Nashik News : तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात सतत घोटाळे बाहेर येत होते. मात्र, गत दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व क्षेत्रात भरारी घेत असून, भारतीय अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानी आली आहे.
मध्यमवर्गीय, गरीब यांच्यापर्यंत सेवा, पतपुरवठा पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने सहकार विभागाची निर्मिती केली. (Union Minister of B L Verma statement on Contribution of cooperatives in empowering India economically nashik news)
भारताला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यात सहकार विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी केले. सहकार क्षेत्रातील बॅंकिंग, पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात दोनदिवसीय महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद २०२३-२४ ला सुरवात झाली. शनिवारी (ता. २७) परिषदेचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री तथा स्वागताध्यक्षा डॉ. भारती पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर, दि महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकारी भारतीच्या अध्यक्षा शशीताई आहिरे, नॅफकबचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, एनसीयूआयचे अध्यक्ष दिलीप संघानी, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्यासह राज्यातील विविध सहकारी संस्था सहकारी, बँका यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री वर्मा म्हणाले, की मोदी यांनी सहकार हे स्वतंत्र खाते निर्माण करून त्याची जबाबदारी तेवढ्याच सक्षम असणाऱ्या अमित शहा यांच्याकडे सोपविली. सहकार विभागातील संस्थांना देखील निश्चितपणे काही अडचणी भेडसावत आहेत. त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सहकार विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिल्लीत सविस्तर बैठक बोलावू, असे वर्मा म्हणाले. केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी या वेळी दिली.
या वेळी कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी परिषदेला दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे सादरीकरणाद्वारे वाचन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, सहकार परिषदेचे आयोजक व अध्यक्ष विश्वास ठाकूर, नागरी सहकारी बँकांचे संचालक अजय ब्रह्मेचा, माजी खासदार दिलीप संघानी यांच्यासह परिषदेच्या अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वसंत खैरनार, डॉ. सुलभा कोरे यांनी सूत्रसंचालन केले.
निधी कर्ज खात्यात वळता करू नका : डॉ. भारती पवार
दोनदिवसीय परिषदेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील बँकांना येणाऱ्या अडचणी व सूचना यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात डिजिटायझेशनमुळे खूप मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. सहकारातून समृद्धी यातूनच नागरी सहकारी बँकांना आर्थिक पाठबळ देऊन सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाची मदत होत आहे.
आतापर्यंत साधारण २८ कोटी जनधन योजनेची बँक खाती उघडण्यात आली असून, याचा खूप लाभ होत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळणारा विविध मदतनिधी हा थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणारा निधी हा त्यांच्या कर्ज खात्यात वळता करू नये, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी या वेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.