water is being supplied at low pressure and in short time Nashik News esakal esakal
नाशिक

एप्रिलमध्येच आटले नळ; प्रशासनाची ‘तांत्रिक’ कळ

महेंद्र महाजन

नाशिक : नाशिककरांच्या नळाचे पाणी एप्रिलमध्येच आटले आहे. कुठे कमी दाबाने, तर कुठे कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींना शहरवासीयांमधून तोंड फुटले आहे. तांत्रिक कारणामुळे गरजेपेक्षा कमी पाणीपुरवठा (Water supply) होत असल्याचे कारण महापालिकेच्या (NMC) पाणीपुरवठा विभागाकडून पुढे करण्यात आले आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून शहरवासीयांना दैनंदिन वापरासाठीच्‍या पाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. उंटवाडी परिसर, सिडको, सातपूर, इंदिरानगर, नाशिक रोड, पंचवटी, गंगापूर रोड अशा परिसरातील अनेक भागांसह पंचवटीच्या काही भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी धो-धो, तर काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात पन्नास टक्क्यांहून अधिक पाणी आहे, मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर ज्या २३ खेड्यांचा महापालिकेत समावेश केला, त्यात लोकसंख्येच्या दृष्टीने आडगाव हे सर्वात मोठे गाव आहे. मात्र, काही भागातील पाण्याची समस्या कठीण झाली आहे.

शहराचे विस्‍तारीकरण (Expansion) होत असताना जुन्‍या इमारती, बंगल्‍यांच्‍या जागी मोठ्या इमारतींचे बांधकाम केले जात असले तरी पाणी पुरवठ्यासाठी जुनीच अर्धा इंची जलवाहिनीचा आधार घेतला जात असल्‍याने ही गैरसोय होत असल्‍याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. यासंदर्भात खातरजमा करत गरजेनुसार जलवाहिनीत दुरुस्‍ती करण्याचा सल्‍ला दिला जातो आहे. शहराला साडेपाचशे ते सहाशे दशलक्ष लिटर पाणी महापालिका रोज पुरवते. उन्‍हाळ्यात पाण्याचा वापर वाढला आहे. यापूर्वीची स्थिती पाहिल्‍यास धरण साठा खालावल्‍यास मेमध्ये नाशिककरांना पाणी कपातीच्‍या संकटाला सामोरे जावे लागते. मात्र, सध्या छुप्‍या पद्धतीने पाणी कपात केली जात असल्‍याची शहरवासीयांची तक्रार आहे.

नाशिककरांचे गाऱ्हाणे

"गेल्यावर्षी उशिरा पण चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाणी आहे, परंतु महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या नियोजनाचा प्रश्‍न तयार झालेला दिसतो. तसेच वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. पाणी टंचाईमागे ही कारणे आहेत. पाण्याच्या वितरणातील नियोजनाचा अभाव ही मूळ समस्या आहे."

- देवेंद्र पाटील, राजरत्ननगर, सिडको

"कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा हा आमच्या नशिबी कायमस्वरूपी आहे. दोनशे मीटर अंतरावर पाण्याच्या टाक्या असूनही सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या आहे. तात्पुरती उपाययोजना करून समजूत काढण्याचा प्रकार केला जातो."

- पंकज भामरे, पाथर्डी फाटा

"पाणीपुरवठा हा बेभरवशाचा विषय झाला आहे. अचानक कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा सुरू होतो. त्यामुळे पंचाईत होते. पाणी वितरण आणि वेगवेगळ्या भागात असलेले वेळेचे नियोजन पाळले गेले नाही तर पाणी समस्या तीव्र रूप धारण करते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे."

-गायत्री पाटील, पाथर्डी फाटा

"पाणीपुरवठ्याबाबत नेहमी ‘कही खुशी कही गम’ असा प्रकार असतो. दीपालीनगर, विनयनगरच्या काही भागात पुरेसे आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा होतो, तर काही भागात कमी दाबाने तोकडा पाणीपुरवठा होतो. पाणी वितरणाबाबत असलेली उदासीनता पाण्याच्या अनियमितपणासाठी कारणीभूत ठरते. त्यावर उपाययोजना व्हायला हवी."

-प्रवीण जाधव, विनयनगर

"अनेक दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. अपुरा आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तळ टाक्या भरत नाहीत. पहिल्या मजल्यावर पाणी चढणे कठीण झाले आहे. पाणीसाठा पाहता मुद्दाम कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे, असे कर्मचारी स्थानिकांना सांगतात."

- सोनाली गोखले, कमोदनगर

"भारनियमनामुळे टाक्या भरल्या नाही, तर यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे."

- अनुराधा गांजवे, शिवशक्ती चौक, सिडको

"गेल्या महिन्यांपासून राज्य कर्मचारी सोसायटी, अशोकनगरच्या संत जनार्दन चौक परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. जे पाणी मिळते तेही कमी दाबाने. महापालिकेने लक्ष देवून पाणीपुरवठा सुरळीत करावा."

- मंजूषा पाटील, सातपूर

"गेल्या अनेक वर्षांपासून सातमाऊली परिसरातील प्रभात चौक भागात पिण्याची पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी पावसाळी गटारामध्ये जाते. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. याबाबत अनेकवेळा महापालिकेत अर्ज केला, पण संबंधित प्रशासन लक्ष देत नाही."

- संजय पाटील, सातपूर

"गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची समस्या जाणवत आहे. केवळ अर्धा ते पाऊण तास पाणीपुरवठा होत असतो. त्यातही कमी दाबाने. पुरेसे पाणी मिळत नसल्याने कुटुंबाचे दैनंदिन नियोजन बिघडून जाते."

- सुभाष परदेशी, रविवार कारंजा

"उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची अधिक आवश्यकता भासत आहे, मात्र कमी वेळ मिळते. तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. एकवेळ पाणीपुरवठा केला तरी चालेल, परंतु अधिक वेळ, अधिक दाबाने, पुरेसा पाणीपुरवठा व्हायला हवा. जेणेकरून सर्वांना पुरेसे पाणी मिळण्यास मदत होईल."

- सुवर्णा काकड, रविवार कारंजा

"नागसेननगर, शिवनेरीनगर, बागवानपुरा, इमामशाही कोळीवाडा, बुरुड गल्ली इथे पाण्याची गंभीर समस्या असून, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा वेळेचे नियोजन नाही. त्यामुळे पाण्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आमची समस्या लवकर समस्या सोडविण्यात यावी. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही."

- ज्ञानेश्वर काळे, जुने नाशिक

"रमजान महिना सुरू असताना पाण्याची मोठी अडचण होत आहे. खूपच कमी पाणी येत आहे. तेही केवळ २० ते ३० मिनिटे. भर उन्हाळ्यात आणि रमजानमध्ये पाणी मिळत नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याकडे लवकर लक्ष घालून समस्या सोडवावी."

-शबाना शेख, जुने नाशिक

"आमच्या भागात पाण्याची वारंवार समस्या भासते. रमजान पर्वात व्यवस्थितरीत्या पाणी मिळेल, अशी आशा वाटत होती. परंतु परिस्थिती ‘जैसे-थे’ आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, कमी वेळेत पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आवर्जून सोडवावी."

- शकिला कुरेशी, द्वारका

"पिण्यासह घरातील विविध कामांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. सध्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. असे असताना पुरेसे पाणी मिळत नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जास्त वेळ व योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा."

-अल्लाउद्दीन बागवान, द्वारका

"पाणीपुरवठ्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे, परंतु अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. एकीकडे ‘स्मार्ट सिटी’ म्हणायचे अन्‌ दुसरीकडे चक्क टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे."

- प्रशांत भामरे, आडगाव

"आडगाव येथील सय्यद पिंप्री रस्ता तुलनेत उंच भागात येतो. त्यामुळे पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी खड्डा खोदावा लागला आहे. या भागातील अनेकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे."

- मंगलाताई माळोदे, आडगाव

"पंचवटीतील गणेशवाडी परिसर हा उंच-सखल भाग आहे. इथल्या खोलगट भागात व्यवस्थित दाबाने पाणीपुरवठा होतो, तर उंच भागात नळाला थेंब-थेंब पाणी येते. त्यातच अनेकांकडे विद्युत मोटारी असल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सगळीकडे योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा."

- विनायक वाघ, पंचवटी

"धरणात मुबलक पाणी असूनही हंडाभर पाण्यासाठी पंधरा वीस मिनिटे वाट पहावी लागते. पाणी न आल्यास सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते. स्मार्ट सिटीत पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी."

- संगीता सूर्यवंशी, गणेशवाडी, पंचवटी

"उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे अगोदरच अतिशय अल्पदाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच अनेकांनी नळाला मोटारी जोडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी खेचून घेतले जाते. मोटारी बंद झाल्यास समान पाणीपुरवठा होण्यास मदत होईल."

- सीमा आहेर, नांदूर गाव

"एप्रिलमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. कमी वेळ आणि कमी दाबाने पाणी हा प्रश्न प्रत्येक उन्हाळ्यात भेडसावत असतो. महापालिकेच्या प्रश्‍नाने तातडीने पावले उचलत पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडवावा."

- विशाल बेंडकुळे, प्रभातनगर, म्हसरूळ

"महापालिका घरपट्टी, पाणीपट्टीतून कर वसुली करते. त्यामुळे मूलभूत सुविधा देणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. पाणीटंचाई हा गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कारवाई अपेक्षित आहे."

- शीतल विंचू, शांतिनगर, मखमलाबाद

"चेतनानगर भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने दोन नळ कनेक्शन घेऊनही एका घराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. दोन ते तीन दिवसाआड ५०० ते बाराशे रुपये खर्च करून खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. वेळोवेळी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही कोणी दाद द्यायला तयार नाही. आमच्या भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे."

- भरतकुमार वाघ, चेतनानगर

"अशोका मार्ग परिसरात पाइपलाइनचे काम झाले असले, तरी पाइपलाइन काही ठिकाणी चढ-उताराचा भाग असल्याने तांत्रिक अडचणीमुळे पाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. आमच्या भागातील सदनिकांमध्ये पाण्याचे बोअर केले असून आता बोअरची भूजल पातळी कमी झाली. त्यामुळे विकत पाणी घ्यावे लागते. शिवाजीवाडी, बजरंगवाडी, सिद्धार्थनगर, वडाळागाव भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यावर ठोस उपाययोजना महापालिकेकडून अपेक्षित आहे."

- श्‍याम हांडोरे, अशोका मार्ग

"पाणी टंचाई हा प्रश्न भविष्यात भीषण होत चालला आहे. अक्षरशः ७०० रुपये पर टँकर असे जवळपास चार ते पाच मागवावे लागतात .यामुळे मेंटेनन्सचा खर्च वाढतो.तरी मनपा प्रशासनाने हा पाणी प्रश्न सोडवावा."

- राहुल तेलोरे, वृंदावन नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT