भाजप आता अधिक जोमाने देशभरात मुसंडी मारणार याचे संकेत मिळायला सुरवात झाली आहे.
नवी दिल्ली - देशातील पाच राज्यांतील निवडणुकीकडे २०२४च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते आणि त्यातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक उत्तर प्रदेशाची (Uttar Pradesh) होती. या राज्यात भाजपला (BJP) सत्ता राखण्यात अपयश आले असते, तर पक्षाला लोकसभेची निवडणूक नक्कीच अवघड गेली असती. उत्तर प्रदेशातील विजयाने या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले असून, भाजप आता अधिक जोमाने देशभरात मुसंडी मारणार याचे संकेत मिळायला सुरवात झाली आहे.
उत्तर प्रदेशामध्ये भाजपचेच सरकार येण्याची शक्यता या राज्याचा दौरा केल्यानंतर स्पष्ट होत होते, मात्र पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होतील, अशी भीती अगदी भाजपच्या कार्यकरत्यांच्याही मनात होती. शेतकरी आंदोलनाचा व लखीमपूर घटनेचा फटका बसून जागा २२५ च्या आसपासची राहतील असे काही नेते आणि कार्यकर्ते खासगीत सांगत होते. याचा फायदा अखिलेख यादव यांचा समाजवादी पक्ष किती मोठ्या प्रमाणात उठवू शकतो, हा कळीचा मुद्दा होता. अखिलेश यांना पश्चिम उत्तर प्रदेशात मोठा पाठिंबा मिळालाच व पहिल्या दोन टप्प्यात त्याचा फायदा झाल्यानेच त्यांच्या जागा २०१७च्या ४७ वरुन शंभरी पार गेला आहे.
दुसरीकडे, शेतकरी आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने कायदा आणि सुव्यवस्था, तसेच विकासाचा मुद्दा ऐरणीवर आणला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सुरवातीलाच ८० विरुद्ध २० हा नारा दिला. याचा अर्थ विकासाच्या, कायद्याच्या बाजूने असलेले ८० टक्के विरुद्ध राज्याची प्रगती नको असलेले २० टक्के असा योगींच्या घोषणचा अर्थ होता. मात्र, त्याचा एक अर्थ ८० टक्के हिंदू विरुद्ध २० टक्के मुस्लिम असाही काढला गेला. यातून मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरणाच्या प्रक्रिया सुरू झाली. या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपप्रमाणेच अखिलेश यांनाही झाला. मुस्लिम मते एकगठ्ठा सपच्या बाजूने गेलेली दिसली. मुस्लिम मतदारांनी बसप, एमआयएम किंवा कॉंग्रेसला मत देऊन ते वाया न घालवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच परिणाम सपच्या जागा वाढण्यात दिसला. मात्र याच ध्रुवीकरणाने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, हेही तितकचे खरे. यादव व मुस्लिम वगळता इतर बहुतांश जातींनी हाच विचार करीत इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार कितीही चांगला असला, तरी मत भाजपच्याच पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला. अखिलेख यांच्या सभांना झालेली गर्दी भाजपच्या गोटात धडकी भरवणारी होती, मात्र त्याचे मतांत आणि जागांत रुपांतर होऊ शकले नाही.
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायवती यांनी अत्यंत कमी प्रमाणात केलेला प्रचार भाजपच्या पथ्यावर पडलेला दिसला. यादव आमदारांकडून होणाऱ्या त्रासापासून आपल्याला केवळ बसप वाचवू शकतो, असा विश्वास दलित मतदारांना होता. बसप बाजूला राहिल्याने या मतदारांनी भाजपला साथ दिली असणार, असेच दिसते. काँग्रेसचा संपला जोर व प्रियांका गांधींच्या ‘लडकी हूं लड सकती हूं...’ या प्रचाराला मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे भाजपचे काम अधिकच सोपे झाले. थेट राम मंदिर किंवा हिंदूत्वाचे कार्ड न खेळता भाजपने मिळवलेले यश अनेक अर्थांनी वगेळे ठरते. कोरोना काळात झालेला दुरवस्था, बेरोजगारी, योगींबद्दल पक्षातच असलेली नाराजी अशा अनेक गोष्टींवर मोदी-योगी जोडीने केलेली विकासकामे व कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीने मात केली. पश्चिम उत्तर प्रदेशात असलेली कमतरता पूर्वांचलमध्ये भरून निघाली व भाजपच्या पारड्यात घवघवीत यश पडले.
रोजगार योदी-मोदीच देतील!
उत्तर प्रदेशातली युवकांची सर्वांधिक मोठी मागणी राज्यातच रोजगार मिळावा ही आहे. येथील युवकांशी बोलताना त्यांनी आता राज्य विकासाच्या मार्गावर असून, योगींना पुन्हा संधी दिल्यास मोदी-योगी ही जोडी आम्हाला निश्चित रोजगार मिळवून देतील असे सांगितले. कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याने आणि पायाभूत विकासाची कामे होत असल्याने आमच्या राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील, असा विश्वास या युवकांना होता. भविष्यात उत्तर प्रदेश देशाच्या विकासाचे मॉडेल बनेल, असा विश्वास बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक दया त्रिपाठी यांनी व्यक्त केला होता. पुढील पाच वर्षांत ही परिस्थिती निर्माण करण्याचे मोठे आव्हान मोदी-योगी जोडीसमोर असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.