Dhule Riot News : दैवाची कृपा आणि जनआशीर्वादामुळेच गुरुवारच्या प्रसंगातून बचावलो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. नियोजनबद्ध रीतीने हल्ला झाला...पण माझे दैव बलवत्तर होते म्हणून मी सुखरूप आहे... ही प्रतिक्रिया आहे, शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा यांची..! (sangvi riot Attack on MLA Kashiram Pawara dhule news)
सांगवी (ता. शिरपूर) परिसरात गुरुवारी (ता. १०) सायंकाळी बॅनर फाडण्याच्या वादातून दंगल झाली. नंतर हिंसक जमावाने रास्ता रोको केला. तेथे शांततेचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या श्री. पावरा यांच्या वाहनावर जमावाने प्रखर हल्ला चढविला.
सांगवीत नेमके काय घडले?
सांगवी येथे दुपारी चारपासून दंगल उसळली. पोलिसांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदारांना सायंकाळी सांगितले, की जमावाने महामार्गावर रास्ता रोको सुरू केला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी तुम्ही आलात तर उपयोग होईल. त्यामुळे श्री. पावरा घटनास्थळी पोचले. ग्रामपंचायतीजवळ त्यांना जमावाने गराडा घातला.
बॅनर फाडणाऱ्यांना आमच्या ताब्यात द्यायला सांगा, अशी मागणी काहींनी केली. पण कायद्याने तसे करता येणार नाही. संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना सांगू, असे श्री. पावरा यांनी सांगितले; परंतु जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे श्री. पावरा पोलिसांसह महामार्गावरील जमावाकडे जाण्यासाठी निघाले. तितक्यात त्यांच्यावर तुफान दगडफेक सुरू झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाचदा वाहन उलटून फेकले
जमाव किती हिंसक होता ते आमदारांच्या वाहनाच्या तोडफोडीवरून लक्षात येते. स्कॉर्पिओच्या सर्व काचा फोडून जमावाने कुशन्स आणि एअरबॅगसुद्धा कोयत्याने कापून काढल्या. खिडक्यांच्या रबरी फिती उपसून तोडल्या.
त्यावर समाधान न झाल्याने स्कॉर्पिओ चार ते पाचदा उलटून फेकण्यात आली. वायरलूम व इतर पार्ट तोडण्यात आले. चाकातील हवा सोडण्यात आली. श्री. पावरा हातून निसटून गेल्याचा राग जमावाने त्यांच्या वाहनावर काढला.
शेवटी कुंपणावरून घेतली उडी
दगडफेकीपासून बचावासाठी श्री. पावरा रस्त्याकडेच्या टपरीमागे गेले. पोलिसांनी आमदारांना पुढे जाऊ नका, मागच्या मागे निघून जा, असा सल्ला दिला. टपरीमागे काटेरी कुंपण होते. त्यावरून उडी घेत श्री. पावरा पलीकडे गेले.
त्या वेळी अंधारात त्यांचा मोबाईल, खिशातील विधानसभेचे ओळखपत्रही चिखलात पडले. नाल्याकडेने जात काही अंतरावर एका घरात आमदार पावरा यांनी आश्रय घेतला. ते कोणाच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून मालकाने घरातील सर्व लाइट्स बंद केले.
अखेर पोलिसांनी सोडले घरी
काही वेळाने कानोसा घेतल्यानंतर श्री. पावरा यांनी जिल्हा परिषद सदस्य योगेश बांदल यांना संपर्क साधला. ते आले आणि त्यांनी श्री. पावरा यांना स्वत:च्या घरी नेले. तसे त्यांनी पोलिसांना सांगितले. पुढे पोलिसांनी वाहनातून आमदारांना सुळे (ता. शिरपूर) येथील निवासस्थानी सोडले आणि या थरार नाट्यावर पडदा पडला.
"जमावाने असे का केले, ते अनाकलनीय आहे. पण ज्या पद्धतीने ते घडले, त्यावरून तो नियोजनबद्ध कट असल्याची शंका येते. काही विकृत प्रवृत्ती या समाज सतत अस्वस्थ असावा, अशा प्रयत्नात असतात. त्यांच्या मागे युवकांनी लागू नये. शांततेच्या मार्गाने खरा विकास होतो. हिंसा, तोडफोड करू नका, स्वत:चे आयुष्य कोर्ट-केसेसमध्ये बरबाद करू नका. शांतता ठेवा, कुटुंबाची प्रगती साधा हेच आवाहन आहे." -काशीराम पावरा, आमदार, शिरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.