Sakal Exclusive Dhule : एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचे वनवैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेर अभयारण्याचा दर्जा काढून घ्यायला हवा असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी जाहीर केले. (status of Aner sanctuary which is known as forest glory should be taken away says Vijaykumar Gavit dhule news)
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हीना गावित यांनीही त्यांच्या मताला दुजोरा दिला. त्यानंतर अनेरची सध्याची परिस्थिती काय आहे, ती कशी खालावली आणि अनेर अभयारण्याचे वैभव कोणी नष्ट केले अशा विविध मुद्द्यांची चर्चा सुरु झाली आहे.
सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी अनेर नदी महाराष्ट्र व मध्य प्रदेशाची नैसर्गिक सीमारेषा आहे. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. एक हजार ७०२ चौरस किमीचे खोरे असलेल्या अनेर नदीच्या काठावर शिरपूर तालुक्यात अनेक महत्त्वाची गावे असून त्याच परिसरात अनेर अभयारण्याचाही समावेश होतो. विपुल वनसंपत्ती आणि जैव विविधता असल्यामुळे १९८६ मध्ये येथील वनांना अभयारण्याचा दर्जा देऊन संबंधित यंत्रणेची नियुक्तीही करण्यात आली.
वृक्षवैविध्य
वनविभागाच्या नोंदीनुसार, अनेर अभयारण्यात साग, साल, शिसव, खैर, हिवर, बाभूळ, बेल, धावडा, पळस, सळई, पांगारा आदि जातींचे वृक्ष आढळतात. त्यातील सागासारख्या इमारती लाकडाच्या वृक्षांची बेसुमार कत्तल झाली.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
झुडपांमध्ये निवडुंग, तरवडा, मुरुडशेंग यांचा भरणा असून खुरट्या काटेरी वनस्पतींचे आधिक्य आहे. अतिजलद गतीने फोफावणाऱ्या परजीवी वनस्पतींमुळेही झुडूपांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनिर्बंध जनावरांच्या चराईमुळे जनावरांच्या टापांखाली कोवळी रोपे नष्ट होतात.
प्राणी-पक्षी वैविध्य
प्रारंभी अनेर अभयारण्यात बिबट्या, काळवीट, कोल्हा, लांडगा, घोरपड, साळिंदर यासारखे प्राणी, क्रौंच, मोर, सारस, रानबदक आदि जातींचे पक्षी विपुल प्रमाणात होते. मात्र वाढती अतिक्रमणे, बेसुमार वृक्षतोड, मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने येथील प्राणी, पक्षीवैविध्य धोक्यात आले आहे.
बिबट्याची शिकार
तीन वर्षापूर्वी अभयारण्याच्या सीमेलगत आढळलेल्या बिबट्याची शिकार करण्यात आली. ही घटना राज्यभरात गाजली होती. त्याबाबत काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. आजही बिबट्याचा संचार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यांचा अभयारण्यातील अधिवास हिरावला गेल्याने ते मानवी वस्तीजवळ येऊन ठेपल्याचे उघड आहे.
प्राण्यांचा मृत्यू
गेल्या तीन वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे अनेर अभयारण्यात दोन नीलगायींचा मृत्यू झाला. पाच हरणे अपघातात मृत्यूमुखी पडली. पाण्याच्या शोधार्थ रस्ता ओलांडणारे तरसासारखे प्राणी वाहनाच्या धडकेत ठार झाल्याच्या घटना नेहमीच घडतात. प्राणिमित्रांनी तीन जिवंत हरणे, एक नीलगाय, दोन कोल्हे असे प्राणी पुन्हा अभयारण्यात सोडले आहेत. या पार्श्वभूमीवर अभयारण्यात प्राणीच नाहीत हे विधान असयुक्तिक ठरते.
संवर्धन हवे
अभयारण्य म्हणजे केवळ प्राणीच नव्हे. तो अभयारण्याचा एक भाग असतो. वृक्ष, लहानमोठी झुडुपे, पक्षी, जैवविविधता आदी सर्व घटकांनी मिळून अरण्य निर्माण होते. सरसकट वृक्षतोडीमुळे वनसंपदा नष्ट झाली. त्यामुळे शिल्लक वनवैविध्य संरक्षित राहण्यासाठी अभयारण्ये निर्माण करणे भाग पडले.
अशी अभयारण्ये म्हणजे त्या-त्या प्रादेशिकतेची वैशिष्ट्ये आहेत. ती सातत्याने संवर्धित करणे आवश्यक असते. दुर्दैवाने अनेरबाबत ते कर्तव्य गांभीर्याने पाळले गेले नाही. त्यामुळे काहीशी बकाल अवस्था झालेली दिसते. मात्र शासनाने लक्ष देऊन तेथील अतिक्रमित वस्तींचे रहिवासी भागात पुनर्वसन केल्यास व संवर्धनासाठी पुरेशा निधीसह यंत्रणेची तरतूद केल्यास अनेरचे हरवलेले वैभव खात्रीने परत मिळू शकेल. त्याचा दर्जा काढण्याऐवजी दर्जा राखण्याकडे कल हवा. गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी सकारात्मकतेने काम होणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.