तळोदा : परिवहन महामंडळाच्या मिनी बसमध्ये बिघाड झाला. ती बस तळोद्यातील भररस्त्यात बंद पडल्याची घटना शुक्रवारी (ता.२३) सकाळी घडली. बस चालू करण्यासाठी चक्क प्रवाशांना खाली उतरून धक्का मारावा लागला, मात्र बस चालू झाली नाही.
त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, बंद असलेली बस शहरातील गजबजलेल्या परिसरात तब्बल तीन तास उभी होती. आज आठवडे बाजार सुद्धा होता. त्यामुळे वाहतुकीवर त्याच्या विपरीत परिणाम होत, परिसरातील व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. (Passengers Pushing Corporation Mini Bus Nandurbar News)
जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या बसेस केव्हाही बंद पडतात. मात्र, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. बंद झालेल्या बसला चालू करण्यासाठी धक्का मारावा लागतो.
धक्का दिल्यावर कधी बस चालू होते, तर कधी चालू न झाल्याने बसमधील प्रवाशांना दुसरी बस उपलब्ध होईपर्यंत ताटकळत वाट पाहावी लागते. असाच प्रसंगाला शुक्रवारी प्रवाशांना तोंड द्यावे लागले.
सकाळी दहाच्या सुमारास नंदुरबार-तळोदा मिनीबस (एमएच ०७ सी ७९३४) शहरातील स्मारक चौकाजवळ येऊन अचानक बंद पडली. बस चालकाने बस चालू करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र बस चालू झाली नाही. शेवटी हताश होऊन प्रवासी पुढे पायीच मार्गस्थ झाले.
प्रवाशांची खासगी वाहनांना पसंती
तीन तासानंतर एकच्या सुमारास परिवहन महामंडळाच्या दुसऱ्या बसने टोचन लावत त्या बंद पडलेल्या मिनीबसला तेथून तळोदा बस स्थानकात नेले. दरम्यान जिल्ह्यातील अनेक बसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काही बसच्या खिडकीचे काच फुटलेले आहेत तर काही बसच्या सीट फाटलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी टॅक्सीला प्राधान्य देत आहेत आणि पर्यायाने त्याच्या आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. तरीसुद्धा परिवहन महामंडळ आपल्या चुकांमधून बोध घ्यायला तयार नाही. दरम्यान, बस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने बसमधील लहान-मोठे, ज्येष्ठ प्रवाशांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील बसेसची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वारंवार करीत आहे.
आठवडे बाजाराचा दिवशीच मनस्ताप
मिनीबस शहरातील सर्वात गजबजलेल्या स्मारक चौकाच्या जवळच बंद पडली होती. दरम्यान, तळोद्यात शुक्रवारी आठवडे बाजार भरतो, यादिवशी तालुक्यातील ठिकठिकाणचे नागरिक आपापल्या कामानिमित्त शहरात येतात. त्यामुळे आज देखील शहरात मोठी गर्दी होती व त्यात बस बंद पडून रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीवर त्यांचा विपरीत परिणाम होत, ऐन आठवडे बाजाराचा दिवशीच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवासी पुढे पायीच मार्गस्थ
आज बंद पडलेल्या बसमधील प्रवाशांच्या सुदैवाने ज्या ठिकाणी बस बंद पडली ते ठिकाण बसस्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे सर्वच प्रवासी पुढे पायीच मार्गस्थ झाले. मात्र जर हीच बस रस्त्यात इतरत्र बंद पडली असती तर मात्र प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असता अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.