव, गुळवंच, देवपूर, पागंरी आदींसह विविध गावांतील इंडियाबुल्स कंपनीने जमीन घेतली. टप्प्याटप्प्याने उद्योग उभा करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. मात्र कंपनीने एकही उद्योग उभारला नाही. त्यातच किमान दोन हजार हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून उद्योग आणावेत, असा प्रस्ताव राजकीय नेते आणि उद्योग संघटनांनी दिला होता.
भूसंपादनावेळी शेतकरी आणि प्रशासनामध्ये संघर्ष झाला होता. एका पोलिस अधिकाऱ्याला गावातील मंदिरात डांबून ठेवण्यात आले होते. अनेकांनी भीतीपोटी गाव सोडले. अशा परिस्थितीत कंपनी उद्योग उभारणार नसल्यास एवढा खटाटोप का केला? असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. त्यावर निर्णय झाला नसल्याने जमीन पडून आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. सामंत म्हणाले, की इंडियाबुल्स कंपनी जमिनीवर उद्योग उभारत नसेल, तर जमीन एमआयडीसी अथवा संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.