धुळे : मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गातील एक भाग असलेल्या बोरविहीर (ता. धुळे) ते नरडाणा (ता. शिंदखेडा) या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गासाठी धुळे तालुक्यातील १९, तर शिंदखेडा तालुक्यातील पाच गावांमध्ये क्षेत्र मोजणीची प्रक्रिया प्रस्तावित आहे.
पैकी धुळे तालुक्यातील नऊ गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली असून, उर्वरित दहा गावांमधील मोजणी जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
मध्य रेल्वे मंत्रालयाकडील २२ फेब्रुवारी २०२२ च्या अधिसूचनेनुसार बोरविहीर ते नरडाणा या ५०.५६ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया रेल्वे अधिनियमान्वये विशेष रेल परियोजना म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे. (Railway counting status Counting in 9 villages complete Borvihir Nardana Railway Time to enumerate ten villages in Dhule taluka by end of January)
तसेच २५ मार्च २०२२ च्या अधिसूचनेन्वये तरतुदीनुसार कार्यवाहीसाठी धुळे तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या अनुषंगाने भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू करून भारत सरकार राजपत्रामध्ये २० (अ)ची अधिसूचना २० मे २०२२ ला प्रसिद्ध झाली आहे.भूसंपादनाचा मोबदला हा भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कायद्यानुसार अदा करण्यात येणार आहे. योग्य मोबदल्यासाठी ड्रोन सर्व्हेद्वारे परीक्षण, जमिनीच्या सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आल्या आहेत.
धुळे तालुक्यात प्रक्रिया
बोरविहीर-नरडाणा रेल्वेसाठी धुळे तालुक्यातील गरताड, दापुरी, कुंडाणे, दापुरा, कापडणे, धमाणे, नरव्हाळ, न्याहळोद, निमखेडी, पिंपरी, बाळापूर-फागणे, बिलाडी, वडजाई, लोणकुटे, सरवड, सावळदे, सोनगीर, वरखेडे, सौंदाणे आदी क्षेत्रात भूसंपादनाबाबत योग्य ती प्रक्रिया राबविली जात आहे. यात सरकारी (४.३४५ हेक्टर) व खासगी जमिनीचे (३०१.३८ हेक्टर) संपादन होण्यापूर्वी डिमार्केशन केले जात आहे. भूसंपादनाबाबत संबंधित जमीनमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
धुळे हे रेल्वेच्या सेंट्रल लाइनवर, तर नरडाणा वेस्टर्न लाइनवर येते. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजेच बोरविहीर ते नरडाणा हा रेल्वेमार्ग आहे. तो झाल्यास गुजरात आणि दक्षिण भारतालाही धुळे जिल्हा जोडला जाईल. या मार्गावर बोरविहीर, कृषी महाविद्यालयाजवळ न्यू धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा येथे स्टेशन असेल. याअनुषंगाने धुळे तालुक्यात १९ गावांमधील कुठले गट बाधित होतील, त्यातील कुठला जमिनीचा तुकडा जाईल या संदर्भात डिमार्केशन, नंतर मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे व जिल्हाधिकारी जलज शर्मा वेळोवेळी मोजणीसंदर्भात आढावा घेत आहेत. रेल्वे प्रशासनाकडूनही रेल्वे २०२५ पर्यंत धावावी, असे नियोजन आहे.
"मोजणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. रेल्वेने कमी मनुष्यबळ पुरविले आहे. त्यामुळे मोजणी प्रक्रिया राबविताना कसरत करावी लागते. धुळे तालुक्यातील पूर्ण १९ गावांमधील मोजणी जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कुठलाही अडथळा आला नाही तर मार्च-एप्रिलपर्यंत भूसंपादनासह ॲवॉर्ड घोषित करण्याचा प्रयत्न आहे."
-तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी, धुळे
"शिंदखेडा तालुक्यातील पाच गावांमधील डिमार्केशन, मोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्यात कार्यवाही केली जाईल. रेल्वे प्रशासनाने मनुष्यबळ पुरविले तर पाच गावांमधील भूसंपादनाबाबत योग्य ती प्रक्रिया राबविण्याची तयारी आहे."
-प्रमोद भामरे, प्रांताधिकारी, शिरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.