येवला : ब्रिटिशांनी खूप सुविधा केल्या, पण येवल्याची पाणीटंचाई मात्र तशीच ठेवून गेले. कारण तेव्हापासून तर आजपर्यंत येवलेकरांचा उन्हाळा पूर्णतः अवलंबून असतो तो टॅंकरच्या पाण्यावर. यंदा तर अल्प पाऊस पडल्याने आताच दुष्काळ जाहीर झाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहेत.
दिवाळीपासूनच येथील चित्र भयानक बनले आहे. सुमारे ५० हजार नागरिकांसाठी दररोज ३५ गावे व १४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यापुढील काळात अजून ४० गावे व वस्त्यावर पाणीपुरवठा करावा लागणार असून, ३८ गाव योजनेच्या गावातील वस्त्यावरही टँकरची गरज भासणार आहे. (Water shortage will explode in summer Need of tankers at 91 villages wadas in yeola nashik)
राज्यातील ९४ तालुक्यांची दुष्काळी नोंद आहे. त्यात येवल्याचे नाव अग्रस्थानी आहे. प्रत्येक उन्हाळा येथील जनतेला असह्य करणारा ठरतो. जोरदार पाऊस होऊन नदी-नाले, बंधारे, विहिरी भरल्या तर तालुक्यात मार्चपर्यंत पाणी पुरते.
एप्रिल-मेमध्ये पन्नासच्या आसपास गावांना टँकरची गरज भासतेच, असा इतिहास आहे. मात्र, यंदा पावसाने दगा दिल्याने शेतातील उभी पिके करपून गेली. तालुक्यातील भूजल पातळी सुमारे १ मीटरने घटली असून, उत्तर पूर्व भागात विहिरींनी तळ गाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
राजापूरसारख्या गावाला दोन पाणीयोजना आहेत, पण दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने योजना कोमात जाऊन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
विशेष म्हणजे तालुक्यात १२ एप्रिलला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून, गेल्या सात महिन्यांपासून अव्याहतपणे टॅंकर सुरू आहे. यावरच शासनाने सुमारे दोन कोटींच्यावर पैशांचा चुराडा केला आहे. यापुढील काळात तर पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे.
टॅंकरने पाणीपुरवठयाचाच वर्षानुवर्षे पर्याय
कायमचा पर्याय सापडत नसल्याने अनेक वर्षे टंचाईची गावे तीच असून, टंचाई निवारण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनाही त्याच अन् नागरिकांचे हालही तसेच आहेत.
ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्यात पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने मागील २०-२५ वर्षांत एकीकडे लोकसंख्या वाढत गेली अन् दुसरीकडे पाणीपातळी खालावल्याने टंचाई अधिकच वाढत आहे.
तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे व गाळ काढणे, विंधन विहीर घेणे (कूपनलिका), खासगी विहीर अधिग्रहण करणे, बुडकी घेणे, विहीर खोलीकरण, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती व टॅंकरने पाणीपुरवठा करणे, या नेहमीच्याच उपाययोजना टंचाई काळात कृती आराखड्यात केल्या जातात, पण यातील एकमेव आधार टॅंकरने पाणीपुरवठा करणे हाच ठरत आहेत.
टंचाईवर पर्याय शोधावा
तालुक्यात पाऊस कितीही पडो, पण टंचाईची गावे कायम आहेत. दरवर्षी जानेवारी ते मेदरम्यान ६० च्यावर गावांमध्ये टंचाईच्या उपाययोजना राबविल्या गेल्या व त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही प्रस्तावित करण्यात आला, पण शासनाचा वाढता खर्च नागरिकांची तात्पुरती तहान भागविते व तीही तुटपुंजी, असे दिसत आहे.
३८ गाव योजनेमुळे ५० वर गावे टॅंकरमुक्त झाले. पालखेड कालव्यालगतच्या गावांना पाण्याचा आधार आहे. तेथील वस्त्यांना टंचाईची धग जाणवतेच. आता पूर्व भागासाठी ४१ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सध्यातरी पाणीटंचाईचा विस्फोट होऊ लागला आहे.
कृती आराखडयातील उपाययोजना
-ऑक्टोबर ते डिसेंबर : ३५ गावे, १४ वाड्या. ४९ ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा
-जानेवारी ते जून : १९ गावे, २२ वाड्या. ४१ ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.