UP Assembly Election Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Assembly Election: गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना मिळाले तिकिटे

सर्वच पक्षांनी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गंभीर व अतीगंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना सढळ हाताने तिकिटे दिली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात समाजवादी पक्ष व भाजपसह सर्वच पक्षांनी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गंभीर व अतीगंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना सढळ हाताने तिकिटे दिली आहेत. एकूण संख्येच्या तब्बल ४५ टक्के इतकी त्यांची संख्या असून पक्षनिहाय पाहिल्यास ३५ ते ७५ टक्के गुन्हेगारांना तिकिटे मिळाल्याचे दिसून आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचाही यात समावेश आहे. (UP Assembly Election Updates)

‘द एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यासाठी विविध पक्षांचे ६१५ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवारांवर गंभीर व २० टक्के उमेदवारांवर अतिगंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्व पक्षांनी धुडकावल्याचेही निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे. सपच्या ७५ टक्के, राष्ट्रीय लोकदलाच्या ५९ टक्के तर भाजपच्या ५१ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसने ३६ टक्के, बसपाने ३४ तर ‘आप’ने १५ टक्के कलंकित उमेदवारांना तिकिट दिल्याचे अहवाल सांगतो. बलात्कार व अन्य अत्याचारांचे गुन्हे दाखल असलेल्या १२ जणांचाही समावेश आहे. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांत सपचे १७, लोकदलाचे १५, भाजपचे २२, काँग्रेसचे ११, बसपचे ११ व आपचे ५ उमेदवार यात आहेत. ८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांतील माहिती अपूर्ण असल्याने त्यांचा समावेश या अहवालात नाही.

निम्मे उमेदवार कोट्यधीश

एकूण ६१५ पैकी २८० म्हणजे जवळपास निम्मे उमेदवार कोट्यधीश आहेत. १६३ जणांनी आपल्याकडे ५० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. ८४ जणांकडे २ ते ५ कोटींपर्यंत संपत्ती आहे. सरासरी काढली तर प्रत्येक उमेदवाराकडे जवळपास पावणेचार कोटींची संपत्ती आहे. मेरठ कॅन्टोन्मेंटमधील भाजपचे अमित मालवीय हे सर्वांत श्रीमंत उमेदवार असून त्यांची घोषित संपत्ती १४८ कोटी आहे.

उत्तर प्रदेश झाले दंगलमुक्त : योगी

लखनौ : ‘उत्तर प्रदेश राज्य गेल्या पाच वर्षांत दंगलमुक्त बनले असून दहशतवादी कारवायाही पूर्णपणे थांबल्या आहेत. उलट येथे आता गुंतवणूकदारही आकर्षित होत आहेत,’ असा दावा राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला. आपल्या आधीच्या राज्यकर्त्याना पोलिस दलात सुधारणा करण्यात अपयश तर आलेच, पण त्यांना या दलाचा वापर वैयक्तिक कारणांसाठी विरोधकांविरोधात करायचा होता, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की,‘‘बहुजन समाज पक्षाच्या सत्ताकाळात (२००७-२०१२) ३६४ दंगली झाल्या तर, समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात (२०१२-२०१७) सातशेंहून अधिक मोठ्या दंगली झाल्या आणि या दंगलींमध्ये शेकडो जणांची हत्या झाली. २०१७ मध्ये भाजप सरकार आल्यापासून राज्यात एकही दंगल झालेली नाही आणि तरीही सरकार शांत बसलेले नाही. आम्ही राष्ट्रीय सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून अनेक संवदेनशील भागांमध्ये दहशतवादविरोधी केंद्र निर्माण करत आहोत.’’

गुन्हेगारीवर नियंत्रण

मोठे राज्य असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. पाच वर्षांपूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत सध्या दरोडेखोरी ५८ टक्क्यांनी, लूटमार ६४ टक्क्यांनी, खूनाच्या घटना २३ टक्क्यांनी, अपहरणाचे प्रकार ५३ टक्क्यांनी, हुंडाबळी आठ टक्क्यांनी आणि बलात्काराच्या घटना ४३ टक्क्यांनी कमी झाल्या असल्याचा दावाही योगींनी केला आहे. आपल्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात १५५ मोठ्या गुन्हेगारांचा खातमा करण्यात आला असून इतर ३,६३८ गुन्हेगार चकमकीत जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. या चकमकींमध्ये १३ पोलिस हुतात्मा झाले तर १,२३६ जण जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT