नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत. या सभांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत आहेत, त्या जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांकडून "नाशिक पॅटर्न' बंदोबस्ताच्या नियोजनाची मागणी होते आहे. नाशिक पॅटर्ननुसारच राज्यभरातील अतिमहत्त्वाच्या सभांचा बंदोबस्त केला जाणार असल्याने "नाशिक पॅटर्न'चाच बोलबाला पहावयास मिळणार आहे.
गेल्या महिन्यात नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाची महाजनादेश यात्रा आणि दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी सभा झाली होती. यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुक्ष्मपद्धतीने आणि तितक्याच सुनियोजितरित्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. परिणामी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आलेला असतानाही, तो तितक्याच नियोजनबद्धतेमुळे निर्विघ्न पार पडला होता. या बंदोबस्ताची दखल पोलीस महासंचालकांनी घेतलीच, शिवाय गृहविभागानेही घेतली आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा येत्या दोन आठवड्यात राज्यभर होणार आहेत. अतिमहत्त्वाच्या या सभा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जेथे या सभा होत आहेत, त्या ठिकाणी "नाशिक पॅटर्न'नुसार पोलीस बंदोबस्ताची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी संबंधित पोलीस प्रमुखांकडून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे संपर्क साधून बंदोबस्त नियोजनाचा आराखडा घेतला जात आहे.
असे होता "नाशिक पॅटर्न' बंदोबस्त
* पंतप्रधानांच्या व्यासपीठासमोर 20 सेक्टरची आखणी
* एका सेक्टरमध्ये किमान 4 हजार 500 ते 5 हजार नागरिक क्षमता असलेल्या खुर्च्यांची व्यवस्था
* निमंत्रितासाठीचे सेक्टर्स स्वतंत्र
* प्रत्येक सेक्टरमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
* 120 मेटल डिटेक्टर्समधूनच येणारा प्रत्येक व्यक्ती जाईल असे नियोजन
* जाण्या-येण्याचा मार्ग प्रशस्त
* पोलीस बंदोबस्ताच्या पारंपरिक पद्धतीला फाटा
* एका पोलीस उपायुक्ताच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर
* एक पोलीस उपायुक्त - चार सहाय्यक आयुक्त - 15 पोलीस निरीक्षक - 25 उपनिरीक्षक - 1एका उपनिरीक्षकाच्या पथकात 20 पोलीस कर्मचारी
* एका पथकाकडे दिलेल्या ठराविक परिसराच्या नाकाबंदी, बंदोबस्ताचे नियोजन
* प्रत्येक पथकाला त्याच्या कामाची जबाबदारीचे नियोजन आदल्या दिवशीच
* पंतप्रधान वाहन ताफ्याचे सुक्ष्मनियोजनानुसार बंदोबस्त
* सभेला होणारी गर्दी परतताना कोणताही अटकाव होणार नाही याची काळजी
* सभास्थळी पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. पारंपरिक बंदोबस्त पद्धतीला फाटा देत नियोजन केले. ज्यामुळे सुलभता आलीच, शिवाय प्रत्येकाला त्याच्या कामाची-जबाबदारीची एक दिवस आधीच माहिती होती. त्यामुळे "नाशिक पॅटर्न' बंदोबस्ताची चर्चा राज्यभर झाली असून त्यानुसार नियोजन केले जात आहे.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.