Dhule Ration Protest : राज्यासह जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांच्या प्रलंबित आणि न्याय्य हक्क मागण्यांची पूर्तता व धान्य वितरणातील दैनंदिन अडचणींची सोडवणूक होत नसल्याने सोमवार (ता. १)पासून सर्व रेशन दुकाने अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
या व्यावसायिकांनी देशव्यापी ‘रेशन बंद’ आंदोलनाची हाक दिली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे.(Ration Band movement in district from tomorrow in dhule protest news)
निवेदनाचा आशय असा ः
मागण्यांच्या पूर्ततेसाठी १६ जानेवारीला नवी दिल्लीतील संसदभवनावर देशव्यापी रेशन दुकानदारांचा मोर्चा आणि संसदेला घेराव आंदोलन होणार आहे. वेळोवेळी मागण्या करूनही सार्वजनिक वितरण प्रणालीची सर्वांत शेवटची कडी असणाऱ्या राज्यातील सर्व ५३ हजार रेशन दुकानदारांच्या प्रलंबित न्याय्य हक्क मागण्यांसंदर्भात राज्य शासन उदासीन दिसते.
महासंघाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन शासनामार्फत हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे संयुक्त बैठक झाली. त्यात आश्वासनांपलीकडे कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे ‘रेशन बंद’ आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलन काळात स्वस्त धान्य दुकानदार कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण करणार नाहीत. परिणामी राज्यातील ‘एनएफएसए’ पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाची असेल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत, अशी महासंघाची भूमिका आहे.
रेशन दुकानदारांच्या समस्या सुटण्यासाठी मंत्रालयात ठोस निर्णयासाठी संयुक्त बैठक घ्यावी. ‘रेशन बंद’ आंदोलनामुळे लाभार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी, असे संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या नेतृत्वातील आंदोलनास पाठिंबा असल्याचे साक्री तालुका रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण खैरनार, उपाध्यक्ष श्याम महाले, अजित मन्सुरी, सदस्य मनोहर पाटील, जिल्ह्यातील दुसऱ्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय साबळे, तालुकाध्यक्ष दिलीप पवार यांनी सांगितले.
रेशन दुकानदारांचा उद्यापासून संप
म्हसदी : साक्री तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या विविध समस्या असून, तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार १ जानेवारीपासून मुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण शिवदास खैरनार, उपाध्यक्ष श्यामजी आप्पा महाले, जिल्हा उपाध्यक्ष अजित पिंजारी, जिल्हा सदस्य मनोहर पाटील यांनी दिली.
शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य होत नाहीत. बऱ्याच वेळा निवेदन देऊन शासनाने कुठली दखल घेतली नाही. त्यामुळे देशभरातील सर्व रेशन दुकानदारांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहील.
कार्डधारकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून रेशनवाटप करू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे रेशन दुकानदार अध्यक्ष प्रवीण खैरनार, उपाध्यक्ष श्यामजी महाले, जिल्हा उपाध्यक्ष अजित मन्सुरी, जिल्हा सदस्य मनोहर पाटील यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.