धुळे ः घराला कुलूप लावून संबंधित महिला सायंकाळी पाचनंतर मेडिकल दुकानावर गेली आणि कॉलनीत डीजेच्या तालावर हळदीचा कार्यक्रम सुरू असताना चोरट्यांनी संधी साधत सायंकाळनंतर संभाप्पा कॉलनीत जैन कुटुंबीयांच्या घरात हातसफाई केली. यातच परिसरात वीजपुरवठा खंडीत झाल्याने आठ लाखांची रोकड आणि २२ तोळे लंपास करत पसार होणे चोरट्यांनी अधिक सोयीचे झाले. घरावर पाळत ठेवत माहितगारानेच ही घरफोडी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
शहरात चितोड रोड परिसरात संभाप्पा कॉलनी आहे. तेथे प्लॉट क्रमांक ९७ मध्ये जैन कुटुंब वास्तव्यास आहे. घरापासून जवळच फाशीपुल रोडवर जवाहर मांगीलाल जैन यांचे जवाहर मेडिकल आहे. त्यांचा मुलगा लकी गोव्याला गेला आहे, तर पत्नी कंचन घरीच साडी आणि ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय करतात. त्या पतीच्या मदतीसाठी मंगळवारी सायंकाळी पाचनंतर घराला कुलूप लावून मेडिकलवर गेल्या. दुकानातून जैन दाम्पत्य रात्री दहाला परतते. त्याप्रमाणे ते परतले असता त्यांना घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी माहिती दिल्यावर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहराचे साहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, एलसीबीचे उपनिरीक्षक हनुमंत उगले आदी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.
प्लॉटचे पैसे चोरीस
जैन यांच्या शहर पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार घरातून नऊ लाख १२ हजार किमतीचा ऐवज चोरीस गेला असून त्यात २२ तोळे चार ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ लाखांची रोकड समाविष्ट आहे. आठ लाखाची रक्कम एमआयडीसीत प्लॉट खरेदीसाठी होती. त्या प्लॉटची बुधवारी (ता. ६) खरेदी होणार होती. त्यापूर्वीच चोरट्यांनी रोकड लंपास केली. चोरीच्या घटनेचा धक्का बसल्याने सौ. जैन यांना अश्रू अनावर होत होते. त्यांच्या घरापासून जवळच विवाहानिमित्त डीजेवर हळदीचा कार्यक्रम रंगला होता.
थंडीमूळे चोरट्यांना संधी
काही रहिवासी थंडीमुळे बंद घरात होते. ही संधी चोरट्यांनी साधली. दरम्यान, जैन यांच्याकडील ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि कापड विक्रीच्या व्यवसायातील ५० हजार, तर अन्य कपाटातील साडेसात लाखांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. बाजारभावाप्रमाणे चोरट्यांनी २५ लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लंपास केल्याची चर्चा परिसरात आहे. या घटनेमुळे संभाप्पा कॉलनीसह धुळे शहरात खळबळ उडाली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.