नामपूर (जि. नाशिक) : राजकीय कारकिर्दीचा अरुणोदय म्हणून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका ओळखल्या जातात. ग्रामविकासाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात यंदाची ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची झाली. ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनेक गावांमध्ये तरुणांनी बाजी मारल्यामुळे ग्रामपंचायती तरुण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सरपंचपदाच्या निकालानंतर विविध राजकीय पक्षांकडून कितीही दावा केला जात असला तरी तालुक्यात पक्षविरहीत झालेल्या निवडणुका, सुज्ञ नागरिकांनी तरुण, तडफदार उमेदवारांना दिलेली विकासाची संधी यंदाच्या निवडणूकीचे खास वैशिष्ट्य ठरले. (Young people elected at Gram Panchayats in Baglan Voters gave opportunity to youth for development work Nashik News)
सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी तालुक्यातील शेकडो तरुणांनी यंदा लोकशाहीचा उत्सव साजरा केला. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नामपूर बाजार समिती आदी निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकींना विशेष महत्व होते.
अत्यंत्य टोकाच्या राजकारणातून ग्रामविकासाची स्वप्न दाखविणाऱ्या लोकशाहीचा उत्सव म्हणून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ओळखल्या जातात. २० डिसेंबरला तालुक्यातील अत्यंत्य संवेदनशील व मातब्बर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, अनेक गावांमध्ये प्रथमच महाविद्यालयीन तरुण, द्राक्ष बागायतदार, डॉक्टर आदी क्षेत्रातील तरुणांना थेट सरपंचपदाची संधी मिळाली आहे.
राजकीय क्षेत्रात दबदबा असणाऱ्या तालुक्यातील जायखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या शोभा गायकवाड पहिल्यांदा सरपंच झाल्या आहेत. टेंभे वरचे येथील उच्चविद्याविभूषित प्रयोगशील शेतकरी, द्राक्षबागायतदार किरण वाघ यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संदिप अहिरे, भाऊसाहेब कापडणीस यांना पराभूत करून थेट सरपंचपदाचा मान मिळविला.
आनंदपूर येथे नामपूर बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण पवार यांच्या पत्नी रोहिणी पवार सरपंच बनल्या. गोराणे येथे राष्ट्रवादीचे युवानेते डॉ. दिनेश देसले सरपंचपदी विजयी झाले आहेत. आसखेडा येथे जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी दीपक कापडणीस, तळवाडे भामेर येथे युवा कार्यकर्ते दिनेश गायकवाड, मळगाव (ति.) येथील योगेश ठोके आदींच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
गावकारभाऱ्यांना विशेष महत्त्व
राजकीयदृष्ट्या मातब्बर असणाऱ्या काही गावांमध्ये सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे थेट सरपंचपदाच्या निवडीनंतर आगामी काळात होणाऱ्या उपसरपंचपदाच्या निवडणुकींना विशेष महत्व राहणार आहे.
उपसरपंच पदासाठी तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पॅनलचे नेते, गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाच वर्षे राहणार सरचंपपद
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे गेलेले उमेदवार नशीबवान आहेत. २०१७ मध्ये पहिल्यांदा थेट सरपंच निवडणुकीचा निर्णय झाला. त्यानंतर २०२० मध्ये सरकार बदलल्यानंतर थेट सरपंचपदाचा निर्णय रद्द झाला. त्यानंतर पुन्हा शिंदे सरकारच्या कार्यकाळात थेट सरपंचपदाच्या निवडणूकीची लॉटरी लागल्याने यंदाची निवडणूक रोमहर्षक झाली. सरपंचपद ग्रामविकासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
परंतु, यापूर्वी झालेल्या सरपंचपदाच्या आवर्तन पद्धतीमुळे ग्रामीण भागात सरपंचपदाचे वारेमाप पीक गावकऱ्यांनी पाहिले आहे. थेट सरपंचपदाच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात आगामी पाच वर्षे स्थिर सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.