Dhule News : शहरातील नगावबारी परिसरातील शासकीय धान्य गोडाउनमध्ये ठेवलेल्या ईव्हीएमची तोडफोड झाल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १०) समोर आला. या प्रकारामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाने विविध प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त करून सीबीआय चौकशीची मागणी केली. (Shiv Sena thackeray group party demanded CBI inquiry into EVM vandalism incident dhule news)
दरम्यान, या प्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमची तोडफोड, छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला, मात्र कोणतेही ईव्हीएम हरविलेले नाही, सर्व मशिन्स सुरक्षित ठिकाणी हलविली आहेत. संबंधित ईव्हीएमचा ग्रामपंचायत निवडणुकीत वापर झाला.
लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचा वापर होत नाही, असे स्पष्टीकरण दिले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. शहरातील नगावबारी (केंद्रीय विद्यालयाजवळ) परिसरातील धान्य गोडाउनमध्ये ठेवलेल्या ईव्हीएमची तोडफोड केल्याचा, या मशिन्सचे विविध पार्ट गोडाउनच्या परिसरात ठिकठिकाणी विखुरलेले आढळल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १०) समोर आला.
या प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, संवेदनशील विषय असल्याने जिल्हाधिकारी गोयल यांना सायंकाळी साडेपाचला पत्रकार परिषद घेत या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले.
शिवसेनेकडून प्रश्नांची सरबत्ती
गोडाउनमधील अनेक एव्हीएमची तोडफोड करण्यात आली असून, मशिनचे पार्टस आवारात विखुरलेले आढळले.
लोकसभा निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारे ईव्हीएमची तोडफोड करणे व मशिनमध्ये हेराफेरी करणे यासाठी काही यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत का किंवा मशिनमध्ये हेराफेरी करताना मशिनचा सेटअप बिघडला म्हणून ते तोडले का, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम सेटिंग चुकीची झाली.
म्हणून त्या फोडल्या का किंवा दोन महिने आधीच ईव्हीएम सेट करताना मशिन्समध्ये बिघाड झाल्याने ते तोडले की चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न झाला का, मशिन्स तेथून घाईघाईत का हलविली आदी विविध प्रश्न अनुत्तरित असल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे. ईव्हीएम संरक्षणाची जबाबदारी कुणाची, संबंधित ठिकाणी सुरक्षारक्षक का नाहीत, यात अधिकारी दोषी नाहीत का, ईव्हीएमचा खेळखंडोबा कुणी केला, लोकशाहीची लक्तरे वेशीवर का टांगली, असे विविध प्रश्न शिवसेना (उबाठा)ने उपस्थित केले.
सीबीआय चौकशी करा
या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, धीरज पाटील, सुशील महाजन, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, कैलास मराठे, प्रवीण साळवे, छोटू माळी, सुनील चौधरी, नितीन जडे सोनार, शुभम रणधीर, वैभव पाटील, गुलाब धोबी, नाना पारधी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, ईव्हीएम तोडफोडप्रकरणी सायंकाळी जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वापरात येणारे ईव्हीएम गोडाउनमध्ये ठेवले होते. या मशिन्समध्ये मतदानाविषयी माहिती साठविलेली नाही.
९ जानेवारीला तपासणीदरम्यान चार बॅलेट युनिट व आठ कंट्रोल युनिट अस्ताव्यस्त, क्षतीग्रस्त आढळून आले. या मशिन्सचा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापर होत नसल्याचेही श्री. गोयल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम सुरक्षित ठिकाणी आहेत. तेथे २४ तास बंदोबस्त व सीसीटीव्हीची व्यवस्था व इतर निर्देशांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी व इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांत गुन्हा दाखल
दरम्यान, ईव्हीएम तोडफोडप्रकरणी देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तहसीलदार अरुण शेवाळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार ८ ते ९ जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गुदाम क्रमांक १ ते ३ या शासकीय मालमत्तेत अनधिकृतपणे प्रवेश केला.
गुदाम क्रमांक-२ मधील ईव्हीएम बेकायदेशीरपणे बाहेर काढून त्यांची मोडतोड केली. तसेच गुदाम क्रमांक-३ (दक्षिणेकडील)मध्ये उत्तर पश्चिम कोपऱ्याच्या खिडकीचा एक लोखंडी गज तोडून चोरट्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केलेला आढळला.
त्यातील निवडणुकीसंबंधी साहित्य असलेल्या पेट्या उघडल्याचे दिसून आले. गुदाम क्रमांक-१ (उत्तरेकडील डोंगरालगत) भारत निवडणूक आयोगाच्या साधनसामग्रीची तोडफोड करून नुकसान करत ३९ हजार ९९५ रुपयांच्या नवीन व्हीव्हीपॅटच्या ६३ बॅटरी, सहा हजार ९७४ रुपयांचे नवीन कंट्रोल युनिट बॅटरी व ३१ हजार ७४२ रुपयांचे पेपर रोलचे सहा बॉक्समधील ५९ नग असा एकूण ७८ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल नेला.
पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.