Nandurbar Agriculture News : तळोदा शहरासह तालुक्यातील प्रतापपूर, चिनोदा, रांझणी, बोरद, मोड परिसरात सोयाबीन पिकाचे बऱ्यापैकी उत्पन्न घेतले जाते. सध्या पेरणी केलेल्या सोयाबीनची काढणीसह मळणीस शेतकऱ्यांकडून वेग देण्यात आला आहे.
मात्र सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घट येत असल्याचे सांगितले जात आहे. (Soybean harvesting has started in Taloda nandurbar agriculture news )
त्यातच सद्यःस्थितीत सोयाबीनला अपेक्षेनुसार भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला असून, अधिकचा भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबत फळ बागांना तसेच कमी कालावधीत चांगले व हमखास उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करताना दिसून येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तळोदा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करताना दिसून आला आहेत.
या वर्षीदेखील सुमारे दोन हजार ४०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून प्रसंगी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात सोयाबीन मोठे केले. दरम्यान, आता सोयाबीन काढणीला वेग आला असून, काही शेतकऱ्यांकडून मजुरांच्या सहाय्याने सोयाबीन काढणी करून थ्रेचरच्या सहाय्याने सोयाबीन काढणी करत आहेत, तर काही शेतकरी हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीन काढणी करण्यात येत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
दरम्यान, तळोदा तालुक्यात ऑगस्टमध्ये पावसाने मोठी दडी दिली होती. त्यामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घट आल्याचे जाणकार शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच सद्यःस्थितीत सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपये असा भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
तसेच दिवस-रात्र शेतात काबाडकष्ट करून पिकविलेल्या सोयाबीनला निदान पाच हजार रुपये भाव तरी मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे व खतांचे भाव वाढले होते. तसेच सोयाबीनवर झालेला विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व किडींपासून सोयाबीनचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागली आहे.
त्यातच पुरेशा पावसाअभावी सोयाबीने कसेबसे तग धरून त्याचे जेमतेम पोषण झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची वेळ आली आहे.
''या वर्षी पावसाला उशिरा सुरवात झाली होती, तसेच संपूर्ण ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घट आली असून, काढलेल्या सोयाबीनला योग्य भाव नसल्याने लावलेला खर्चदेखील निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.'' -जितेंद्र वानखेडे, सोयाबीन उत्पादक शेतकरी, रांझणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.