जिवती (जि. चंद्रपूर) : एकवीसाव्या शतकात विज्ञानाचा सूर्य तळपत असताना अंधश्रद्धेची झापड लावून जगणारा समाज आपल्या आजूबाजूलाच असल्याची धक्कादायक प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती (jiwati chandrapur) तालुक्यातील वणी (खुर्द) या गावात घडलेल्या घटनेने आली आहे. भानामती (superstition case chandrapur) केल्याच्या संशयावरून वृद्ध महिला-पुरुषांना भर चौकात हातपाय बांधून गावकऱ्यांसमोर अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सात जण जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाच्या पुढाकाराने गावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन सुरू केले आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
मारहाणीत जखमी एकनाथ नारायण हुके (वय ७०), साहेबराव एकनाथ हुके (४८), पय्रागबाई एकनाथ हुके (६४), शांताबाई भगवान कांबळे (५३), शिवराज पांडुरंग कांबळे (७४) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांना किरकोळ मारहाण झाली. त्यांच्यावर गावातच उपचार करण्यात आले. मारहाण करणारे आणि पीडित एकाच समाजातील आहे. मागील काही वर्षांपासून त्यांच्यात जादूटोण्याच्या संशयावरुन भांडणे व्हायची. त्यामुळे गावात नेहमीच जादूटोणा, भानामतीची भीती पसरली असायची. गावातील सूज्ञ नागरिकांनी पुढाकार घेऊन अनेकदा वाद मिटवला. दोन दिवसांपूर्वी गावातील चार महिलांच्या अंगात देवी आली. त्यांनी जादूटोणा करणाऱ्यांची नावे घेतली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी ज्यांची नावे आली त्यांना सायंकाळी सात वाजता गावातील चौकात आणले. खांबाला बांधले आणि रात्री बारापर्यंत अमानुष मारहाण केली. यात वृद्ध पुरुष आणि महिलाही सुटल्या नाहीत.
यावेळी गाव मुकपणे ही मारहाण बघत होते. त्यांना सोडविण्यासाठी कुणीच पुढे आले नाही. दरम्यान, त्याच रात्री मारहाण झालेल्या शिवराज कांबळेच्या पत्नी पंचफुला कांबळे यांनी या घटनेची पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस केले. त्यानंतर पोलिस गावात पोहोचले आणि मारहाण झालेल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी भादंवी ३२५, १४३, १४७, १४९, ३४२ आणि महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. तपासात आतापर्यंत १३ आरोपींनी अटक करण्यात आली आहे. यातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. आज सोमवारी (ता. २३) जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी वणी येथे भेट दिली. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, पोलिस पाटील यांच्याशी बैठक घेतली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावात समुपदेशन केले. खासदार बाळू धानोरकर यांनी जखमींना भेट देवून विचारपूस केली.
आरोपींची नावे -
या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुग्रीव रामाराव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, बालाजी कांबळे, दादाराव कोटंबे, अमोल शिंदे, गोविंद संभाजी येरेकर, केशव श्रावण कांबळे, माधव तेलंगे, दत्ता शिवाजी भालेराव, सूरज कांबळे, सिद्धेश्वर शिंदे आणि संतोष पांचाल यांचा समावेश आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती सहा पोलिस निरिक्षक संतोष अंबिके करीत आहे.
गावात सध्या शांततेच वातावरण आहे. तपासअंती निष्पन्न झालेल्या १३ जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांनी अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये. असे काही आढळून आल्यास पोलिसांना कळवावे.- सुशिलकुमार नायक, उपविभागिय पोलिस अधिकारी गडचांदूर
जादूटोण्याचा संशय जुनाच -
पाचशे लोकसंख्या असलेल्या वणी (खुर्द) या गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून गावात जादूटोणा आणि भानामतीच्या संशयावरुन भांडणे व्हायची. शांताबाई सोनकांबळे या आधी केळझरी येथे राहायच्या. तिथेही तिच्यावर भानामतीचा संशय गावकऱ्यांनी घेतला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून शेतात पुरुन ठेवलेली लाकडी पेटी, त्यातील बाहुल्या आणि चित्रविचित्र वस्तू जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गाव सोडले आणि वणी (खुर्द) येथे स्थायिक झाल्या. तेव्हापासूनच गावकरी तिच्याकडे संशयाने बघायचे. दरम्यानच्या काळात गावात काही जणांचा मृत्यू झाला. तो जादूटोण्यानेच झाला, असा समज गावकऱ्यांचा झाला. मारहाणीत जखमी हुके कुटुंबातील एकाला गावापंचायतने वर्षभरापूर्वी दंडही ठोठावला होता. २१ ऑगस्टला गावातील चार महिलांच्या अंगात आले आणि त्यांनी काहींची नावे घेतली, असे सांगण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांचे जादूटोण्याचे भूत पुन्हा जागे झाले आणि संशयितांना मारहाण केली. यात शांताबाई सोनकांबळे याही किरकोळ जखमी झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.