शिरपूर (जि. धुळे) : शहर व परिसरात बुधवारी (ता. १५) झालेले वादळ आणि पाठोपाठच्या पावसामुळे गहू (Wheat) आणि मका या पिकांना मोठा फटका बसला.
तहसीलदार आबा महाजन यांनी आदेश दिल्यानंतर गुरुवारी (ता. १६) सकाळपासून पंचनाम्यांना सुरवात झाली. (Wheat and Maize crops were hit hard by the storm and rain dhule news)
एक पंधरवड्यात दोनदा पाऊस आणि वादळाने तालुक्याला तडाखा दिला आहे. यापूर्वी ४ मार्चला झालेले वादळ आणि पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. गहू, हरभरा आणि मक्याचेही मोठे नुकसान झाले होते. त्या हानीतून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच शेतकऱ्याना बुधवारच्या पावसाने पुन्हा फटका दिला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाप्रमाणे १३ ते १८ मार्चदरम्यान पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापणीसाठी तयार गहू काढून घेतला, मात्र अद्याप अपक्व असलेला गहू शेतात उभा होता. पावसामुळे या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. तीच गत मक्याचीही झाली आहे. शेतात शिल्लक हरभराही वादळ आणि पावसाला बळी पडला.
चार मार्चच्या तुलनेत बुधवारी झालेल्या पावसाने अधिक हानी केल्याचे दिसून आले. अर्थे खुर्द आणि अर्थे बुद्रुक परिसरात पावसामुळे गहू आणि मक्याचे क्षेत्र खराब झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी महसूल विभागाला कळविले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
त्यानंतर तहसीलदार आबा महाजन यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर असतानाही शेतकऱ्यांची अडचण पाहून संबंधित तलाठी पंचनाम्यांसाठी रवाना झाले.
बुधवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर काही वेळाने पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस सुरू राहिला. पहाटे पुन्हा तुरळक सरी बरसल्या. पावसाचे पाणी शहराच्या उंचसखल भागात साठले. शहर बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या खोलगट भागात तळे तयार झाले. तेथे हा प्रकार नेहमीचा असून, ये-जा करणारी वाहने व बसमुळे अंगावर चिखल, पाणी उडू नये म्हणून कसरत करताना प्रवाशांची पुरेवाट झाली. वादळ आणि पावसामुळे वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.