YCMOU Convocation Ceremony: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ बुधवारी (ता. २०) सकाळी साडेदहाला विद्यापीठ आवारात होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्षस्थानी असतील.
आयआयटी दिल्लीचे माजी संचालक तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर उपस्थित राहतील. यंदा दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार असून, यंदा प्रमाणपत्रावर ब्लॉकचेनवर आधारित क्यूआर कोड छापण्यात आला.
अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र वितरित करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. (ycmou Open University convocation today nashik news)
विद्यापीठातर्फे यावर्षी एकूण एक लाख ५५ हजार ६०७ विद्यार्थ्यांना पदवी दिली जात आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्याला ऑनलाइन नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.
विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि सुमारे दोन हजारांवर अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी चार लाख ८२ हजार ३११ हून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पीएच.डी., एम.फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या १२४ शिक्षणक्रमांतील एक लाख ५५ हजार ६०७ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे.
दीक्षांत समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना छायाचित्रे काढण्यासाठी सेल्फी पॉइंट साकारला आहे. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत @ २०४७’ या उपक्रमाला प्रेरित करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी समारंभस्थळी त्यांच्या कल्पनांची नोंद करण्यासाठी सेल्फी पॉइंटवर क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाधारित प्रमाणपत्र
दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान केले जाणारे प्रमाणपत्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रमाणपत्रावर ब्लॉकचेनवर आधारित क्यूआर कोड छापला असून, तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल. पदवी/पदविका प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी, ई-सुविधा मोबाईल ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहील. दीक्षांत समारंभ संपल्यावर लगेचच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांना मुलाखत, शैक्षणिक कामासाठी प्रमाणपत्राची मूळ प्रत बाळगण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे रंगीत छायाचित्र असेल. हे प्रमाणपत्र पाणी अथवा अन्य द्रवपदार्थाने खराब होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यापीठाचा लोगो प्रमाणपत्रावर वैशिष्ट्यपूर्ण गोल्ड फॉइलमध्ये मुद्रित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अद्ययावत सिक्युरिटी फिचर्सचा समावेश केला आहे.
विद्यापीठापर्यंत आज मोफत बस
मुक्त विद्यापीठात दीक्षांत समारंभास उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विद्यापीठाकडून निःशुल्क परिवहन बससेवा उपलब्ध असेल. बुधवारी (ता. २०) सकाळी आठपासून सायंकाळी सहा या वेळेत निःशुल्क वाहतूक व्यवस्था असेल. नाशिक रोड ते मुक्त विद्यापीठ सीबीएस, अशोक स्तंभामार्गे ही वाहतूक सुरू असेल.
दीक्षांत समारंभाची वैशिष्ट्ये
- पदवीधारकांत ६० वर्षे वयावरील १५५ विद्यार्थ्यांचा समावेश
- विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या ७१ बंदीजनांना पदवी
- पदविकाधारक १७ हजार ८७३, पदव्युत्तर पदविकाधारक ११९
- पदवीधारक एक लाख नऊ हजार १०१, पदव्युत्तर पदवीधारक २८ हजार ६२६ विद्यार्थी
- पीएच. डी.धारक व एम. फील.धारक सात विद्यार्थी
- ९७ हजार ६४८ पुरुष, तर ५७ हजार ९५९ महिला विद्यार्थी
- पदवीधारकांमध्ये १६४ विद्यार्थी दृष्टिबाधित
- विशेष प्रावीण्य मिळविलेल्या ११ स्नातकांना सुवर्णपदके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.