चंद्रपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या टाळेबंदीत हात रिकामे झालेत. रोजगार नाही की मजुरी नाही. कुटुंबाचा गाढा हाकताना महिलांना मोठीच कसरत करावी लागत होती. अशातच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कुक्कुटपालन योजनेने मोठा आधार दिला. जिल्ह्यातील 2700 महिलांना कुक्कुटपालनाच्या माध्यमातून रोजगार मिळाला. अवघ्या तीन महिन्यांत जवळपास पंधरा हजारांचे उत्पन्न महिलांचा हातात आले. टाळेबंदीचा ऐन संकटात महिला आर्थिक विकास महामंडळाने दिलेला मदतीचा हात हजारो कुटुंबांसाठी लाखमोलाचा ठरला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरविले. त्यामुळे केंद्र शासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला. टाळेबंदीचा फटका सर्वच घटकांना बसला. अनेकांचे रोजगार बुडाले. उद्योगधंदे बंद पडले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक उपक्रमांनाही टाळेबंदीची झळ बसली. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाशी जुळलेल्या महिलांवर उपासमारीचे संकट कोसळले होते.
मात्र, याही परिस्थिती महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रशासनाने समन्वय ठेवून अनेक बंद करण्यात आलेले छोटे-मोठे प्रकल्प सुरू केले. याच कालावधीत चांदा ते बांदा योजनेतून कुक्कुटपालनाचा व्यवसाय महिलांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पशु संवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील दोन हजार 737 ग्रामीण बचतगट आहे. या गटातील गरीब, गरजू महिलांना वर्गवारीनुसार 75 ते 90 टक्के अनुदान कुक्कुटपालनला देण्यात आले. यात महिलांची 10 ते 25 टक्के गुंतवणूक होती. कुक्कुटपालन करणाऱ्या बचतगटांच्या महिलांना सर्व प्रथम नागपूरच्या माफसू विद्यापीठातर्फे तीनदिवसीय कुक्कुट पालन व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना सातपुडा प्रजातीचे 100 कुक्कुट पक्षी, एक शेड, पाणी भांडी , बृडिंग कॅम्प, पशु खाद्य, फुड सप्लीमेंट, लस, इन्शुरन्स या गोष्टी पुरविण्यात आल्या. प्रशिक्षणानंतर परत आलेल्या महिलांनी आपआपल्या गावात कुक्कुटपालन सुरू केले. जवळपास दोन महिन्यानंतर कोंबडे एक किलो वजनाचे झाले आहेत. प्रति किलो 250 ते 300 रुपये दराने कोंबड्यांची विक्री सुरू आहे.
पंधरा हजारांची मिळकत
जिल्ह्यातील दोन हजार 700 बचतगटांच्या महिला कुक्कुटपालनाशी जुळल्या आहेत. नागपुरातून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या गावांत कुक्कुटपालन सुरू केले. अवघ्या तीन महिन्यांत कुक्कुटपालन व्यवसायातून महिलांना पंधरा हजार रुपयांची मिळकत मिळाली. टाळेबंदीच्या काळात कुक्कुटपालन व्यवसायाने हजारो कुटुंबीयांना आधार मिळाल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी श्री. उगेमुगे यांनी दिली.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.