पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्याचे राजकारण गटातटाभोवती फिरत असले, तरी पक्षाची किनार असतेच. दिग्गज नेत्यांची मांदियाळीने येथील राजकारण नेहमीच चर्चेत राहते. १९९५ पूर्वीचा काळात निफाड तालुक्यावर कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले.
विधानसभेपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीवर कॉंग्रेस पक्षाची हुकूमत दिसली. नंतर मात्र पक्षाची एवढी शक्कले उडाली, की कधी काळी बाल्लेकिल्ला असलेला कॉंग्रेसचा जीव तोळा मासा झाला.
कॉंग्रेसच्या डुबत्या नौकेत हवा भरून ती डौलाने हाकण्याचा विडा पक्षांच्या जुन्या-नव्या नेत्यांनी उचलला आहे.
मार्ग खडतर असला, तरी सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलने, जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविल्यास कॉंग्रेसला निफाडची जनता मदतीचा हात देऊ शकते. (Will people of Niphad give helping hand to Congress Movements against ruling party Nashik Congress News)
विनायकदादा पाटील, दुलाजीनाना पाटील, मालोजीकाका मोगल, अशा दिग्गज नेत्यांनी निफाडचे प्रतिनिधित्व कॉंग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत तब्बल २५ वर्ष केले. ८० व ९० च्या दशकात निफाड तालुक्यात सर्वत्र कॉंग्रेसचा बोलबाला होता.
इतर पक्षांची अवस्था केविलवाणी होती, पण चक्र फिरले ते १९९५ मधील विधानसभा निवडणुकीत. शिवसेनेच्या रावसाहेब कदम यांनी मोगल यांचा पराभव करून कॉंग्रेसची घौडदौड रोखली.
येथून कॉंग्रेसच्या पडझडीला सुरवात झाली. पुढे १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उदयाला आला आणि कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले. २००७ पर्यंत राजाराम पानगव्हाणे, माणिकराव बोरस्ते, भास्करराव बनकर, बाळासाहेब क्षीरसागर, दिंगबर गिते, मधुकर शेलार यांनी पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.
कालातंराने श्री. बनकर, क्षीरसागर यांनीच शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले. याच कालावधीत कॉंग्रेसचा सूर्य अस्ताकडे झुकला.
कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाण यांचे होमगाऊंड असलेल्या निफाड तालुक्यात पक्षांची दैना गेली १५ वर्षांपासून सुरू आहे. कॉंग्रेसची स्पेस आता राष्ट्रवादी व शिवसेनेने घेतली आहे. पाठोपाठ भाजपने ताकद वाढविण्यास सुरवात केली आहे.
मार्ग खडतर...
कॉंग्रेसच्या पदाधिकारी नियुक्तीवेळी राजाराम पानगव्हाणे, तालुकाध्यक्ष विजय जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक लढेल, असा दावा केला.
खरंतर मतदारसंघातील काही गावांमध्ये कॉंग्रसेचा कार्यकर्ताच शिल्लक नाही. सध्या इतर पक्षांची स्थिती पाहिली, तर अनेक कार्यकर्ते सैरभर आहेत.
तन-मन-धनाने कॉंग्रेसच्या नेत्यांनी जीव ओतून समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलने, समाजभिमुख उपक्रम, सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणे ही मार्ग चोखाळले, तर कॉंग्रेसला गतवैभव मिळू शकते.
त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. कारण निफाड मतदारसंघात समस्या उदंड आहेत. रणनीती ठरविण्यासाठी राजाराम पानगव्हाणे यांना निफाडच्या राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.