लेखक : डॉ. राहुल रनाळकर
खानदेश उन्हाळ्यासाठी कुप्रसिद्ध आहे. उन्हात लाही लाही होण्यासाठी खानदेशातील जनतेची वर्षानुवर्षांपासून मानसिकता फेब्रुवारीतच तयार झालेली असते. त्यात दर पाच वर्षांनी मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांनी वातावरण अधिक तापते. राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळणे हा एक स्वतंत्र उद्योग होऊन बसतो.
यंदा लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यात खानदेशात पार पडतील, प्रचारासाठी मिळालेला हा अवधी फायद्याचा आणि बराचसा तोट्याचाही आहे. प्रचारासाठी मोठी संधी हा झाला फायदा तर एवढे दिवस सगळ्यांना सांभाळायचे हा तोटा. सगळ्यात तापदायक म्हणजे राजकीय कुरघोड्या करण्यासाठी भरपूर मोकळे दिवस उपलब्ध झाल्याने प्रतिस्पर्ध्यांची डोकेदुखी कशी वाढवता येईल? यासाठीही उन्हाळ्यातील या तप्त दिवसांचा उपयोग होणार आहे. (Uttar Maharashtra saptarang article on lok sabha election 2024 khandesh news)
भाजपाने खानदेशातील उमेदवार घोषित करुन आघाडी घेतली. आघाडीतील नावेही हळुहळू समोर येत आहेत. त्यामुळे स्पर्धा स्पष्ट झाल्यानंतर प्रत्यक्षात चुरस वाढेल, हे निश्चित. सध्या केवळ हिना गावित विरुद्ध अॅड. गोवाल पाडवी ही एकच लढत निश्चित झालेली आहे. रक्षा खडसे विरुद्ध रवींद्रभैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
तर स्मिता वाघ यांच्याविरुद्ध पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीवर विचार सुरु आहे. धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे यांच्याविरुद्धच्या काँग्रेस उमेदवाराचा सस्पेंस अजून कायम आहे. यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी विविध पक्षातील नेते संपर्क ठेवून आहेत. डॉ. भामरे यांच्या संदर्भात पक्षांतर्गत आणि पक्ष विरोधी नेत्यांची धार अधूनमधून वाढताना दिसून येते. पक्षांतंर्गत तीव्रता वाढणार की कमी होणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
ही परिस्थिती वरवरची असली तरी राजकीय अंडरकरंट संपूर्ण खानदेशात जोरात आहेत. रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. कार्यकर्ते मेळावे त्या घेत आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकारणाची किनार आहे. खडसे यांच्या संदर्भात अजूनही ते भाजपात दाखल होऊ शकतात, अशी दबक्या आवाजात भाजपामध्येच चर्चा घडते.(latest marathi news)
ते आलेत तरी किंवा न आले तरीही त्यांच्या भूमिकेनुसार रक्षा खडसे यांची राजकीय वाटचाल ठरणार आहे. प्रत्यक्षात रक्षा यांनी स्वतःला राजकीय पटलावर सिद्ध केलेले आहे. करण पवार ठाकरे गटात डेरेदाखल झाल्यास जळगाव लोकसभेचा भाजपाला पुनर्विचार करावा लागेल की काय, अशी शक्यता काही ज्येष्ठ निरीक्षक वर्तवू लागले आहेत.
करण पवार हे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय आहेत, दुसरीकडे भाजपाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचेही चांगले मित्र आहेत, हे विशेष. जळगाव लोकसभेचा नजिकच्या निवडणुकांमधील इतिहास पाहता शेवटच्या क्षणी काय घटना घडामोडी घडतात, याचाही अंदाज आत्तापासून बांधला जात आहे.
उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचेही नाव महाविकास आघाडीकडून अधूनमधून चर्चेत आहे. जळगाव लोकसभेचा केंद्रबिंदू पुढील काही दिवसांत पारोळ्याकडे सरकू शकतो. माजी खासदार ए. टी. पाटील त्यासाठी प्रयत्नशील दिसून येतात. नंदुरबारमध्ये हिना गावित यांची प्रचारात आघाडी असली तरी मित्रपक्षांचे त्यांना किती आणि कसे सहकार्य मिळते, यावर राजकीय समीकरणे अवलंबून असतील.
गावित कुटुंबियांविरुद्ध सगळेच राजकीय पक्ष एका मंचावर आल्याचे चित्र अलीकडेच दिसून आले होते. आता उघड विरोध न करता छुप्या कारवाया विरोधकांकडून होणार, हे स्पष्ट आहे. माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र हिना गावित यांच्यासाठी नवखे विरोधक असले तरी गोवल पाडवी यांना हिना गावित विरोधकांची साथ लाभल्यास गावित कुटुंबियांची डोकेदुखी वाढू शकते. शिरपूर आणि साक्रीची भूमिका नंदुरबार लोकसभेमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. हिना गावित यांना या वास्तवाची कल्पना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.