Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गावरील नियमितपणे होणारी वाहतुकीची कोंडी व महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची व्हायला हवी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी सुरू असलेले अंडरपास अपघातांचे कारण ठरत आहेत.
महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबद्दल शासकीय यंत्रणेकडून सरकारी भाषेत उत्तर दिले जाते. मानवी चुकांमुळे अपघात घडत असल्याचा ठपका ठेवला जातो; पण महामार्गावर खासगी कंपन्यांमार्फत सुरू असलेले अंडरपास व सर्व्हिस रोड कामांमध्ये होणारी दिरंगाई हेही घटक अपघातांना तितकेच जबाबदार आहेत. (Underpass on Nashik Mumbai highway dangerous nashik news)
ज्या मोठ्या कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाकडून कंत्राट मिळालेले आहे, त्यांनी कामे उपकंत्राट पद्धतीने दिलेली आहेत. अशांची बिले वेळेवर अदा न झाल्याने काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्षानुवर्षे संथ गतीने काम होणार असेल, तर त्यामुळे वाहतुकीचा अडसर होऊन ते अपघातांचे कारणही बनत आहे.
ज्या शासकीय विभागाकडे या कामांची देखरेखीची जबाबदारी आहे, त्या अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करून मुदत वाढवून घेण्याचे उद्योग संबंधित कंपन्या करीत आहेत. रस्त्यावर असलेले मोठमोठे खड्डे, दिशादर्शक पांढरे पट्टे नसल्यानेही अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
धुळे- नाशिक- ठाणे या संपूर्ण महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. या महामार्गावर कसारा, वासाळा, खरडी, वाशिंद, आसनगाव, घोटी, इगतपुरी, धुळे येथे अनेक ठिकाणी अंडरपासचे काम सुरू आहे. धुळे- मुंबई महामार्गावरील सर्वाधिक वाहतूक कोंडी कसारा ते ठाणे रस्त्यावर होते. रहदारीची कोंडी टाळण्यासाठी क्रॉसिंग आणि क्रॉसिंग टाळण्यासाठी अंडरपास बनविले जातात.
मात्र, ही कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. वाहतूक कोंडीच्या अनुभवांमुळे पूर्वीचा रस्ताच बरा होता, असे वाहनधारक आता उघडपणे म्हणू लागले. रस्ता रुंदीकरण करून त्यावर छोटे-छोटे पूल उभारणे गरजेचे आहे; पण इतका उशीर जर लागत असेल तर आजारापेक्षा उपाय जालीम असे म्हणण्याची वेळ आली. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, सर्व्हिस रोड, मार्किंग साईन बोर्ड, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर साचणारे पाणी याबद्दल कुणीही कंत्राटदार व महामार्गाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत.
महामार्ग प्राधिकरणाकडून अपेक्षा
इगतपुरी ते ठाणे दरम्यानचे काम वरुणचंद्र डेव्हलपर्स अॅन्ड कॉन्ट्रॅक्टर्स व रॉकटेक कॉन्ट्रॅक्टर या कंपन्यांना मिळालेले आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी या महामार्गावर होते. अतिशय संत गतीने चालणारे हे काम या कंपन्यांकडून वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.