धुळे : आरटीओ कार्यालयाने विविध प्रकारच्या रिक्षांवर दंडात्मक कारवाईचे सत्र अवलंबिले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. त्यांनी संघटित होत गुरुवारी (ता. २८) संपाचे हत्यार उपसण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या समर्थकांसह पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तीत सामंजस्याने तोडगा काढण्याच्या प्रयत्नानंतर संप मागे घेण्यात आला. यात ठाकरे- शिंदे गटात आता चढाओढ सुरू झाल्याचे या प्रश्नावरून समोर आले. (uddhav Thackeray Eknath Shinde group fight in Dhule Maharashtra Political News)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने रिक्षाचालकांवरील दंडात्मक कारवाई तत्काळ थांबवावी, परमिटधारक व स्क्रॅप रिक्षाचालकांच्या अडचणी लागलीच सोडवाव्यात, या मागणीसाठी परिवहन कार्यालयाविरोधात आंदोलन करत अधिकाऱ्यांना घेराव घातला.
त्यांनी आरटीओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरासह जिल्ह्यात १५ वर्षांवरील ६० टक्के रिक्षा व नवीन परमिटधारक ४० टक्के रिक्षा आहेत. आरटीओ कार्यालयाकडून परमिटधारक, स्क्रॅप व विद्यार्थी वाहतुकीच्या रिक्षांवर सरसकट दंडात्मक कार्यवाही सुरू आहे. रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा दंड आकारणी होत आहे. ती चुकीची आहे.
पावसाळ्यात रिक्षाचालकांना पुरेसे ग्राहक मिळत नसून आधी कोरोना व आता हंगामी अडचणींमुळे रोज ३०० ते ४०० रुपये मिळणे अवघड झाले आहे. अशातच आरटीओंच्या कार्यवाहीमुळे अनेक रिक्षाचालक धास्तावले आहेत.
रिक्षाचालकांच्या अनेक समस्या असून, त्यावर आरटीओंकडून कुठलीही ठोस अंमलबजावणी केली जात नाही. केवळ नियमावर बोट ठेवून होणारी कार्यवाही उचित नसून रिक्षाचालकांच्या समस्यांवर आरटीओंनी तोडगा काढावा.
रिक्षाचालकांना परमिट किंवा इतर बाबींसाठी काही महिन्यांची सवलत द्यावी, अशी मागणी सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर समन्वयक भरत मोरे, पिंटू शिरसाट, राजेश पटवारी, देविदास लोणारी, ललित माळी, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, जयश्री वानखेडे, सुनील पाटील, विनोद जगताप, पुरुषोत्तम जाधव, संदीप सूर्यवंशी, रामदास कानकाटे, कुणाल कानकाटे आदींसह दोनशे ते तीनशे रिक्षाचालक उपस्थित होते.
महाले यांची शिष्टाई
आरटीओ कार्यालयाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी गुरुवारी संपाचे हत्यार उपसले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक सतीश महाले यांनी शिष्टाई करत या प्रकरणावर सर्वमान्य तोडगा काढला. त्यामुळे रिक्षाचालकांनी संप मागे घेतला, असे महाले समर्थकांनी सांगितले.
शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व चारचाकी मॅजिक गाडी चालक-मालकांनी तीनशे ते चारशे जणांनी श्री. महाले यांच्याकडे समस्या मांडत आरटीओंकडून दंडात्मक कारवाईमुळे उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले.
त्यांच्यासह श्री. महाले यांनी आरटीओ कार्यालय गाठले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या रिक्षाचालकांकडे कागदपत्र नाहीत व रिक्षा भंगार म्हणून विकत घेण्यात आल्या आहेत, अशांवर कारवाई केली, तर त्यास आक्षेप नाही.
मात्र, कागदपत्रे असूनही काही ना काही कारणास्तव अवाजवी १० ते १५ हजारांचा दंड आकारला जातोय, तो प्रकार थांबवावा, असे श्री. महाले यांनी सूचविले. त्यास अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीतील चालकांनी पुकारलेला तीन दिवसांचा संप मागे घेतला. तसेच आरटीओ कारवाई होईल, असे वागू नका.
नियमानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करा. गॅसकिटच्या रिक्षा मालकांनी सुरक्षिततेसाठी फायर एक्सप्लुझिव्ह स्प्रे बाळगा. रिक्षाच्या दोन्ही बाजूंना दप्तर टांगू नका. कॅरिअरवर दप्तरे ठेवावीत. रिक्षाचालक व मालकांच्या समस्येवर तोडगा निघाल्याने श्री. महाले यांचे उपस्थितांनी आभार मानल्याचे समर्थकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.