Nashik News : घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महापालिकेच्या घंटागाडीत टाकण्याची सवय लागलेल्या महिलांना छोट्या घंटागाडीमुळे मोठी कसरत करावी लागतं आहे. महिलांच्या कसरतीचे प्रयोग पंचवटी विभागात पाहायला मिळतात.
छोट्या घंटागाडी व त्या गाड्यांची अधिकच्या उंचीमुळे कचरा टाकू की जीव सांभाळू, अशी महिलांची स्थिती सध्या आहे. परंतु त्यांच्या शारीरीक कसरतींकडे पाहायला महापालिकेच्या आरोग्य विभागाला वेळ नाही.
नियमानुसार ठेकेदाराला दंड करणे अपेक्षित असताना उलट त्याला अकरा कोटींची देयके अदा करत कामाची पावतीच दिली. विशेष म्हणजे पंचवटीच्या घंटागाडीच्या गमती-जमती विधानसभेत पोचूनही आरोग्य विभागाला कुठलेच सोयरसुतक नाही. (Womens toruble due to small ghantagadi in Panchavati nashik
शहरातील सहा विभागांतून घरोघरी उत्पन्न होणारा कचरा संकलित करून विल्होळी येथील खत प्रकल्पात टाकण्यासाठी पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका दिला आहे. त्यापोटी पाच वर्षात ३५४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
शहरातील गावठाण तसेच सहा व साडेसात मीटरचे ले-आउट अधिक असल्याने अरुंद गल्ल्यांमध्ये पोचण्यासाठी छोट्या घंटागाड्यांची नगरसेवकांची जुनी मागणी होती. त्याअनुषंगाने मोठ्या व छोट्या अशा दोन्हींचे एकत्रीकरण असलेल्या घंटागाड्यांचे नियोजन आरोग्य विभागाने केले.
कुठल्या मार्गावर कोणती गाडी याचे नियम ठरवून दिले. नियम करारात नमुद केले. नियमभंग झाल्यास करारभंग समजून दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली. त्यानुसार रस्त्यावर घंटागाड्यांची टणटण सुरू झाली.
पंचवटी विभागाचा ठेका शेअर मार्केटमध्ये लिस्टेड ए.जी. एन्व्हायरमेंट इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. (अन्थोनी गॅरेज एन्वा कंपनी) ला देण्यात आला.
मात्र पंचवटी विभागाच्या ठेकेदाराला महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष सूट दिली का, असा प्रश्न येथील महिलांची कसरत पाहिल्यावर होतो. घंटागाडी वेळेवर येत नाही, ज्या वेळेला येते ती जागेवर किंवा ठरवून दिलेल्या पॉइंटवर थांबत नाही.
जेथे थांबते त्या जागेवर पोचण्यासाठी महिलांमध्ये अडथळ्यांची शर्यत लागते. कसेबसे पोचल्यानंतर कचरा टाकताना जीव सांभाळावा लागतो. कसरत करूनही कचरा योग्य ठिकाणी पडला तर ठिक अन्यथा कचऱ्याचीच अंघोळ होते.
दंड होण्याच्या नावाखाली ड्रायव्हर कधी एक्सलेटर दाबेल याचा नेम नाही. त्यामुळे अनेकदा मदत घ्यावी लागते. ओला कचरा असेल तर कोणी मदतीला येत नाही. अधिकचा वेळ, मानसिक त्रासाच्या या कसरती असल्या त्या सहन कराव्याच लागतात.
सार्वजनिक जागेवर कचरा टाकता येत नाही. टाकल्यास दंडाच्या पावत्या घेऊन महापालिकेचे कर्मचारी हजर. यासारख्या समस्यांनी त्रस्त झालेल्या महिला आता थेट महापालिका मुख्यालयातच कचरा घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ठेकेदारावर घनकचरा विभाग मेहरबान
महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन अर्थात आरोग्य विभाग ठेकेदारावर मेहरबान असल्याचा थेट आरोप माजी नगरसेवक करत आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर महिना भरानंतर घंटागाडी सुरू झाली.
त्यामुळे पहिली दंडात्मक कारवाई होणे गरजेचे होते ती झाली नाही. पंचवटी विभागासाठी ४८ मोठ्या व १३ छोट्या घंटागाड्या सुरू करायच्या होत्या. परंतु प्रत्यक्षात सर्वच छोट्या गाड्या पंचवटी विभागात सुरू आहे.
दोनशे मीटर पॉइंट आहे. परंतु पॉइंट वेळेवर गाठले जात नाही. जीपीएस मॅपिंग फॉलो होत नाही. पहिले सहा महिने जुन्या ठेकेदाराचे पॉकेट वापरले. स्वतःचे पॉकेट तयार न केल्याने त्यावरदेखील दंडात्मक कारवाई झाली नाही.
छोट्या घंटागाडी असल्याने कचरा टाकण्यासाठी कामगार नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर पडतं असल्याने घंटागाडी सुरु करण्याचा उद्देश असफल होतो. दररोज तक्रारी होवूनही घनकचरा विभागाकडून कारवाई होण्याऐवजी देयके अदा केली जात असल्याने घनकचरा विभागाची ठेकेदारावरील मेहेरबानी संशयात आहे.
तरी १४० टन कचरा
पंचवटी विभागात कचरा संकलन करण्यासाठी दोन ते अडीच टन कचरा संकलन करण्याची क्षमता असलेली मोठी घंटागाडी चालविण्याचे करारात नमुद आहे. परंतु छोट्या गाड्या चालविल्या जातात.
परंतु असे असले तरी मासिक १३० ते १४० टन कचरा संकलित होतो हेदेखील एक आश्चर्य आहे. त्यामुळे घंटागाड्यांची क्षमता व वजन झाल्यानंतर घंटागाडीतून कचराच बाहेर पडतो, हे तपासण्याचीदेखील गरज असल्याची मागणी होत आहे.
"घंटागाडीसंदर्भात अनेक तक्रारी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेवू. आयुक्तांनी लक्ष घालून समस्या सोडवावी. अन्यथा विधानसभेत विषय मांडू." - ॲड. राहुल ढिकले, आमदार, पूर्व.
"पंचवटी विभागात नियमबाह्य घंटागाडी सुरू आहे. छोट्या गाड्यांमुळे कचरा गाडीत पोचत नाही. अर्धा कचरा बाहेर, अर्धा गाडीत अशी स्थिती आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना व्यवस्थापन करता येत नाही. त्यांच्याकडे अनेकदा पुराव्यासह तक्रार केली. परंतु ठेकेदाराला पाठीशी घालतात." - प्रियांका माने, माजी नगरसेविका.
"घंटागाडीमध्ये कचरा टाकणे म्हणजे मोठे दिव्य आहे. अनेक अडथळे पार करून कचरा गाडीत पडतो. नेमक्या कुठल्या खाच्यात कचरा पडतो हे माहीत नाही व ते सांगणारी यंत्रण देखील नाही. आमच्यासाठी कचरा पडणे हेच महत्त्वाचे असते."- सविता म्हस्के, गृहिणी.
"कचरा टाकताना अनेक अडचणी येतात. कर्मचारी नसतात, असले तरी केबिनमध्ये बसलेले असतात. काही कचरा गाडीत, तर काही कचरा बाहेर पडतो. रस्त्यावर कचरा पडल्याने अस्वच्छता दिसते. त्यामुळे घंटागाडीमध्ये कचरा टाकण्याचा उपयोग होत नाही."
- पुनम जाधव, गृहिणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.