तळोदा (जि. नंदुरबार) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अचानक बिघाड होत त्या बस भररस्त्यात बंद पडण्याच्या घटना नित्याचाच झाल्या आहेत. सोमवारी (ता. २३) मात्र बसमधील प्रवाशांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले.
बसचे चाक पंक्चर झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, चाक बदलण्यासाठी लागणारे जॅक बसमध्ये होते, मात्र ते जुने असल्याने उपयोगी पडले नाही.
त्यामुळे बसच्या वाहकाची व चालकाचीदेखील चांगलीच दमछाक झाली. शेवटी परिसरातील राजेंद्र गुरव मदतीला धावून आल्याने बस दुरुस्त करणे शक्य झाले. (Wheel puncture of running bus in Taloda Jack unfit and tired of carrier Nandurbar News)
परिवहन महामंडळाच्या अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या केव्हाही बंद पडत त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. बंद झालेल्या बसला सुरू करण्यासाठी धक्का मारावा लागतो. धक्का दिल्यावर कधी बस सुरू होते, तर कधी सुरू न झाल्याने बसमधील प्रवाशांना दुसरी बस उपलब्ध होईपर्यंत ताटकळत वाट पाहावी लागते.
मात्र सोमवारी (ता. २३) सायंकाळी एका बसमधील प्रवाशांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले. वाडा ते अक्कलकुवा बस (एमएच १४, बीटी ३९७६) तळोदा शहरात येत असताना शहादा रोडवरील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या गेटजवळ आल्यावर अचानक पंक्चर झाली.
बसच्या वाहकाने पंक्चर चाक काढण्यासाठी व त्या जागी दुसरे चाक बसविण्यासाठी तत्काळ बसमधील जॅक काढले. मात्र ते जॅक खूपच जुने असल्याने व्यवस्थित काम करीत नव्हते. वाहकाने बराच प्रयत्न केला, मात्र त्या जुनाट जॅकमुळे बसचे पंक्चर झालेले चाक बदलणे शक्य झाले नाही. यादरम्यान वाहक व त्याला मदत करणारा चालक चांगलेच दमले.
रस्त्यावर बंद पडलेली बस बघून परिसरातील राजेंद्र गुरव तेथे आले व त्यांनी मदत केल्याने बस दुरुस्त करणे शक्य झाले. बसमधून बारा प्रवासी प्रवास करीत होते. त्यांची पुढील प्रवासासाठी औरंगाबाद बसमध्ये व्यवस्था करण्यात आली.
मात्र यात त्यांना जवळपास एक तास ताटकळत राहावे लागले व नाहक त्रास सहन करावा लागला. नादुरुस्त जॅकमुळे वाहक आणि चालक यांचीदेखील चांगलीच दमछाक झाली. दरम्यान, परिवहन महामंडळाच्या अनेक बसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
काही बसच्या खिडक्याच्या काचा फुटलेल्या आहेत, तर काही बसचे सीट फाटलेले आहेत. त्यामुळे प्रवासी टॅक्सीला प्राधान्य देत आहेत. पर्यायाने त्याचा आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसत आहे.
प्रवासी सुदैवी
सोमवारी चाक पंक्चर झालेल्या बसमधील प्रवाशांच्या सुदैवाने ज्या ठिकाणी बसचे चाक पंक्चर झाले ते ठिकाण बसस्थानकापासून अवघ्या एक किलोमीटरवर होते. त्यामुळे प्रवाशांना जास्त त्रास सहन करावा लागला नाही. मात्र जर हीच बस रस्त्यात इतर ठिकाणी पंक्चर झाली असती तर प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असता, असे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.