मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना (corona) संसर्गामुळे दोन वर्षापासून बंद असलेली पंढरीची वारी यंदा होणार आहे. पायी दिंडी सोहळ्यांना लवकरच सुरवात होणार आहे. दिंडीत सामील होवून विठूरायाच्या गजरात तल्लीन होण्यासाठी तालुक्यासह कसमादेतील हजारो वारकऱ्यांची लगबग सुरु आहे. दोन वर्षाच्या कालखंडानंतर दिंडीत सामील होण्यासाठी वारकऱ्यांना आस लागली आहे. त्यादृष्टीने शेतीचे व इतर कामे आटोपली जात आहेत.
तालुक्यासह कसमादे पट्ट्याला वारकरी सांप्रदायाचा मोठा इतिहास आहे. गावागावांमध्ये अखंड हरिनाम व पारायण सोहळ्यांना शेकडो वर्षाची परंपरा आहे. पंढरपुरच्या विठुरायाच्या आषाढी यात्रेला पायी यात्रेने जाणाऱ्या शेकडो कुटुंबियांची परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे पायी यात्रा रद्द झाली. या वर्षी दिंडी सोहळे उत्साहात निघणार आहेत. तालुक्यासह कसमादे भागातील बहुसंख्य वारकरी आळंदीहून दिंडीत सहभागी होतात. २१ जूनला माऊलींचे आळंदीहून प्रस्तान आहे. त्यामुळे २० जूनपर्यंत वारकरी आळंदीत दाखल होतील.
आळंदी, संगमवाडी, पुणे, उसळी देवाची, सातवड, साकुर्डे, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, वडजल, फलटण, निंबळक फाटा, बरड, सिंगनापूर फाटा पानसकरवाडी, नातेपुते, पुरंदवडे, माळशिरस, धावाबावी माऊंट, वेळापूर, वाडीकुरोली, भंडीशेगाव, वाखरी व पंढरपूर असा २२ दिवसाचा वारकऱ्यांचा प्रवास आहे. मालेगाव तालुक्यातून सात ते आठ हजार वारकरी तर कसमादेतून १५ ते २० हजार वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गावागावात तयारी सुरु आहे. सलग दोन वर्षे झालेला समाधानकारक पाऊस, तसेच कांदा, डाळींब, शेवगा आदी पिकांना चांगला भाव मिळाला. या वर्षीही मुबलक पावसाचे साकडे वारकरी विठुरायाला घालणार आहेत. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे वारकरी व कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
''कोरोना महामारीमुळे दोन वर्षे वारी चुकल्याची रुखरुख लागली आहे. गेल्या २१ वर्षापासून पायी वारी करीत आहे. २० जूनला आम्ही येथून प्रस्थान करणार आहोत. मालेगावसह कसमादे भागातून असंख्य वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.'' - सुनील देवरे, वारकरी, खडकी (ता. मालेगाव)
''दोन वर्षे वारी खंडीत झाल्याची अजूनही खंत वाटते. पांडुरंगाच्या कृपेने या वर्षी वारी होत आहे. वारकऱ्याचे जीवन म्हणजे दिंडी सोहळ्यातील आनंद हेच आहे. पांडुरंगाच्या भेटीबरोबरच वारकऱ्यांनाही एकमेकाच्या भेटीची ओढ लागली आहे.'' - हभप मधुकर महाराज (वडगावकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.