नाशिक : ज्येष्ठ कादंबरीकार, नाटककार व ‘अमृत’चे माजी संपादक मनोहर मुरलीधर शहाणे (वय ९४) यांचे आज दुपारी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
गेले आठ दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Veteran novelist playwright Manohar Shahane passed away in Pune Passed Away Nashik)
सत्तरच्या दशकातील मराठीतील आघाडीचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार म्हणून (कै). शहाणे परिचित होते. ‘अमृत’मधून निवृत्त झाल्यावर त्यांचा मुक्काम पुण्यात मुलांकडेच होता. तत्पूर्वी, ते येथील वावरे लेनमधील सुनीती हौसिंग सोसायटीत अनेक वर्षे वास्तव्यास होते.
नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणीच वडिलांच्या निधनानंतर आई-आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर शिक्षण घेता आले नाही.
शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी क्रांती ही नाटिका लिहिली. नाटकांमध्ये भूमिका, नकला, जादूचे प्रयोग केले. हस्तलिखिते- मासिके चालविली. रेशनिंग खात्यात तात्पुरते काम सुरू असतानाच पालवी मासिक काढले.
त्यांची ही धडपड पाहून दैनिक ‘गांवकरी’त मुद्रितशोधक म्हणून १९४९ मध्ये त्यांना संधी मिळाली. पुढे साप्ताहिक गांवकरी व दिवाळी अंकाचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९५५- ५६ मध्ये अ. वा. वर्टीं यांच्याबरोबर अमृत नियतकालिकाचे काम सुरू केले.
मनोहर शहाणे यांनी ‘अमृत’चे संपादक म्हणून भरीव योगदान दिले. सदस्यांचे मृत्यू जवळून पाहिल्याने शहाणे यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, हळवेपणा, तटस्थपणा आणि जीवन-मृत्यूविषयक असंख्य प्रश्न निर्माण झाले.
यातून ते गंभीर लेखनाकडे वळले. माणूस, नियती, सुख-दुःखे व त्यांचा मानवी मनावर होणारा परिणाम यावर चिंतन सुरू झाले. मनुष्य म्हणजे नियतीच्या हातातील बाहुले असून, त्याचे अस्तित्व क्षुद्र आहे, हा विचार त्यांच्या लेखनातून प्रकटला.
त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा सर्वसामान्य असून तटस्थता, जिवंतता, प्रत्ययकारी आणि भेदकतेमुळे साठोत्तरी काळात मराठी कादंबरी जीवनाभिमुख बनविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. मनोहर शहाणे यांचे वाङ्मय विविध स्वरूपी आहे.
"ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, कथाकार मनोहर शहाणे यांनी ‘अमृत’चे संपादक म्हणून केलेले भरीव काम कधीच विसरता येणार नाही. त्यांनी अनेक वर्षे विपुल व कसदार लेखन केले."
- जयप्रकाश जातेगावकर, सावाना पदाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.