येवला : ‘मेरी झोपडी के भाग, आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी...’ या भजनाची यथार्थ प्रचीती येवलेकरांना आली आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची चर्चा देशभर सुरू आहे.
भव्यदिव्य सोहळ्यासाठी मोजकीच यंत्रणा कार्यरत असून, या नियोजनात सहभागी होण्याचा मान येवल्याच्या महावस्त्राच्या माध्यमातून येथील कापसे पैठणी व कापसे फाउंडेशनलाही मिळाला आहे.
सोहळ्यासाठी कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांना अधिकृतपणे निमंत्रणदेखील प्राप्त झाले आहे. (yeola Paithani Pitambar Sales Royal Dress for Ayodhya Ram Mandir Ram Lalla Balasaheb Kapse nashik)
येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची देशभरात जय्यत तयारी सुरू असून, देशातील मोजक्याच मान्यवरांना राममंदिर न्यासाकडून निमंत्रण दिले आहे.
राज्यातील फक्त ३५९ व्हीआयपी मान्यवरांना या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले असून, यात नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांनाही हे निमंत्रण मिळाले आहे.
कापसे फाउंडेशनच्या दिव्यांग कारागिरांनी हातमागावर पैठणीत श्री रामाची प्रतिमा असलेले चित्र विणले असून, या प्रतिमेचा फोटो मंदिरात भेट देणार असल्याचे कापसे फाउंडेशनचे संचालक दिलीपदाजी खोकले यांनी सांगितले.
मुख्य समारंभात मोठे योगदान!
कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भेट झाली आहे, हाच धागा पुढे विणला गेला आहे.
कापसे फाउंडेशनतर्फे रामलल्लासाठी पैठणीपासून बनविलेले पितांबर, शेला, २५१ किलो गीर गायीचे शुद्ध तूप, गायीच्या शेणापासून बनविलेले ५०० दिवे आणि २०० विटा पाठविण्यात येणार आहेत.
तालुक्यातील वडगाव येथील कापसे फाउंडेशनच्या पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र अंतर्गत दिव्यांग आणि अनाथ कारागिरांकडून हाताने हॅन्डलूमवर प्रभू श्रीराम यांच्यासाठी शेला, पितांबर बनवण्याचे काम वेगाने सुरू असून, १८ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला पैठणीपासून बनविलेले ११ मीटरचे वस्त्र परिधान केले जाणार आहे.
सहा महिन्यांपासून या राजवस्त्राची तयारी कापसे फाउंडेशनकडून सुरू आहे. पितांबर आणि शेलासाठी लागणारा धागा फुलांपासून नैसर्गिक रंगात तयार करण्यात आला आहे. शेल्यावर श्रीरामाची प्रतिमा विणण्यात आली आहे.
यासह कापसे फाउंडेशन स्वतःच्या ४०० गीर गायींच्या प्रकल्पातील शुद्ध गायींच्या दुधापासून बनविलेले २५१ किलो तूपदेखील अयोध्यामध्ये होणाऱ्या होमहवनासाठी पाठवणार आहे.
गीर गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवऱ्या, ५०० दिवे आणि होम तयार करण्यासाठी लागणारी शेणाची वीट पाठविणार आहे. विशेष म्हणजे शेणापासून बनविलेली ही वीट पाण्यात तरंगते ती अग्नीमध्ये जळत नाही.
साहित्याची काढणार मिरवणूक!
येवला आणि वडगाव येथे दिवे, विटा, २५१ किलो शुद्ध तूप आदींची मिरवणूक काढण्यात येऊन अयोध्याकडे हे साहित्य घेऊन वाहन रवाना होणार असल्याची माहिती कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी दिली.
१८ जानेवारीपर्यंत शेला आणि पितांबरच्या दर्शनासाठी कापसे फाउंडेशन वडगाव या ठिकाणी ठेवण्यात आला असून, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून रामभक्त गर्दी करत आहेत.
कापसे २० जानेवारीलाच अयोध्याला जाणार!
जागतिक दर्जाचा हा कार्यक्रम असल्याने कापसे यांना भेट देत असलेल्या पितांबर, शेला या राजवस्त्रांना घेऊन राम मंदिर न्यासाने २० जानेवारीलाच अयोध्या येथे बोलाविले आहे.
राममूर्तीला हे वस्त्र कसे परिधान करायचे, याचे प्रात्यक्षिकच बाळासाहेब कापसे मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांना करून दाखवणार आहेत.
"देशासाठी भूषणावह ठरणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनात योगदान देण्याचा योग आल्याने आम्ही धन्य झालो. राम मंदिर पूर्णत्वास जात असताना आमच्या कापसे परिवारात आपणही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे ही अपेक्षा प्रभूच्या आशीर्वादामुळेच पूर्ण झाली आहे. या सोहळ्याचे निमंत्रणही कापसे परिवार व दिव्यांग कारागिरांच्या मेहनतीचे फळ आहे."
- बाळासाहेब कापसे, कापसे फाउंडेशन, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.