धुळे : उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा पक्ष अभेद्य असल्याचे सिद्ध केले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे नागसेन बोरसे यांना ५० नगरसेवकांचा निर्विवाद पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे यात विरोधी बसपच्या एकमेव नगरसेविकेचाही त्यांना पाठिंबा मिळाला.
दुसरीकडे विरोधी पक्षांकडून ‘एमआयएम’च्या उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान माघार घेत विरोधकांतर्फे उमेदवारी करणाऱ्या अपक्ष उमेदवार आसिफ मोमीन यांना पाठिंबा दिला. श्री. मोमीन यांना २० मते मिळाली. या निवडणूक प्रक्रियेत तीन नगरसेवक अनुपस्थित होते.
हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
उपमहापौरपदासाठी सोमवारी (ता. १२) दुपारी चारला महापालिका सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक उपस्थित होते. उपमहापौरपदासाठी मनपातील सत्ताधारी भाजपतर्फे प्रभाग क्रमांक ४ (अ)चे नगरसेवक बोरसे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
विरोधी पक्षांतर्फे प्रभाग १९ (अ)चे अपक्ष नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल यांनी, तर एमआयएमचे प्रभाग ३ (ड)चे नगरसेवक सईद बेग हाशम बेग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पीठासीन अधिकारी शर्मा यांनी नियमानुसार नामनिर्देशपत्रांची छाननी करून वैध उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत दिली.
सईद बेग यांची माघार
उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत विरोधी पक्ष एमआयएमचे उमेदवार सईद बेग यांनी माघारीसाठी अर्ज सादर करून उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे उपमहापौरपदासाठी विरोधी पक्षांकडून अपक्ष मोमीन, तर सत्ताधारी भाजपकडून श्री. बोरसे असे दोनच उमेदवार रिंगाणात राहिले. या दोन्ही उमेदवारांसाठी पीठासीन अधिकारी शर्मा यांनी मतदानाची घोषणा केली. त्यानुसार प्रथम श्री. बोरसे यांच्यासाठी व त्यानंतर श्री. मोमीन यांच्यासाठी मतदानाची प्रक्रिया झाली.
बोरसेंना ५० मते
मतदान मोजणीनंतर भाजपचे श्री. बोरसे यांना ५० मते मिळाल्याचे पीठासीन अधिकारी शर्मा यांनी जाहीर केले. त्यानंतर दुसरे उमेदवार अपक्ष श्री. मोमीन यांना २० मते मिळाल्याचे जाहीर झाले. त्यामुळे भाजपचे श्री. बोरसे यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर झाले. जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष सदस्यांनीही श्री. बोरसे यांचा सत्कार केला. श्री. बोरसे यांच्या समर्थकांनी मनपा प्रवेशद्वारात फटाके फोडत आनंद व्यक्त केला. श्री. बोरसे यांची मिरवणूकही काढण्यात आली.
उपमहापौरपदासाठी मते अशी
-नागसेन बोरसे (भाजप)...५० (भाजप-४९, बसप- ०१)
-आसीफ मोमीन (अपक्ष)...२० ( राष्ट्रवादी काँग्रेस- ०८, काँग्रेस- ०५, समाजवादी पक्ष- ०२, एमआयएम- ०४, अपक्ष- ०१)
-अनुपस्थित नगरसेवक... ०३ (आरती पवार- भाजप, ज्योत्स्ना पाटील- शिवसेना ः उद्धव बाळासाहेब ठाकरे, सुभाष जगताप- काँग्रेस)
''धुळे शहरातील जी कामे अपूर्ण आहेत, ती महापौरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. महापालिका प्रशासनाने जिथे भ्रष्टाचार केला असेल तिथे भाजप आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही, भाजप भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही हे आम्ही सिद्ध करू. पक्षाने मला न्याय दिल्याबद्दल पक्षाचा आभारी आहे. ज्या दिवशी पक्षादेश मिळेल त्या दिवशी राजीनामा देईन.'' -नागसेन बोरसे, नवनिर्वाचित उपमहापौर, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.